आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो.धनत्रयोदशी या
सणामागे दोन मनोवेधक कथा आहेत .

कथा पहिली :

कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी
मृत्युमुखी पडणार असतो. आपला पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत
म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो
मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत
नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे
प्रवेशद्वारही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात
मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी
सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत
सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या
चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अशा
प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही
म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक
दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु
टळतो असा समज आहे.



प्राण हरण करण्याचे काम यमराजाकडे आहे. मृत्यू कोणालाच चुकला नाही आणि
चुकवता येत नाही; पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये, याकरिता धनत्रयोदशीस
यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा (तेरा दिवे) करून तो घराच्या
बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. एरव्ही दिव्याचे
तोंड दक्षिणेस कधीही नसते, केवळ या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस
करून ठेवावे. त्यानंतर पुढील मंत्राने प्रार्थना करावी.


मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह ।
त्रयोदश्यांदिपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।

अर्थ : धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन
त्याने मृत्यूपाश आणि दंडातून माझी सुटका करावी.



कथा दुसरी :
धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा
असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप
निवारणाकरितातूसमुद्र मंथन केले, तेव्हा त्यायून देवी लक्ष्मी प्रगट
झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून
धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही
म्हणतात.


आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या
दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या
पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ
आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व
देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज
खाल्ली तर व्याधि होण्याचा संभव नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे.
म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो

या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी
असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणून त्यांचे पूजन
करून वापरात आणल्या जातात. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत
घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते धनाची
पूजा करणे हा या सणामागील हेतू आहे. व्यापारी, दुकानदार लोक ह्या दिवशी
या दिवशी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंद्याची हत्यारे, सोने, नाणे
ह्यांची पूजा करतात. शेतकयांच्या दृष्टीने नवीन आलेले धान्य हेच त्यांचे
धन असते. त्यामुळे ते नवीन धान्याची पूजा करतात. त्यावेळी धने व गूळ
ह्यांचा नैवेद्य दाखवतात.ह्या सुमारास झेंडू व शेवंतीची फुले
मुबलकप्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे पूजेला झेंडू व शेवंतीची फुले वापरतात.
या दिवसापासून दारांत आकाशकंदील व पणत्या लावण्यास सुरूवात करतात.
व्यापारी वर्गात हा दिवस फार मोठा उत्साहाने साजरा करतात.

धनत्रयोदशी दिवशी करण्यात येणारे कुबेर पूजन:

आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शुभ मुहूर्तावर नवीन गादी किंवा जुनी गादी
साफ करून ठेवा. त्यानंतर नवीन बसण्याचे कापड टाका.
संध्याकाळनंतर तेरा दिवे लावून तिजोरीत कुबेराचे पूजा करा.
कुबेराचे ध्यान करताना खालील मंत्र म्हणा.



''श्रेष्ठ विमानावर विराजमान, गरूडाप्रमाणे भासणारा, दोन्ही हातात गदा
धारण करणारा, डोक्यावर श्रेष्ठ मुकुट करणार्‍या, भगवान शंकराचा प्रिय
मित्र निधीश्वर कुबेर मी तुझे ध्यान करतो आहे.''

खालील मंत्राद्वारे चंदन, धूप, दीप, नैवेद्य दाखवून पूजा करा.
'यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन-धान्य अधिपतये
धन-धान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा ।'
नंतर कापूर आरती करून फुले अर्पण करा.



आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top