नवरात्र साजरे करण्यामागचे कारण मार्कंडेय पुराणांतर्गत देवी महात्म्यात सांगितले आहे. जगात तामसी व क्रूर लोकांची संख्या वाढून ते इतरांना त्रास देऊ लागतात तेव्हा सज्जनांना त्रासमुक्त करण्यासाठी, त्यांना त्यांचे स्थान पुन्हा मिळवून देण्यासाटी शक्तीदेवता या धरतीवर अवतीर्ण होते. दुष्टांच्या निर्दालनासाठी देवीने अनेक अवतार घेतले.

सामान्यजनांना, विद्वानांना तिने पुन्हा सुख प्राप्त करून दिले. तिच्या या कर्तृत्वाबद्दल तिचे स्तवन व स्मरण करण्यासाठी नवरात्र साजरे केले जाते.
एका प्रसंगात देवीनेच सांगून ठेवले आहे, ''मी तुमच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहीन. संकटकाळी अनन्यभावाने मला शरण येताच मी प्रकट होऊन तुम्हास दुःखमुक्त करीन मी तुमच्यावर सदा प्रसन्न असावे म्हणून प्रत्येक अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नऊ दिवस घटपूजा, होमहवन वगैरे प्रकारांनी माझे पूजन करावे. माझ्यावर अचल निष्ठा ठेवून संकटसमयी जे माझी करूणा भाकतील त्यांच्या सुखासाठी मी सदैव जपत राहीन'' यावरून नवरात्र पाळण्याची परंपरा निर्माण झाली असावी, असे म्हणण्यास वाव आहे.

नवरात्रीतली प्रत्येक रात्र आदिशक्तीच्या पुढील नावावरुन प्रचलित आहे.

पहिली रात्र - शैलपुत्री
दुसरी रात्र - ब्रह्मचारिणी
तिसरी रात्र - चंद्रघंटा
चौथी रात्र - कुश्‍मांदा
पाचवी रात्र - स्कंदमाता
सहावी रात्र - कात्यायनी
सातवी रात्र - कालरात्री
आठवी रात्र - चामुंडा
नववी रात्र - सिध्दीदात्री

या आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख आपण रोज करून घेणार आहोत


दुर्गेचे पहिले रूप 'शैलपुत्री' या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला 'शैलपुत्री' असे नाव पडले आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत-महंत आपल्या मनाला 'मूलाधार' चक्रात स्थिर करतात. या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरवात होते.

या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हाता कमळाचे फूल आहे. आपल्या पूर्वजन्मात तीने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव 'सती' असे होते. तिचा विवाह शंकराशी झाला होता.

एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते. परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली. तेव्हा शंकराने तिला सांगितले, की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले आहे.

परंतु, मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही. वडीलांचा यज्ञ पाहणे, तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकूळ झाले होते. तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली.

सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही. तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही. आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट दिली नाही. सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते. नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला. तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले. दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दह‍ी वापरले होते. हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते, असे तिला वाटले.

आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवर्‍याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वत:ला योगाग्नीत जाळून घेतले. याची माहीती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उध्वस्त केला. सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती 'शैलपुत्री' या नावाने प्रसिद्ध झाली. पार्वती, हेमवती हे तिचेच नाव होते. 'शैलपुत्री' देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली. म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे. 

दुर्गेचे दुसरे रूप 'ब्रम्हचारिणी' :-> http://mannmajhe.blogspot.com/2011/09/blog-post_28.html

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
 

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top