' हॅलो प्रेरणा, हॅप्पी मॅरेज अॅनिवरसरी. मग काय खास बेत राजाराणीचा? काय
खरेदी केलीस वाढदिवसानिमित्त?'... 'अगं आमचा राजा
आहे बिझी! बघू या किती वेळ देतो आपल्या राणीला', असं पुटपुटत आणि आठवणीने
फोन केल्याबद्दल थँक्स देत प्रेरणाने फोन ठेवला. पण ती मनाशी विचार करू
लागली, खरंच राजाराणीचा संसार राहिलाय का आपला? लग्नाला तीन वर्षं झाली.
प्रेमाच्या संसाराची नवी नवलाई संपून आता वास्तववादी नवरा बायकोचा संसार
सुरू झाला आहे. राणीचं संबोधन आता 'बाईसाहेब' झालंय. परागचं म्हणजे
तिच्या नवऱ्याचं हे नेहमीचंच झालं आहे. ऑफिसमधून आल्यावर टीव्ही ऑन करून
न्यूज चॅनेल किंवा क्रिकेटमध्ये गुंग व्हायचं अन् काही बोलायला गेलं तर
फक्त हुंकाराची भाषा. जेवतानाही तीच तऱ्हा. जेवणाचं कौतुक तर नाहीच पण
बोलणं झालंच तर आई ही भाजी अशा पद्धतीने करते, आईच्या आवडी अशा अन् आई
आमची टापटीपणाची भोक्ती! मला कळत का नाही हे तिरकस बोलणं! पण जाऊ दे
मातृभक्त पुत्राची पत्नी, माझ्या लहानग्या पियुची मम्मी अन् माझे
ऑफिसातील जबाबदारीचे पद या तिहेरी भूमिका निभावायच्या आहेत ना, मग करूया
दुर्लक्ष!

परागचंही मन अंतर्यामी असंच आक्रंदत होते. असेल हीची ऑफिसमध्ये सिनिअर
पोस्ट म्हणून घरीसुद्धा तिनं मला डॉमिनेट करावं ही कुठली पद्धत? प्रत्येक
गोष्टीत हिचीच आवड अन् जबरदस्ती. एखादी गोष्ट ठामपणे सांगण्यासाठी सारखी
तोंडाची टळकी अन् त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर अळी-मिळी गूप चिळी.
जेवताना सुद्धा तीच तऱ्हा आई ही भाजी चांगली करते असं म्हटलं तरी मी भाजी
वाईटच करते असा अर्थाचा अनर्थ.
वरील प्रसंग आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्या अनुभवातून आपणास
नेहमीच दिसून येतात. तरुण-तरुणी आपल्या जोडीदाराची तसंच संसाराची सुंदर
स्वप्न घेऊन लग्नाच्या रेशीमगाठी बांधतात. परस्परांविषयी त्यांच्या मनात
खूप अपेक्षा असतात. त्यातल्या काही रास्त असतात तर काही गैर अन् आपल्या
सर्वच अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत हा त्यांचा अट्टाहास असतो. परंतु
मनामध्ये असलेल्या अपेक्षा एकमेकांकडे व्यक्त केल्या नाही तर दोघांमध्ये
दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते.

जेव्हा आपण एकमेकांशी सुसंवाध साधतो तेव्हा परस्परांच्या अधिक जवळ येतो.
अर्थात एकमेकांशी मोकळेपणाने बोलल्यामुळे कुठलेही निर्णय निविर्वादपणे
घेता येतात. पण त्यासाठी जोडीदाराला आपले विचार स्पष्टपणे सांगण्याचे
स्वातंत्र्य हवं अन् दुसऱ्याने देखील आपल्या जोडीदाराच्या भावनेची कदर
करून त्याची दखल घेतली तर दोहोंच्या विचारांची देवाण-घेवाण होऊन
परस्परांमधील समजूतदारपण वृद्धींगत होतो.
एकमेकांबरोबरचा संवाद हा मुख्यत: दोन स्तरांवर होत असतो. एक म्हणजे
कण्टेण्ट अन् दुसरं इण्टेण्ट. कण्टेण्ट म्हणजे सांगण्यात आलेलं वाक्य अन्
इण्टेण्ट म्हणजे त्या वाक्याच्या मागे असलेल्या भावना. पती जेव्हा
पत्नीला तक्रारीच्या स्वरात विचारतो. तू कितीवेळ फोनवर मैत्रिणीशी गप्पा
मारतेस? हे झालं कण्टेण्ट. त्याच्या मागील भाव म्हणजे इण्टेण्ट हे की
थोडा वेळ आपणही गप्पा मारूया परंतु पत्नी त्यातून गैरसमज करून घेते की
मला मैत्रिणीशी बोलण्याचेही स्वातंत्र नाही. 
म्हणून जोडीदार काय सांगतो
यापेक्षा त्याची मागील भावना कोणती हे जाणणे जास्त गरजेच आहे.
एखादी गोष्ट शब्दातून व्यक्त होते असे नाही तर ती कृतीतूनही प्रतीत होत
असते. उदा. ऑफिसच्या कामामुळे जर कधी पत्नी उशीरा घरी आली तर पती तिला
चहा करून देतो किंवा पतीला आवडणारा गोड पदार्थ पत्नी किमान आठवड्यातून
एकदा तरी घरात बनवते ही छोटीशी कृती शब्दविना खूप काही सांगून जाते कारण
त्यामागे दिसून येतो जिव्हाळा, प्रेम व काळजी. अन् हे जाणण्याच कौशल्य
प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे. मंगेश पाडगावकरांची कविता सांगते
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमचं अगदी सेम असतं... :-)

- गौरी कोठारी
( क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट)

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top