भारतीय सण आणि उत्सव - INDIAN FESTIVALS 

 

गुढीपाडवा ( Gudhi padava ) - चैत्र हा हिंदूच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना आणि पहिल्या महिन्यातला पहिला सण म्हणजे " गुढीपाडवा ". ह्या दिवशी पासून नवीन मराठी वर्षाला सुरुवात होते. ह्या दिवशी बांबूची उंच काठी रेशमी खणाने किंवा वस्त्राने , रेशमी साडीने सजवतात. त्यावर चांदीचे किंवा तांब्या - पितळेचे पात्र ठेवले जाते. हार, गाठी, कडूलिंबाची डहाळी त्याला लावली जाते. अश्या तयार केलेल्या गुढीची पूजा करतात आणि ती अंगणात ( सध्या, अंगण राहिले नाही म्हणून ती खिडकीत किंवा टेरेस वर ) उभारली जाते. ह्या सणामागे एक कथा आहे ती अशी कि , चेदी नावाचा एक देश होता. तेथें वसू नावाचा राजा राज्य करीत होता. मोठा गुणी आणि धार्मिक होता तो. त्याच्या राज्यात प्रजा सुखी, समाधानी होती. पण पूढे त्याच्या मनात विरक्तीचे विचार आले. त्याने राजवाडा सोडला, राज्य सोडले; आणि तो अरण्यात गेला व तपश्चर्या करू लागला. त्याची घोर तपश्चर्या पाहून देव प्रसन्न झाला. त्याने राजाला वैजयंतीमाळा, विमान आणि वेळूची एक काठी दिली आणि सांगितले ," राजा, परत आपल्या राज्यात जा, सुखाने राज्य कर. प्रजेला सुखी ठेव. ही पूजाच मला आवडेल. आपले कर्तव्य मन लावून करणे , प्रामाणिकपणे करणे, हीच परमेश्वराची पूजा आहे. तेव्हा आपले कर्तव्य कर ! ". परमेश्वराच्या कृपेने राजाला आनंद झाला. त्यांची आज्ञा मानून तो आपल्या राज्यात आला. परमेश्वर प्रसन्न होऊन राजाला प्रसाद दिला , त्या दिवसाची आठवण ठेवण्याकरिता राजाने त्या वेळूच्या काठीला सजविले , तिची पूजा केली , ती या दिवशी ! आणि तेव्हापासून गुढीपाडव्याचा सण प्रचारात आला असे मानले जाते. गुढी पाडव्याच्या दिवशीच प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्षाचा वनवास संपवून आयोध्याला परत आले. दुसरी कथा अशी की ह्याच दिवशी श्रीरामांनी बालीचा वध केला. आणि त्याच्या जाचातून प्रजेची सुटका केली, तीही ह्याच दिवशी! त्यामुळे या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा पडली, असे मानतात. ब्रम्हदेवाला सृष्टीची निर्मिती करावीशी वाटली आणि या कार्याला त्यांनी सुरुवात केली, तीही याच पवित्र दिवशी. गुढी पाडव्याला आपण साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त मानतो. मुहूर्त म्हणजे शुभ दिवस. ( हिंदू धर्मातील हे साडेतीन मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा एक. विजयादशमी किंवा दशहरा / दसरा एक. कार्तिक शुद्ध प्रतिप्रदा किंवा बलिप्रतिपदा - दिवाळीतला पाडवा एक आणि वैशाख शुद्ध तृतीया किंवा अक्षय्य तृतीया , या सणाला अर्धा मुहूर्त मानतात ) गुढी पाडवा म्हणजे संवत्सर प्रतिपदा, ( संवत्सर म्हणजेच वर्ष ) वर्षाचा पहिला दिवस. शालिवाहन शकाची सुरुवात ! पूर्वी पैठण येथे सात वाहनांचे - शाली वाहनांचे राज्य होते. त्या काळी ' शक ' म्हणजे परकीय सर्व राज्यात धुमाकूळ घालीत होते; प्रजेला छळत होते. शालिवाहनांनी शकांवर मिळविलेल्या विजयापासून हा शक सुरु झाला.


वसंत गौरीचा उत्सव ( Vasant gouricha utsav ) :- चैत्र महिन्यात वसंत ऋतू असतो. या महिन्यात वसंत गौरीचा किंवा चैत्र गौरीचा उत्सव केला जातो. चैत्रातल्या शुद्ध तृतीयेला गौरी माहेरी येते आणि वैशाख शुद्ध तृतीयेला ती सासरी परत जाते. महिनाभर माहेरी आलेल्या माहेरवाशिणीचे स्वागत घरोघरी होते. त्यानिमित्त हळदी कुंकू करतात. गौरीची आरास केली जाते. सुवासिनी स्त्रियांना हळदीकुंकवाला बोलावले जाते. वसंतोत्सवाचा गुढी पाडव्यापासून प्रारंभ होतो.


रामनवमी ( Ram Navami ) :- चैत्र शुद्ध नवमीला रामनमवी असे म्हणतात. या दिवशी माध्यान्हीला,तिसऱ्या प्रहराला अयोध्या नगरीत प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. रामचंद्राचा हा उत्सव सर्व ठिकाणी राममंदिरातून साजरा केला जातो. राम हा विष्णूचा सातवा अवतार मानीत असल्यामुळे काही काही ठिकाणी विष्णु मंदिरातूनही हा उत्सव साजरा करतात. राम मंदिरातून चैत्र शुध्द प्रतिपदेपासून रामनवमीपर्यंत असा नऊ दिवस तर काही ठिकाणी द्वादशीपर्यंत म्हणजे बारा दिवस हा उत्सव साजरा करतात. ह्या दिवशी सकाळी अकराच्या सुमारास रामजन्माचे कीर्तन सुरु होते. दुपारी- मध्यान्हकाळी कुंची घातलेली छोटी राममूर्ती किंवा नारळ पाना फुलांनी सजविलेल्या पाळण्यात ठेवतात आणि पाळण्याला झोका देतात. सर्व भाविक फुले उधळतात आणि रामनामाचा जयजयकार करतात. रामजन्म झाल्यावर बालरामाचे सर्व सोहळे म्हणजे न्हाऊ माखू घालणे, अंगाईगीत म्हणून त्याला पाळण्यात झोपवणे वैगरे करतात. त्यानंतर उत्सवाची सांगता होते. काही ठिकाणी द्वादशीला पाऊलघडीचे कीर्तन होऊन हा सोहळा संपतो. ह्या दिवशी श्रीरामचरित्र कथा वाचल्या जातात. श्रीरामांना " मर्यादा पुरुषोत्तम " म्हणतात.


महावीर जयंती ( Mahavir Jayanti ) :- जैन धर्मातील लोक चैत्र शुद्ध त्रयोदशीला महावीर जयंती हा सण साजरा करतात. त्या दिवशी सर्व महावीरांची मंदिरे सजवितात. त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढतात. मिरवणुकीच्या पूढे घोड्यावर एका मुलाला बसवून त्याच्या हाती लाकडी पाळणा देतात. त्यावर जरीचे कापड असते. ' महावीर ' हे जैन धर्मातील चोविसावे तीर्थकर !. तीर्थकर म्हणजे अत्यंत पवित्र , संत श्रेष्ठ असे पुरुष किंवा आत्मे. त्यांना भगवान असेही म्हणतात. महावीरांनी आपल्या इंद्रियांवर ताबा मिळविला होता, इंद्रिये जिंकली होती; म्हणून त्यांना " जिन " असे म्हणत. आणि म्हणूनच त्यांनी प्रसूत केलेल्या धर्माला " जैन धर्म " असे नाव पडले. जैन धर्मात आजपर्यंत चोवीस तीर्थकर झाले. ऋषभनाथ हे पहिले तीर्थकर तर महावीर हे चोविसावे तीर्थकर. त्यांनी जैन या धर्माचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर केला आणि ह्याला वेगळेच महत्व स्थान प्राप्त झाले. वर्धमान महावीरांचा जन्म हा इ. स. पूर्वीचा. त्यांना महावीर हे नाव संगमदेवाने ठेवले. त्यामागची गोष्ट अशी की , वर्धमान एकदा एका वटवृक्षावर बसले असता संगमदेव त्यांच्यासमोर सर्परुपाने प्रकट झाले. ते ज्या वृक्षावर बसले होते , त्याला त्यांनी वेढले व वरती वर्धामानाकडे जाऊ लागले. परंतु आपल्याकडे येणाऱ्या त्या सापाला मारण्याची लवमात्रही इच्छा त्यांना झाली नाही. त्यांनी त्या सर्पामधले हिंसकत्व नष्ट केलें. तेव्हा संगमदेवाने त्यांना महावीर म्हटले आणि त्याच नावाने ते प्रसिद्ध झाले. महावीरांनी लोकांना समतेचा संदेश दिला. त्यांनी लोकांना सांगितले ," तुझा मोक्ष तुझ्या हाती आहे. चारित्र्य ही माणसाच्या जीवनातली फार महत्वाची गोष्ट आहे. चारित्र्यवान व्हायचे असेल, तर पाच आज्ञांचे पालन करणे आवश्यक आहे - १) कोणत्याही प्राण्याला शब्दाने , विचाराने किंवा कृतीने दुखवू नये. २ ) चोरी करू नये. ३) खोटे बोलू नये. ४) मादक पदार्थांचे सेवन करू नये. ५) कोणत्याही गोष्टीचा लोभ धरू नये.




हनुमान जयंती ( Hanuman jayanti ) :- चैत्र शुद्ध पौर्णिमा ही हनुमान जयंती! मारुतीच्या मंदिरात हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करतात. हनुमान चरित्रावरून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. हनुमंताच्या वडिलांचे नाव केसरी आणि मातेचे नाव अंजनी असे होते. अंजनीने महादेवाची आराधना केली. तिची तपश्चर्या सफल होऊन महादेव प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपाप्रसादाने तिला हनुमंतासारखा बलवान, पराक्रमी पुत्र झाला. हनुमंताचा जन्म सूर्योदयाचे वेळी झाला. हनुमंताचे नाव हनुमान पडले त्यामागे एक कथा आहे आणि ती म्हणजे , बाल मारुतीला भूक लागली होती. त्याच वेळी आकाशात सूर्य उगवत होता. उगवत्या सूर्याला पिकलेले फल समजून त्याने त्यावर झेप घेतली आणि तो सूर्याजवळ जाऊ लागला. ते पाहताच इंद्राने आपल्या वज्राने ( हत्याराचे नाव ) मारुतीला मारले. त्या आघाताने तो खाली आला. त्या वज्राचा प्रहर हनुवटीवर झाल्याने त्याचे नाव "हनुमान " असे पडले. रामायणात हनुमानाच्या कार्याचे फार मोठें वर्णन केलें आहे. हनुमान हा प्रभू रामचंद्रांचा एकनिष्ठ सेवक होता. हनुमानाला श्रीरामांशिवाय अन्य कोणताही ध्यास नव्हता. मारुती हा ब्रम्हचारी , सदाचारी, संपन्न जीवन , अचाट बलवान , तीक्ष्ण बुद्धिमत्ता , निस्सीम भक्ती, योग्य मार्गदर्शक अशा किती तरी गुणांनी संपन्न असा देव आहे आणि ह्यामुळेच हनुमान जयंती साजरी करून त्यांच्या ह्या गुणांचे स्मरण देवून आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा.





अक्षयतृतीया ( Akshayatrutiya ) :- वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षयतृतिया असे म्हणतात. या दिवशी जें जें पुण्य करावे. ते अक्षय - चिरकाल टिकणारे होते असे म्हणतात. जसं गुढी पाडव्याच्या माहितीत सांगितल्याप्रमाणे अक्षय तृतिया हा साडेतीन मुहूर्तातला अर्धा मुहूर्त आहे. ही तृतिया बुधवारी आली आणि त्या दिवशी रोहिणी नक्षत्र आले , तर ती महापुण्याकारक मानली जाते. या दिवसी स्त्रिया जलकुंभाची पूजा करून तो जलकुंभ दान देतात. तसे पहिले , तर आल्या गेल्याला , तहानलेल्याला पाणी द्यावे हे त्याचे प्रतिक! अक्षयतृतीया वैशाखात येते. त्या वेळी उन्हाची तीव्रता वाढलेली असते. त्यासाठीच आपल्या संस्कृतीने जलदानाचे तसेच उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी गरजूंना पंख , छत्री , पादत्राणेही दान करावीत, असे सांगितले आहे. अक्षय्य तृतीये संबंधी फार पूर्वीची एक कथाही प्रचलित आहे. शाकल नावाचे एक नगर होते. तेथें एक वाणी होता. धर्म त्याचे नाव होते. नावाप्रमाणेच तो धार्मिक होता. एकदा अक्षय्य तृतीयेचे महात्म्य त्याच्या कानांवर आले. त्याच्या धार्मिक मनाला ते पटले. तेव्हापासून दर वर्षी अक्षय्य तृतीयेला नदीवर आंघोळ करून पितरांना तीळ तर्पण करायचा. ब्राम्हणांना धान्याने भरलेले घट दान करायचा. त्याने हा नियम अनेक वर्ष चालू ठेवला. पूढे त्याला मृत्यू आला. पण या दिवशी केलेल्या पुण्याने पुढच्या जन्मात त्याला कुशावती नगरीचे राज्यपद मिळाले. राज्यपदाचा उपभोग घेताना त्याने मोठमोठें यज्ञ केलें, पुष्कळ दानधर्म केला; पण त्याला कधीच काहीही कमी पडले नाही. त्याचा खजिना कधीच रिकामा झाला नाही. कारण त्याने अक्षय्य तृतीयेच्या व्रताचे पालन केलें होते. त्या दिवशी भरपूर दानधर्म केल्याने त्याच्या पुण्याचा क्षय झाला नाही , . ह्या कथेवरून बोध घेऊन आपणही यथाशक्ती दानधर्म केला पाहिजे, पण ते सत्पात्री असले पाहिजे असेही शास्त्रात सांगितले आहे.





परशुराम जयंती ( Parashuram Jayanti ) :- अक्षय्य तृतिया हा दिवस आणखी एका गोष्टीसाठी मंगल , पवित्र दिवस मनाला जातो. ह्या दिवशी परशुरामाचा जन्म झाला. परशुराम हा विष्णूचा सहावा अवतार होय. हिंदू धर्मातील लोक मत्स, कच्छ, वराह, नृसिंह , वामन , परशुराम , राम , कृष्ण , बौद्ध आणि कलंकी असे विष्णूचे दहा अवतार मानले जातात. धर्माला जेव्हा ग्लानी येते, पृथ्वीवर जेव्हा अन्याय , जुलूम वाढतो तेव्हा परमेश्वर अवतार घेतो. परशुरामाचा अवतार दृष्टांच्या जुलुमांपासून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठीच झाला होता. परशुराम हा अत्यंत पितृभक्त आणि मातृभक्त होता. हे पटवणारी एक कथा आहे. एका सकाळी परशुरामाची आई रेणुका नर्मदा नदीवर अंघोळीसाठी गेली होती. येताना फुले -पत्री घेऊन यायचा तिचा नियम होता; पण त्या दिवशी तिला यायला उशीर झाला. जमदग्नी ऋषींची पुजेची वेळ टळू लागली; त्यामुळे ते अस्वस्थ झाले. जसजसा वेळ जाऊ लागला , उशीर होऊ लागला , तसतसे ते जास्त अस्वस्थ होऊ लागले. त्यांनी मन एकाग्र केलें तर त्यांनी काय होते आहे ते पहिले आणि ते भयंकर संतापले. रेणुका त्यांची पत्नी ज्या ठिकाणी आंघोळीसाठी गेली होती , तेथें चित्ररथ गंधर्व आपल्या परिवारासह जलक्रीडेला आला होता. त्याच्याकडे पाहण्याचा मोह तिला आवरला नाही. मनाने ती पतीत झाली. त्यामुळे तिला यायला उशीर झाला होता. रेणुका आश्रमात उशिरा आली आणि तिला आलेली पाहताच त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी आपल्या चारही मुलांना बोलावले आणि रेणुकेचे मस्तक तोडून टाकायला सांगितले. पित्याच्या आज्ञेसाठी परशुराम पुढे झाला व त्याने मातेचे डोके उडवले. आपल्या आज्ञेचे पालन केलेले पाहून जमदग्नी ऋषींनी परशुरामाला शाबासकी दिली व परशुरामाला हवा तो वर मागायला सांगितला. त्यावर परशुरामाने वर मागितला की ," मघाशी आपण रागावला होता. रागाने विचार करण्याची शक्ति नाहीशी होते ; त्यामुळे आपण चुकीची आज्ञा केलीत. आपली आज्ञा मी पालन केली ; पण त्यामुळे मला मातेच्या ( आईच्या ) हत्येचे पातक ( पाप ) लागले. आपण मला काही देणार असाल, तर माझी माता ( आई ) मला परत द्या. आणि मी तिचा वध केला , ही तिची स्मृती नष्ट करा. " परशुरामाने मागितलेल्या मागण्याने जमदग्नी ऋषी संतुष्ट झाले व त्यांनी रेणूकेला जिवंत केलें. परशुराम चरित्रातील या आदर्शांचे स्मरण करून ते आपल्या अंगी निर्माण करण्याचा प्रयत्न करावा यासाठीच परशुराम जयंती हा उत्सव साजरा करायचा. म्हणून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ती रात्रीच्या पहिल्या प्रहरात साजरी करतात. त्यानिमित्त उपवास करतात. पूजा, कीर्तनादी कार्यक्रम करतात. परशुरामाचे फार मोठें व सुंदर मंदिर हे कोकणात चिपळूणजवळ आहे. मंदिराजवळच्या गावाला परशूरा क्षेत्र असेच म्हणतात. दक्षिण भारतातही परशुराम जयंतीला फार महत्व आहे.






बुध्द जयंती ( Buddhajayanti ) :- वैशाखी पौर्णिमेला बुद्ध जयंती साजरी करतात. नेपाळ देशाच्या जवळ कपिलवस्तू नावाच्या नागरीतील शुद्धोधन नावाचा राजा व त्याची पहिली पत्नी मायावती ह्यांचा मुलगा" सिद्धार्थ गौतमाला " वैशाखी पौर्णिमेला नैरंजना नदीच्या काठी ध्यानमग्न असताना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली आणि म्हणून ह्या दिवशी बुद्ध जयंती साजरी करतात. . गौतम बुद्धांनी बौध्द धर्म स्थापन केला. मानवजातीच्या कल्याणासाठी अपरंपार कष्ट घेतले. त्यांना सुखाचा मार्ग दाखविण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य घालविले. गौतम बुद्धांच्या मते ,'" चांगल्या हितकार गोष्टी केल्या , तर त्यांचा परिणाम चांगला होतो आणि वाईट गोष्टी केल्या , तर त्यांचा परिणाम वाईट होतो आणि हे लक्षात घेऊन जीवनात आपण अष्टांग ( आठ ) मार्ग स्वीकारले पाहिजेत. ह्या अष्टांग मार्गांपैकी पहिला मार्ग , आपल्या जवळ यथार्थ म्हणजे योग्य विचारदृष्टी असली पाहिजे. काम ( इच्छा ), क्रोध म्हणजे राग, हिंसा या दोषापासून माणसाने दूर राहिले पाहिजे, हा दुसरा मार्ग, असत्य न बोलणे, सत्य आणि मधुर बोलणे म्हणजे हा तिसरा मार्ग. चोरी , व्यभिचार आणि प्राण्यांची हिंसा कधी करायची नाही हा चौथा मार्ग, शस्त्र, मांस, मद्य, विष यांचा व्यापार न करणे हा पाचवा मार्ग, इंद्रियावर ताबा ठेवणे हा सहावा मार्ग , सदा सावधानी वृत्ती ठेवायची हा सातवा मार्ग , आणि एकाग्रता साधून सतत चांगल्या कामात मनाला गुंतवून ठेवणे हा आठवा मार्ग होय. तसेच त्यांनी पाच आज्ञा दिल्या त्या म्हणजे हत्या करू नका , चोरी करू नका , खोटे बोलू नका, व्यभिचार करू नका , आणि मादक पदार्थांचे सेवन करू नका. गौतम बुद्धांनी सांगितलेले अष्टांग मार्ग आणि दिलेल्या पाच आज्ञा म्हणजे जीवनातील खरा सुखाचा मार्ग आहे आणि हेच बौध धर्माचे सार आहे. .




दशहरा ( Dashahara ) :- जेष्ठ शुद्ध प्रतिपदा ते जेष्ठ शुद्ध दशमीपर्यंत शंकराच्या देवळांतून हा उत्सव साजरा केला जातो. अनेक ठिकाणी शंकराच्या देवळांतून लघुरुद्र केलें जातात व अभिषेक केलें जातात. अभिषेक हे प्रतिक आहे. अभिषेक पत्रातून पाण्याची धार जशी सतत परमेश्वरावर पडत असते, तसे आपले मन सतत परमेश्वरचरणी असले पाहिजे. रुद्र हे शंकराचे एक स्तोत्र आहे. ते अकरा वेळा म्हटले की एक एकदष्णी होते. अकरा एकदष्णीचा एक लघुरुद्र. अकरा लघुरुद्रांचा एक महारुद्र आणि अकरा महारुद्र केलें की एक अतिरुद्र होतो. अशा प्रकारे अभिषेक करणे ही अभिषेक भक्तीची , उपासनेची एक पद्धत आहे. गंगा नदीच्या काठी या दहा दिवसांत जो उत्सव साजरा करतात, त्याला दशहरा असे म्हणतात. दशहरा म्हणजे गंगोत्सव. तसे पाहिले तर प्रत्येक नदी ही गंगेसमानच पवित्र आहे , गंगाच आहे. तिचा हा उत्सव.





 वटपौर्णिमा ( Vatpournima ) :- जेष्ठ शुद्ध पौर्णिमेला सुवासिनी स्त्रिया हे व्रत करतात. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी हे व्रत करतात. तीन दिवस उपवास करून पौर्णिमेला सत्यवान सावित्रीची पूजा करतात , या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रूढी , परंपरा मात्र वेगळीच आहे. सावित्रीचा पती सत्यवानाला ह्या वडाच्या झाडाखाली मरण आले आणि तिथेच सावित्रीने आपल्या श्रद्धेने, हट्टाने, मनोनिग्रहाने, चिकाटीने , आणि गोड बोलून व चातुर्याने यमधर्मराजाकडून सत्यवानाला पुन्हा जीवित केलें. म्हणून स्त्रिया वडाच्या झाडाचीच त्या दिवशी पूजा करतात.






आषाढी एकादशी ( Ashadhi Ekadashi ) :- प्रत्येक महिन्यात दोन पंधरवडे म्हणजे पक्ष असतात. एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष. या प्रत्येक पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणतात. या एकादशीपैकी आषाढ महिन्यातील आणि कार्तिक महिन्यातील एकादशी विशेष महत्वाची मानतात. त्यांना महाएकादशी असेही म्हणतात. याचे कारण असे की हिंदू समाजात अशी कल्पना आहे की , आषाढातील शुध्द एकादशीला भगवान विष्णु झोपी जातात , त्यामुळे या एकादशीला ' शयनी एकादशी ' म्हणतात. झोपी गेलेले भगवान विष्णु कार्तिकातील शुक्ल एकादशीला जागे होतात , त्यामुळे त्या एकादशीला ' प्रबोधिनी एकादशी' असे म्हणतात. आषाढापासून कार्तिक महिन्यापर्यंत पावसाळ्याचे दिवस असतात. , या काळात पूर्वी भरपूर , सतत पाऊस पडायचा. साहजिकच या चार महिन्यांत सूर्यदर्शन सहसा घडायचे नाही. वेदात भगवान विष्णूणा सूर्य म्हटले आहे. त्यामुळे भगवान विष्णू या काळात झोपी जातात अशी कल्पना आहे. विष्णूच्या या मोठ्या विश्रांतीमुळे आणखीही एक कारण आहे. पूर्वी आर्य लोक उत्तर धृवाकडील प्रदेशांत राहत होते. तेथें आठ महिने दिवस आणि चार महिन्यांत रात्र असायची. हे चार महिने म्हणजेच चातुर्मास! सूर्य नाही म्हणजे देवच नाही, तो कोठें तरी विश्रांतीला गेला आहे, अशी कल्पना त्या वेळच्या लोकांनी केली. हा सूर्य वृत्रासुर नावाच्या राक्षसाचा पाठलाग करीत समुद्रात हिंडत असतो असेही वर्णन पुराणात आहे. त्यामुळे सूर्य विष्णू हा समुद्रात विश्रांती घेत असतो असे मानलेलें आहे. या दोन्ही ( आषाढी आणि कार्तिकी ) एकादशीच्या दिवशी लोक उपवास करतात. विष्णूच्या , विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. सारेजण भक्तिरसात न्हाऊन जातात. एकादशीचे मोठेपण सांगणारी एक कथा पुराणात आहे, ती आहे भक्त प्रल्हादाची. भक्त प्रल्हाद हा विष्णूचा मोठा भक्त होता. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्याच्या नातवाचे नाव मृदुमान्य ! पण हा वृत्तीने प्रल्हादासारखा भक्त नव्हता, तर राक्षसी वृत्तीचा दृष्ट राक्षस होता. त्याने घोर तपश्चर्या केली व भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले आणि देवाने त्याला वर दिला की,' एक स्त्री सोडून तुला कोणीही मारू शकणार नाही' या वरामुळे तो उन्मत्त झाला व लोकांच्यावर अत्याचार, जुलूम करू लागला. त्याच्या भीतीने , त्रासाने एवढे मोठें भ्रम्हदेव , विष्णू आणि शंकर , पण तेही लपून बसले आणि काय करावे ? या राक्षसाला कसे ठार करावे? याचा विचार करीत असतानाच त्यांच्या श्वासातून एक शक्ति निर्माण झाली . ती अत्यंत तेजस्वी होती. तिचे नाव 'एकादशी'! आणि तिने मृदुमान्याशी लढाई करून त्याला ठार मारले.





गुरुपौर्णिमा ( Gurupournima ) :- आषाढ महिन्यातील , पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. याच पौर्णिमेला व्यास पौर्णिमाही म्हणतात. आपल्या संस्कृतीत गुरूंचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: गुरु: साक्षत्परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नम: या श्लोकात , गुरु हे प्रत्यक्ष ब्रमः असल्याने, परमेश्वरच् असल्याने मी गुरुला नमस्कार करतो. गुरुंच्यामुळे आपल्याला ज्ञान मिळते. जें गुरु आपल्याला ज्ञान देतात , त्यांच्याबद्दल क्रुतज्ञता, आदर , श्रद्धा , भक्ती करण्याचा दिवस म्हणजे ' गुरुपौर्णिमा '. गुरुपौर्णिमेला 'व्यास पूर्णिमा' ही म्हणतात. त्या दिवशी व्यासांचेही पूजन करतात. व्यास हे विद्वान , अधिकारी पुरुष आणि श्रेष्ठ आचार्य ; म्हणून त्यांचे पूजन करायचे. 'विष्णूसहस्त्र नाम' ह्या विष्णूच्या स्तोत्रात सांगितले आहे की , ब्रम्हदेव , विष्णु , महेश यांच्या सगळ्या शक्ति असणारी व्यक्ती म्हणजे भगवान व्यास होत. व्यास हे पराशर ऋषी आणि सत्यवतीचे पुत्र. व्यासांना अनेक नावे आहेत. वडिलांच्या नावावरून त्यांना 'पराशर' म्हणतात. , तर युमुनेतील एका बेटावर त्यांचा जन्म झाल्याने त्यांना 'द्वैपायन' , त्यांचा रंग काळा असल्याने त्यांना 'कृष्णद्वैपायन', त्यांनी आपली तपश्चर्या बद्रिकाश्रमात केली म्हणून त्यांचे आणखी एक नाव 'बादरयण' म्हणतात. व्यासांनी आपले अध्ययन ब्रम्हदेवाकडे केलें. त्यांच्या पत्नीचे नाव वाटिका. त्यांना एक मुलगा होता . त्याचे नाव शुकाचार्य. व्यासांनी 'महाभारत ' हा मोठा ग्रंथ गणपती देवाच्या सहाय्याने अखंड, न थांबता लिहिला. तसेच सर्वसामान्य लोकांना ईश्वरभक्तीकडे आकर्षित करण्यासाठी 'भागवत ' हा ग्रंथ लिहिला. याशिवाय अठरा पुराणे, ब्रम्हसूत्रे लिहिली,वेदांचे विभाग केलें. त्यांच्या या ज्ञान आणि व्यासंगामुळे त्यांना जगाच्या गुरुस्थानी मानले जाते. साऱ्या गुरुजनांचे प्रतिक म्हणून व्यासांची पूजा करतात आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणतात.






दिव्याची अवस ( दीपपूजन ) ( Divyachi Aavas- Dip pujan ) ;- आषाढ महिन्यातील अमावास्येला 'दिव्याची अवस' असे म्हणतात. अमावस्या म्हणजे चंद्रप्रकाश नसलेला दिवस. अंधारी रात्र. य दिवशी स्त्रिया गरातले दिवे ( समया , निरांजने इ. ) घासून लखलखीत करून पाटावर मांडतात. पाटाभोवती रांगोळी काढून , तेल वात घालून ते लावतात आणि मग त्यांची पूजा करतात. लाह्या- फुटाण्यांचा , पक्क्वन्नाचा नैवैद्य दाखवून प्रार्थना करतात,' हे दिव्या , तू सूर्यरूप आहेस, अग्निरूप आहेस , माझ्या पूजेचा स्वीकार कर , ह्या जगातील आणि माझ्या आयुष्यातीलच नाही तर माझ्या मनातील , अज्ञानातील अंधार सुद्धा दूर कर , माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. आपल्या संस्कृतीत दिव्याची पूजा म्हणजे अंधाराची पूजा व उपासना करायला सांगितली आहे. ' तमसो मा ज्योतिर्गमय' - अर्थ -अंधाराकडे जाऊ नकोस ; प्रकाशाकडे जा.





नागपंचमी ( Nagpanchami ) :- आषाढ महिना संपून श्रावण महिना चालू होतो आणि श्रावण महिन्यातला हा पहिला सण. श्रावण महिना म्हणजे निसर्ग सगळीकडे त्याच्या नवीन आणि मोहक रूपाने ओसंडून वाहत असतो , खुलत असतो. आपल्या पूर्वजांनी श्रावण महिन्यात विविध सणांची आणि व्रतांची गुंफण करून ठेवली आहे. नागपंचमी ह्या दिवशी नागाची पूजा करतात. लहान मुले मातीचा नाग करतात व त्याची पूजा करतात. खेडेगावात स्त्रिया वारुळाला जातात. वारूळ म्हणजे नागाचे घर , गाणी गात गात त्या तेथें जमतात. तेथें दुध ,लाह्या ठेवतात. हा सण का साजरा करतात तर यामागे एक कथा आहे ती कथा अशी - मणिपूर नावाचे एक गाव होते. तेथें एक शेतकरी राहत होता . एक दिवस तो आपले शेत नांगरीत होता. शेतात एक वारूळ होते. नांगरता नांगरता फाळ त्या वारुळावरून फिरला. वारूळ उध्वस्त झाले. त्या वारुळात नागिणीची पिल्ले होती. ती मारली गेली. नागीण बाहेर गेली होती. येऊन पाहते तो मुले मेलेली. काय झाले, ते तिला कळले. ती संतापली , चिडली आणि तिने शेतकऱ्याच्या साऱ्या कुटुंबाला दंश केला. सगळे मेले. शेतकऱ्याच्या एका मुलीचे लग्न झाले होते. नागीण तिकडे निघाली आणि तिच्या घरी पोहोचली ; पण आतले दृश्य पाहून ती दारातच थबकली . ती मुलगी पाटावर नागाचे चित्र काढून त्याची पूजा करीत होती. पूजा झाली ,तिने दुधाचा नैवैद्य दाखविला , नागाला नमस्कार केला आणि हात जोडून . सुखी ठेव ' अशी प्रार्थना केली. ते पाहून नागीण संतोषली. शांत झाली. शेतकऱ्याच्या मुलीवर प्रसन्न झाली. तिच्या कुटुंबियांना तिने पुन्हा जिवंत केलें. तो दिवस होता शुद्ध पंचमीचा! तेव्हापासून श्रावण शुद्ध पंचमीला नागपूजनाची प्रथा पडली. तीच नागपंचमी! नागपंचमीच्या दिवशी अजून एक घटना घडली ती अशी की , भगवान श्रीकृष्णांनी कालिया नावाच्या सर्पाचा पराभव केला. कालिया यमुनेच्या डोहात राहत होता . वज्रवासियांना त्रास देण्यासाठी तो यमुनेच्या डोहात विष कालवीत असे. यमुनेचे पाणी विषारी झाल्याने लोकांचे हाल होत. त्याला हाकलून देऊन , यमुनेचे पाणी सर्वाना पिण्यासाठी स्वच्छ करावे म्हणून श्रीकृष्ण एकटाच तिकडे गेला. त्याचाशी युद्ध केलें व त्याने त्याचे नरडेच पकडले. तो कासावीस झाला. त्याची बायका पोरे घाबरली आणि ती त्याचे जीवदान मागू लागली. अखेर आपल्या सर्व परिवारासह तेथून निघून जाण्याचे व पुन्हा कधीही वज्रवासियांना त्रास न देण्याच्या अटीवर कृष्णाने त्याला सोडले. यमुनेच्या डोहातून कालिया निघून गेल्यावर यमुनेचे पाणी स्वच्छ आणि विषरहित झाले. नाग पंचमी हा स्त्रियांचा सण. ह्या दिवशी सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात. वेग वेगळे खेळ रंगतात. गावाकडे झाडावर झोके टांगले जातात. उंच उंच झोके घेण्याची स्पर्धाच लागते. झिम्मा , फुगड्या रंगतात. फेर घेऊन गाणी गायिली जातात. या दिवशी मुली हातावर मेंदी काढतात. निसर्गाच्या रंगात त्याही रंगून जातात.







मंगळागौरी ( Mangalagouri ) :- श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीची पूजा करण्याची रीत आहें. मुलींचे लग्न झाल्यापासून पाच वर्षे हे व्रत करतात. धोत्रा, मोगरा, माका, बेल, तुळस, शमी, आघाडा, डोरली, कण्हेरी, रुई , अर्जुन, विष्णुक्रांत, दुर्वा वगैरे प्रकारची पत्री व फुले आणतात. दुपारी सोळा सुवासिनीसह न बोलता भोजन करतात. रात्री सोळा वातींची आरती ओवाळतात आणि सुवासिनींच्या ओट्या भरतात. रात्री भोजन न करता गाणी, खेळ, नृत्य व फुगड्या वगैरे प्रकारांनी सर्व रात्र मोठ्या आनंदात घालवतात, दुसरे दिवशी सकाळी गौर विसर्जन करतात.






श्रियाळषष्ठी ( Shriyalshashthi ) :- नागपंचमीच्या दुसऱ्या दिवसाला श्रियाळषष्ठी म्हणतात. कोणाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करितात? ह्यामागची कथा अशी की , चौदाव्या शतकात श्रियाळशेठ किंवा शिराळशेटी हा वाणी होता आणि मनाने खूप उदार होता. सर्व प्राणीमात्रावर दया करणारा आणि त्यांच्या हितासाठी अहोरात्र धडपडणारा, कार्य करणारा होता. त्याचे कार्य चालू असताना दुष्काळ पडला आणि तो बारा वर्ष होता. चौदाव्या शतकात पडलेल्या या दुष्काळाला ' दुर्गादेवीचा दुष्काळ ' म्हणतात. ह्या दुष्काळाने लोकांचे खूप हाल झाले. प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही. लोकांची उपासमार होऊ लागली. शिराळ शेटनें हे पहिले. त्याने लोकांना मदत करायचे ठरविले. त्याने महाराष्ट्र आणि गुजराथ प्रांतात हजारो बैल फिरते ठेवले आणि सर्व लोकांना धान्याचा पुरवठा केला. खुद्द बादशाहने त्याला बोलावून घेतले. आपला आनंद व्यक्त करून, त्याचे गुणगान गायून बादशहा म्हणाला ,' शेटजी , तुला काय हव ते माग, मी देतो ', शिराळ शेटीने क्षणभर विचार केला आणि बादशहाला म्हणाला ," द्यायचेच असेल तर फक्त साडेतीन घटका मला तुमचे राज्य द्या. " बादशहाचे राज्य मिळताच शिराळशेटीने पूर्वी बहामनी राज्यात पूर्वीच्या बादशहाने जी जी धर्मसंस्थाने, देवस्थाने खालसा केली होती , ती मुक्त केली. काही देवस्थानांना इनामे दिली, नेमणुका करून दिल्या आणि स्वतःसाठी काहीही न घेता साडेतीन घटकांचे मिळालेले राज्य बादशहाला परत केलें. अशा उदार , लोकांच्या हितासाठी सतत कार्य करणाऱ्या शिराळ शेटीचे स्मरण ठेवून श्रियाळषष्ठी साजरी केली जाते.







नारळी पौर्णिमा ( Narali Pournima ) :- श्रावणातल्या पौर्णिमेला वेग वेगळ्या भागात वेग वेगळे विधी केलें जातात. उत्तर भारतात या दिवशी रक्षा बंधन केलें जाते. त्यावरून तिकडे या पौर्णिमेला राखी पुनव म्हणतात. बऱ्याच भागातील लोक या दिवशी आपल्या मनगटावर अथवा गळ्यात सुताचे पोवते बांधतात म्हणून याला पोवती पौर्णिमा असेही म्हणतात. तसेच समुद्राकाठचे लोक या दिवशी समुद्राची पूजा करतात , त्याला यथाविधी नारळ अर्पण करतात म्हणून या पौर्णिमेला " नारळी पौर्णिमा " म्हणतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण - पर्जन्याची ( पावसाची ) देवता, तिच्यासाठी समुद्राची पूजा करून, नारळ अर्पण करण्याची पद्धत आहे. पौर्णिमेच्या आधी दोन महिने भरपूर पाउस पडत असतो. त्याचे ते स्वरूप महाभयंकर असते. त्या स्थितीत समुद्रात संचार करणे कोळी लोकांना केवळ अशक्य असते. श्रावणी पौर्णिमेपासून समुद्रा शांत होतो. गलबते , पाडाव , होड्या , पूर्ववत फिरू लागल्या तरी धोका राहत नाही . त्यांना पुढील काळात धोका होऊ नये, आपला व्यापार कोणत्याही प्रकारचे विघ्न , संकट न येता पार पडावा या करिता त्या दिवशी समुद्राची पूजा करतात. या पौर्णिमेची आणखी एक विशेषता म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी रेशमाच्या धाग्याची राखी बहिणीने भावाच्या हातात बांधायची असते. बहिणीचे रक्षण करण्याची जबाबदारी भावावर असते. या पौर्णिमेचे आणखी एक नाव म्हणजे पोवती पौर्णिमा! पोवते याचा अर्थ 'पवित्र'. पोवते घालण्याच्या या विधीस पवित्रोरोपण असे नाव आहे. या दिवशी सुताची ही पोवती देवास अर्पण करण्याची, स्वत; गळ्यात किंवा बोटावर घालण्याची पद्धत आहे.





गोकुळ अष्टमी ( Gokul Ashtami ) :- श्रावणात सर्वात महत्वाचा उत्सव म्हणजे जन्माष्टमी. श्री कृष्ण जन्माचा ! भारतीय संस्कृतीतील दोन महत्वाची नावे ती म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र आणि जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण ! श्रावण वद्द्य अष्टमीला मध्यरात्री कंसाच्या ( श्रीकृष्णाचे मामा ) बंदिशाळेत भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला ; म्हणून या अष्टमीला जन्माष्टमीही म्हणतात. या दिवशी श्रीकृष्णाच्या आणि विष्णूच्या देवळात हा उत्सव मोठ्या थाटात साजरा करतात. मधुर , वृंदावन , द्वारका या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात, उत्साहाने साजरा करतात. भजन, कीर्तन होते. मध्यरात्री बाल कृष्णास पाळण्यात घालतात, पाळणा म्हणतात. ह्या दिवशी उपवास ही केला जातो. याच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला, दहीहंडीचा कार्यक्रम होतो.







पोळा ( Pola ) :- श्रावणी आमावस्येला शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आणि आनंदाची असते. ते या दिवशी पोळ्याचा सण साजरा करतात. कोकणात हा सण आषाढात साजरा करतात. काही ठिकाणी हा सण भाद्रपद आमावस्येला साजरा करतात. या सणाला 'बेंदूर' असेही म्हणतात. या दिवशी सारे शेतकरी बैलांना सकाळी तेल लावतात व त्यांना स्वच्छ आंघोळ घालतात, त्यांच्या शिंगाना रंग व बेगड लावून सजवतात, त्यांच्या अंगावरही रंगानी नक्षी किंवा आकृत्या काढतात , अंगावर झूल घालतात, शिंगाना बाशिंगे बांधतात, गळ्यात आणि पायात घुंगरमाळा (घुंगरांच्या माळा ) घालतात. त्यांची पूजा करतात. आणि त्यांची मिरवणूक काढून त्यांना देव दर्शनाला घेऊन जातात. इतर लोकही या दिवशी मातीचे बैल तयार करून त्यांची पूजा करतात व त्यांना नैवैद्य दाखवितात. अशा तर्हेने शेतकऱ्यांच्या मेहनतीत निम्याने हातभार लावणाऱ्या , त्यांना साथ देणाऱ्या बैलांना सन्मानाने , आनंदाने व मोठ्या क्रुतज्ञतेच्या भावनेने पूजतात व त्यांना त्या दिवशी पूर्ण आराम देतात. तसेच शंकराचे वाहन नंदी आहे ; यावरून खूप प्राचीन काळापासून आपण बैलांना मान देतो. त्यांना पूजनीय मानतो.



गणेश चतुर्थी ( Ganesh Chaturthi ) :- भाद्रपद शुद्ध चतुर्थी पासून दहा दिवस म्हणजे अनंतचतुर्दशी पर्यंत गणेश उत्सव साजरा केला जातो. भाद्रपद शुध्द चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणतात. प्रत्येक महिन्याच्या शुध्द चतुर्थीला ' विनायकी चतुर्थी ' म्हणतात; तर वद्द्य चतुर्थीला ' संकष्टी चतुर्थी ' म्हणतात. संकष्टी चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला ' अंगारिका चतुर्थी ' म्हणतात. ही महत्वाची मानली जाते. भाद्रपदातील गणेश चतुर्थीला 'महासिद्धी विनायकी चतुर्थी' म्हणतात. गणेश चतुर्थी हा गजाननाचा जन्मदिवस! त्याच्या जन्माची कथा अशी की एकदा पार्वती स्नान करण्यासाठी स्नानगृहात गेली असता ,तेथें कुणी येऊ नये म्हणून तिने आपल्या मळापासून एक मूर्ति तयार केली व तिच्यावर द्वार-रक्षणाचे काम सोपावले. थोड्या वेळाने शंकर तेथें आले ,आत जाऊ लागले ; पण द्वाररक्षकाने त्यांना आत जाऊ दिले नाही , त्यांना अतिशय राग आला. त्यांनी रागाच्या भरात त्याचे डोके उडविले. तेवढ्यात स्नान करून पार्वती बाहेर आली. तिला सारा प्रकार समजताच तिने त्या मूर्तीची जन्मकथा शंकरांना सांगितली. पार्वतीच्या मानस पुत्रास मारल्याबद्दल त्यांना वाईट वाटले. त्यांनी आपल्या गणांना आज्ञा केली . " जो प्रथम भेटेल त्याचे शिर ( डोके ) कापून आणा. " गणांना प्रथम एक मृत ( मेलेला ) हत्ती दिसला. त्यांनी त्याचे शिर कापून आणले. शंकरांनी ते शिर पार्वतीच्या मानसपुत्राच्या धडास चिकटविले आणि त्याला जिवंत केलें. त्याचे तोंड हत्तीचे होते; म्हणून त्याला "गजानन " ( गज = हत्ती , आनन = तोंड ) हे नाव पडले. पुढे शंकरांनी त्याला आपल्या गणांचा ईश म्हणून मुख्य केला , म्हणून त्याला गणेशही म्हणतात. भाद्रपद शुध्द चतुर्थी या त्याच्या जन्मदिवशी तो काशी राज्याच्या रत्नापुराहून निघाला. त्याने दहा दिवस प्रवास करून सिंदूरपुरात आपल्या आई - वडिलांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्याच दिवशी म्हणजे भाद्रपद शुध्द चतुर्थी ते चतुर्दशी या दहा दिवसांत या गजाननाचे पूजन, उपासना होऊ लागली ; उत्सव साजरा होऊ लागला. लोकमान्य टिळकांनी जनतेत राजकीय जागृती निर्माण करण्यासाठी , समाजात ऐक्य निर्माण करण्यासाठी , पुण्यामध्ये सार्वजनिक गाणेशोत्सवाची पद्धत सुरु केली. तेव्हापासून हा सण मुख्यत्वे महाराष्ट्रात सगळीकडे साजरा करतात. सगळीकडे चौकाचौकात सार्वजनिक मंडळ तयार होऊन प्रत्येक मंडळाचा गणपती बसतो. ह्या सणाला राष्ट्रीय सण मनाला जातो. ठिकठिकाणी सार्वजनिक गणपतीची स्थापना केली जाते. नेत्रदीपक विद्युतरोषणाई केली जाते. पौराणिक , ऐतिहासिक , सामाजिक असे भव्य देखावे उभे केलें जातात. सर्व लोक हे देखावे पाहण्यासाठी शहरात येत असतात, या दिवसांत रात्री शहरातले रस्ते गर्दीने तुडुंब भरलेले असतात. हा सण दहा दिवस म्हणजे अनंत चतुर्थदशी पर्यन्त साजरा केला जातो . ह्या दिवशी गणपती बाप्पाचे वाजत गाजत विसर्जन केलें जाते व त्याला आवर्जून प्रार्थना केली जाते ," गणपती बाप्पा मोरया , पुढच्यावर्षी लवकर या " अनंत चतुर्दशी दिवशी मध्यान्हकाळी स्नान करून अनंताची पूजा करतात. शुद्ध उदकाचा भरलेला कलश ( तांब्या ) घेऊन त्यास दोन पंचे गुंडाळून त्यावर दर्भाचा शेष ( नाग ) तयार करून ठेवतात , कलशावरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळीग्राम मांडून षोडोपचारे त्यांची पूजा करतात. त्याच प्रमाणे चौदा गाठी मारलेला असा तांबडा रेशमाचा दोरा घेऊन त्याचीही पूजा करतात. या दोऱ्यास अनंत म्हणतात. ; त्याच बरोबर अनंती मिळते. अनंत पुरुषाने व अनंती त्याच्या पत्नीने बांधायची असते. पूजा झालावार तो दोरा उजव्या हातावर बांधतात. गणपती ही विद्येची , कलेची देवता आहे. गणपतीची उपासना करणारही एक पंथ आहे. त्याचे नाव " गणपत्य पंथ "! पुण्याजवळ चिंचवड गावात मोरया नावाचे श्रेष्ठ साधुपुरुष होऊन गेले. त्यांनी गणपती -भक्तीचा खूप प्रचार केला. त्यामुळे गणपतीस "मंगल मूर्ति मोरया " या नावाने ओळखले जाते. गणपती हा अतिशय लोकप्रिय देव आहे. त्याला भारतात वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळी नावे आहेत. कानडीत गणेश चतुर्थीला ' बेनकन हब्ब ' ' तेलगूत ' पिल्लेयर चवती ',( पिल्लेयर म्हणजे गणपती ) , तमिळ प्रांतात गणपतीला ' तुंबिकाई अलवर' ( म्हणजे बुद्धिमान गणपती ) म्हणतात. तशी गणपतीला हिंदू संस्कृतीत १०८ नावे आहेत.




ऋषीपंचमी ( Rushipanchami ) : - भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी नंतरचा दिवस ( पंचमी ) म्हणजे ऋषीपंचमी!. हे स्त्रियांचे व्रत मानले जाते. स्त्रियाकडून मासिक धर्म पाळण्यात जर काही चुका झाल्या तर त्याच्या पापातून मुक्त होण्याकरिता हे व्रत केलें जाते. दुसरे असे की ह्या दिवशी जनावरांच्या कष्टाचे अन्न सेवन करीत नाहीत. तसेच जुन्या विद्वान ऋषीबद्दल आदर व्यक्त करण्याचा , निष्ठा व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. ज्या ऋषींनी आपल्याला ज्ञान देऊन. संस्कृती देऊन आपल्यावर अनंत उपकार केलें आहेत ,त्यांचे स्मरण करण्याचा हा दिवस.




महालक्ष्मी ( Mahalakshmi ) :- गणपतीच्या उत्सव बरोबर महालक्ष्मीचा उत्सवही साजरा केला जातो. भाद्रपद शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्राबरोबर त्यांचे आगमन होते. दुसऱ्या दिवशी त्यांची पूजा केली जाते. या दिवशी त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य दाखवितात. आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर त्यांचे विसर्जन केलें जाते या सणालाच ' जेष्ठागौरी ' असेही म्हणतात हा सण का साजरा करतात तर त्यामागे एक कथा आहे ती अशी , फार वर्षापूर्वी कोलासुर नावाचा एक राक्षस होता. तो स्त्रियांना फार त्रास देत असे. स्त्रिया त्याच्या त्रासाला कंटाळून गेल्या होत्या. साऱ्या स्त्रिया एकत्र आल्या व त्यांनी ब्रम्हदेव, विष्णु, आणि शंकर या तीनही देवांची प्रार्थना केली. त्यांना संकट काय आहे ते सांगून , कोलासुराचा नाश करण्याची विनंती केली. या तीनही देवांनी हे काम विष्णुपत्नी महालक्ष्मी हिच्याकडे सोपविले. तिने कोलासुराशी युद्ध करून त्याचा नाश केला आणि स्त्रियांना संकटमुक्त करून सर्वाना सुखी केलें. त्या उपकाराचे स्मरण करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. हा स्त्रियांचा उत्सव! स्त्रिया मोठ्या आनंदाने हा उत्सव साजरा करतात. उत्सव एकाच असला तरी हा उत्सव वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात. काही ठिकाणी खड्यांच्या गौरी असतात . स्त्रिया नदीतीरावर किंवा जलाशयाच्या काठी जाऊन पाच किंवा दोन छोटे खडे घेतात व ते खडे धुऊन ताम्हनात ठेवतात आणि गौरी म्हणून घरी आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी गौरीचे शाडू मातीचे किंवा पितळी मुखवटे असतात. काही ठिकाणी मातीचे पाच घट एकावर एक ठेवून त्यावर मुखवटा बसवतात. अशी ती प्रतिमा तयार करतात. अशा गौरीची स्थापना करून त्यांना सजवतात पुढे सुंदर रांगोळ्या काढतात , समया तावात ठेवतात, पुढे लाडू , करंज्या , अशी फराळाची ताटे ठेवलेली असतात, फळांची ताटे ठेवतात, उदबत्यांचा सुगंध दरवळत असतो. विद्युत रोषणाई केली जाते. आणि सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलावले जाते.



नवरात्र उत्सव ( Navaratra utsav ) :- आश्विन महिन्याची सुरुवातीचा पहिला सण म्हणजे ' घटस्थापना '. या महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध दशमीपर्यंत म्हणजे दसऱ्यापर्यंत नवरात्र उत्सव साजरा करतात. हा महिषासुरमर्दिनी अष्टभुजा शक्तीदेवीचा उत्सव असतो. देवी भागवतात एके प्रसंगी भक्तांना सांगितले आहे , " मी तुमच्यावर सदा प्रसन्न असावे; म्हणून प्रत्येक आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नऊ दिवस घटपूजा, होम हवन आदि प्रकाराने माझे पूजन करावे. माझ्यावर अचल निष्ठा ठेवून संकट समयी जें माझी करुणा भक्तील , त्यांच्या सुखासाठी मी सदैव तत्पर राहीन". यावरून नवरात्राची रूढी प्रचारात आली आहे. हा शक्ति देवीचा उत्सव !. या देवीच्या जन्माची कथा अशी , महिषासुर नावाचा एक राक्षस होता. तो फार उन्मत झाला होता. त्रिभुवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या मालकीची असावी , तीवर आपले नियंत्रण असावे , म्हणून त्याने इंद्र देवाला हटवले आणि त्याचा सर्व राज्य कारभार आपल्या हाती घेतला , त्यामुळे सगळीकडे अनर्थ ओढवला. एवढे मोठें पराक्रमी देव, पण ते भयभीत झाले. काय करावे त्यांना सुचेना. अखेर सर्व देव एकत्र आले आणि ब्रम्हा , विष्णु, आणि महेश यांना ते शरण गेले. महिषासुराच्या अन्यायाच्या , अत्याचाराच्या कहाण्या त्यांनी सांगितल्या आणि त्याच्या त्रासापासून आम्हाला सोडवावे, अशी त्यांनी विनंती केली. ते सारे ऐकून ब्रम्हा , विष्णु , महेश अतिशय संतापले आणि त्या तिघांनी आपल्या शक्तीच्या अंशापासून एक देवी निर्माण केली आणि तिला वेगवेगळ्या शस्त्रांनी सज्ज करून महिषासुराचा नाश करण्यासाठी पाठविले. तिचे आणि राक्षसाचे घनघोर युध्द झाले. आश्विन शुध्द प्रतिपदेपासून पुढे नऊ दिवस हे युद्ध चालले होते. अखेर शक्तीदेवीने त्या राक्षसाचा वध करून सर्व देवांना आणि सृष्टीला त्याच्या त्रासापासून मुक्त केलें. त्यामुळे शक्तीदेवीस महिषासुरमर्दिनी असे म्हणतात व नवरात्रात तिचा उत्सव मोठ्या थाटाने , भक्तीने , प्रेमाने, आनंदाने , उत्साहाने साजरा करतात. महिषासुराचा वध करण्यासाठी परमेश्वराच्या शक्तीरूपाने स्त्रीचा अवतार धारण केला होता. या अवताराचे वेगवेगळ्या रूपांत पूजन केलें जाते. ब्रम्हदेवापासून महासरस्वती , विष्णूपासून महालक्ष्मी आणि महेशापासून महाकाली या देवी निर्माण झाल्या असे पुराणात सांगितले आहे. हा उत्सव साजरा करण्याची वेग वेगळ्या पद्धती आहेत. काही ठिकाणी पाच घट एकावर एक असे ठेवतात. त्यात पाच खारका, खोबऱ्याचे पाच तुकडे , पाच छोटे दगड इत्यादि पदार्थ ठेवतात. त्याच्याभोवती धान्य पेरतात नि त्या घटांची पूजा करतात. काही ठिकाणी जमीन गायीच्या शेणाने सारवतात. त्या जमिनीवर शेतातली काळीभोर मती पसरून एक चौरस तयार करतात. त्यात मधोमध घट ठेवतात. त्यात एक नाणे, सुपारी, पंचरत्न या वस्तू टाकतात. ( सोने , मोती, हिरा, प्रवाळ आणि पाचू किंवा माणिक यांना पंचरत्न म्हणतात. ) त्यावर आंब्याची पाच पानांची डहाळी ठेवतात किंवा काही ठिकाणी नागवेलीची पाने ठेवतात. त्यावर नारळ ठेवतात, मातीवर नऊ प्रकारची धान्ये पेरतात. या घातला रोज एक तिळाच्या किंवा झेंडूच्या फुलांची माळ बांधतात. काही ठिकाणी या माळा वाढत्या संख्येने म्हणजे पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दोन याप्रमाणे बांधतात. घटाजवळ नंदादीप तेवत ठेवतात. नवमीपर्यंत सप्तशतीचा पाठ वाचवतात. तर काही ठिकाणी अष्टमीला देवीच्या देवळात घागरी फुंकण्याचा कार्यक्रम असतो. काही ठिकाणी पाचव्या दिवशी किंवा अष्टमीला कडकण्याचा नैवेद्य ( मैदाच्या बनवतात त्यात देवीसाठी आरसा , वेणी , फणी, कुंकवाचा करंडा असे बनवून घटाला लावतात ) ' देवी - भागवत ' या पुराणाचे पारायण करतात. उपोषण किंवा एक वेळ भोजन करतात. रोज सुवासिनी , कुमारिका यांना जेवू घालतात व त्यांचे पूजन करतात. शेवटच्या दिवशी होम -हवन करतात. अशा विविध तऱ्हेने देवीची उपासना केली जाते. नऊ दिवसानंतर घटाचे विसर्जन केलें जाते. रुजलेल्या धान्याची रोपेही घटाबरोबर विसर्जन करतात. काही रोपे प्रसाद म्हणून स्त्रिया आपल्या केसात माळतात, तर पुरुष आपल्या टोपीत घालतात. देवीचा हा सण वेग वेगळ्या प्रांतात निरनिराळ्या प्रकारांनी साजरा करतात. बंगाल , बिहार , ओरिसा , आसाम , उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश या प्रांतातून दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. बंगालमध्ये हा सण दुर्गापूजा ह्या नावाने दहा दिवस साजरा करतात. हा सण वर्षातला प्रमुख सण आहे. गुजराथ आणि काठेवाडीतही हा उत्सव साजरा केला जातो. तेथील घट स्थापनेची पद्धत थोडीशी वेगळी आहे. दुर्गादेवीचे प्रतिक असलेल्या त्रिशुळाचे चित्र शेंदाराने भिंतीवर काढतात. या त्रिशुळाखाली मातीचा ढीग करून त्यावर धान्य पेरतात. मधोमध घट बसवून त्यावर नारळ ठेवतात व त्याची पूजा करतात. त्या वेळी नंदादीप लावलेला असतो. गुजराथी स्त्रिया घटाभोवती फेर धरून गरबानृत्य करतात आणि गाणी गातात. कर्नाटकातही हा उत्सव "नाडहब्बा" ह्या नावाने साजरा करतात. प्रांत, भाषा वेग वेगळी पण शेवटी भक्ती एकच.




दसरा (Dasara) :- अश्विन शुध्द दशमीला दसरा हा एक सण साजरा करतात. या तिथीला ' विजयादशमी ' असे म्हणतात. नवरात्र समाप्तीच्या दिवशी हा सण येतो. काही घराण्यात नवरात्र नवव्या दिवशी ( नवमीला ) उठवतात , तर काही ठिकाणी दहाव्या दिवशी उठवतात. या दिवशी सीमोल्लघन , शमीपूजन , अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा अशा चार गोष्टी करायच्या असतात. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे हा दिवस सर्व कामांना शुभ मानतात. हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जातो. पूर्वी हा कृषीमहोत्सव होता. पावसाळ्यात शेतकरी धान्य पेरतात, ते पिक तयार झाल्यावर घरात आणण्याच्या वेळी हा सण साजरा केला जात होता. कित्येक जण नवमीच्या दिवशी शेतात तयार झालेले भाताचे लोंगर घरी आणून त्यांची पूजा करतात. घराच्या प्रवेशद्वारी हे लोंगर टांगून ठेवतात. कोकणात हे कणसे घरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यांना भांडून ठेवण्याची पद्धत आहे. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून वाटतात किंवा ती लुटतात असे म्हणतात. ह्या मागे एक कथा प्राचीन काळातील म्हणजे रामाच्याही आधीची , रघुवंशातील राघुरायाची कथा आहे ती अशी, एकदा रघुराजाने ' विश्वजित ' नावाचा यज्ञ केला. विश्वजित यज्ञ म्हणजे, आपल्या पराक्रमाने सर्व पृथ्वी जिंकायची आणि जिंकलेले सारे राज्य , सोने नाणे , रत्ने हे गरजू लोकांना दान करून टाकायचे. राघुराजाचा हा यज्ञ संपला. त्याने आपल्या सगळ्या गोष्टींचे दान केलें. आणि त्याच वेळी वरतंतू या ऋषींचा विद्वान शिष्य कौत्स हा त्यांच्याकडे दान मागण्यासाठी आला. त्या गुरुंनी त्याला चौदा विद्या शिकविल्या होत्या. त्याला गुरुजीना गुरुदक्षिणा द्यायची होती , ती होती चौदा विद्यांसाठी चौदा कोटि सुवर्णमुद्रा! खरं तर , गुरुजींनी त्याला सांगितले होते की तू शिकलास , ज्ञानी झालास, हीच माझी गुरुदक्षिणा !. पण कौत्साने हट्टच धरला. गुरुजी थोडे रागावले आणि म्हणाले ," तुला दक्षिणा द्यायची आहे ना, मग एकेका विद्येसाठी एक कोटि सुवर्णमुद्रा , या प्रमाणे चौदा कोटि सुवर्णमुद्रा! आणि त्याही एकच दात्याकडून आणल्या पाहिजेत. " आणि एवढे मोठें दान एकमुठी देणारा राजा त्या वेळी एकच होता - रघुराजा !!. म्हणून कौत्स त्याच्याकडे आला. राजाने त्याचे स्वागत केलें , पण मातीच्या भांड्यांनी. राजाने खरच सर्वस्वाचे दान केलें होते. कौत्साने ओळखले, राजाकडे दान द्यायला द्रव्य नाही. राजाला आशीर्वाद देऊन तो जाऊ लागला. राजा त्याला जाऊ देईना. राजाने त्याचे येण्याचे कारण जाणून घेतले आणि तीन दिवसांची मुदत मागून घेतली. कौत्साला हव्या असणाऱ्या सोन्याकरिता राजाने देवांचा भांडारी कुबेरवर स्वारी करायचे ठरविले. ही बातमी कुबेराला कळताच, त्याने रघुराजाच्या नगराबाहेरील शमीवृक्षावर सुवर्ण -मोहोरांचा पाऊस पडला. कुबेराला राजाचे शौर्य, कीर्ती आणि त्यागा बद्दल माहित होते. तो आपल्यावर का स्वारी करतो आहे , हेही माहित होते, त्यामुळेच त्याने सुवर्ण मुद्रांचा पाऊस पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाला हे कळले. त्याने त्या सर्व मुद्रा कौत्साला दान दिल्या. कौत्साने त्याला हव्या असणाऱ्या फक्त चौदा मुद्रा घेतल्या. राहिलेले हे सोने तो घेईना आणि राजाही दिलेले दान परत घेईना. अखेर राजाने ते सोने लोकांच्याकडून लुटविले. तो दिवस होता विजया दशमीचा ! तेव्हापासून सोने लुटण्याची प्रथा पडली. दसऱ्याच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून विजय मिळविला. पांडवांना वनवास पत्करावा लागला होता, त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडाच्या ढोलीत ठेवली होती. पुढे वनवास, अज्ञातवास संपल्यावर, शमीच्या धोलीतील शस्त्रे काढून विराटाच्या गायी पळविणाऱ्या कौरवांवर त्यांनी स्वारी केली आणि त्यात विजय मिळविला , तो ही ह्याच दिवशी , असे मानतात. त्यामुळे या दिवसाला ' विजयादशमी ' असे नाव मिळाले. आणि याचमुळे दसऱ्याच्या दिवशी शमीची व शास्त्रात्रांची पूजा करण्याही प्रथा सुरु झाली असे म्हणतात.






ओणम् ( Onam ) :- ओणम् हा केरळ प्रांतातील प्रमुख सण आहे. महाराष्ट्रात दिवाळीतील पाडव्याला म्हणजे बलिप्रतिपदेला बळीराजाची पूजा करतात. 'बळीचे राज्य येवो' अशी प्रार्थना करतात. तशीच केरळ मध्ये या उत्सवात वामनाची पूजा करतात. फार पूर्वी बळीराजाने पृथ्वी आणि स्वर्ग जिंकून आपले साम्राज्य स्थापन केलें. तो उत्तम प्रजापालक होता. त्याच्या राज्यात सदैव सुख समृद्धी नांदत होती ; त्यामुळे प्रजेला सुख शांति मिळाली. प्रजा आनंदी झाली व राजाचे गुणगान करू लागली. बळी राक्षस वंशातला होता. देवांचा महिमा गायच्या ऐवजी राक्षसाचे गुणगान करीत असे. त्यामुळे देवांना तो अपमान वाटला. आपले महत्व वाढावे म्हणून देवांनी विष्णूला प्रार्थना करून आपले दु :ख त्याला सांगितले. विष्णूने वामनाचा अवतार घेतला आणि बळीराजाकडे एका यज्ञा प्रसंगी ,तीन पावले जमीन मागितली. बळीराजा पुण्यशील होता. दानशूर होता , त्याने ' दान देतो ' असा संकल्प सोडल्यावर वामनाने ( विष्णूने ) एका पायाने सारे आकाश व्यापले, दुसऱ्या पायाने सारी पृथ्वी व्यापली आणि तिसरे पाऊल कोठें ठेवू , असे विचारल्यावर राजाने आपले मस्तक पुढे केलें. वामनाने आपला पाय त्याच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळात दडपले. पाताळात जाते वेळी त्याने वामानाकडे मागणे मागितले . " वर्षातून एकदा पृथ्वीवर येऊन आपल्या प्रजेचे क्षेमकुशल घेण्याची आपल्याला मोकळीक असावी. वामनाने ' तथास्तु ' म्हटले . त्या वेळेपासून आश्विन महिन्यात बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी पृथ्वीवर येतो. आपला राजाला दैन्य , दुख , दारिद्र्य दिसू नये , म्हणून केरळची प्रजा या दिवसांत आनंदोत्सव साजरा करते. राजा तो आनंद, सुख , समृद्धी पाहतो आणि आपली प्रजा पूर्वीसारखीच सुखी आहे , असे समजून पुन्हा पाताळात जातो. बळी राजावर केरळी लोकांची महान श्रद्धा आहे. आपण रामराज्य चांगले मानतो. आदर्श मानतो. बळीराजाचे राज्यही तसेच होते. एका केरळी कवीने त्याच्या राजाचे सुरेख वर्णन केलें आहे. तो म्हणतो," जेव्हा महाबली राजा राज्य करीत होता , तेव्हा सर्व माणसे समान होती. राज्यात चोरी नव्हती . कपट नव्हते , लोक तिळाएवढे खोटे बोलत नव्हते " बळीच्या अशा अनेक गुणांच्यामुळे विष्णु त्याचा द्वारपाला झाला. हा सण अश्विन महिन्यात येतो. दहा दिवस हा सण साजरा करतात. या सणासाठी घरे रंगवतात, रंगांची आणि फुलांची रांगोळी काढतात. श्रावण नक्षत्राच्या मुख्य दिवशी वामनाची शंकूच्या आकाराची मातीची मूर्ति करतात. ती अंगणात बसवितात. तिच्या भोवतीही फुलांची सजावट करतात. ही मूर्ति बसविताना प्रथम सगळे ' आरप्पु ' असा मोठ्या आवाजात घोष करतात. हा ध्वनी देवाच्या स्वागतासाठी असतो. मग वामनाची पूजा करतात. वामनाला ते ' तृक्काक्करप्पन ' असे म्हणतात. या दिवशी घरोघरी गोड जेवण असते. भात , भाज्या , पापड, फळे , खीर व पिकलेल्या केळ्यांचे तळलेले तुकडे , हे पदार्थ त्या दिवशीच्या भोजनात आवश्यक असतात. तेथील लोक वेगवेगळे खेळ खेळतात, चेंडूचा एक खास खेळ खेळला जातो त्याला ' नाटन पंतुकळी ' असे म्हणतात. फुलांची रांगोळी काढणे , ही केरळीय स्त्रियांची वैशिष्टपूर्ण कला आहे. वेग वेगळ्या स्पर्धा ठेवतात त्यातील मुख्य नौकास्पर्धा ही होय ,या स्पर्धेला ' वंचिकळि ' असे नाव आहे. ' ऋण करावे ; पण ओणमच्या दिवशी सुग्रास जेवावे ' अशी एक म्हण केरळमध्ये आहे. त्यामुळे सर्व जण हा सण खूप आनंदाने , उत्साहाने साजरा करतात.







भोंडला किंवा हदगा ( Bhondala or Hadaga ) :- आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरुवात होते. त्या दिवसापासून पुढे सोळा दिवस किंवा नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत मुली ' हदगा ' खेळतात. याला ' भोंडला 'असेही म्हणतात. हा सण मुलींचा आवडीचा सण आहे. या सणासाठी घराच्या भिंतीवर सोंडेत माळ धरलेल्या व समोरासमोर तोंड केलेल्या दोन हत्तींचे रंगीत चित्र टांगतात. त्याच्यावर लाकडाची मंडपी टांगून तिला निरनिराळ्या फळांच्या व फुलांच्या माळा घालतात. शिवाय मुली आपल्या घरी जमिनीवर किंवा पाटावर रांगोळीने अथवा धान्याने हत्ती काढतात. नंतर मुली एकत्र येऊन पाटाभोवती फेर धरतात. भोंडल्याची गाणी म्हणतात आणि वेगवेगळ्या खिरापती वाटतात. हादग्याचा हा सण साजरा करण्याच्या पद्धतीत ठिकठिकाणी थोडा थोडा फरकही दिसून येतो. काही ठिकाणी पूजेसाठी पाच खडे घेतात. त्यांची पानं -फुलांनी पूजा करतात. तर काही ठिकाणी हदग्याची किंवा दुसऱ्या एखाद्या झाडाची फांदी रोवून तिच्याभोवती फेर धरतात. वऱ्हाड खानदेशात आणखी वेगळी पद्धत आहे. तेथें भाद्रपद पौर्णिमेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत ( आश्विन पौर्णिमा ) महिनाभर हा सण साजरा करतात. तेथें शंकर , पार्वती आणि गणपती यांच्या मूर्तीची स्थापना करून भुलाबाईची गाणी म्हणतात. कर्नाटकात पाटावर हत्ती काढण्याची प्रथा असून त्याच्याभोवती भोंडल्याची नऊ गाणी म्हणण्याची पद्धत आहे. हदगा हा एक पर्जन्यविधी आहे. हदगा म्हणजे हस्तग, म्हणजे सूर्य हस्त नक्षत्रात जातो,तो काळ. या सणाच्या द्वारे हस्त नक्षत्राचा गौरव केला जातो. पावसाळ्याची आपण मृग, आर्द्रा ( जेष्ठा ) , पुनर्वसू , पुष्प ( आषाढा ), आश्लेषा , मघा ( श्रावण ) , पूर्वा , उत्तरा ( भाद्रपद ), आणि हस्त , चित्रा ( अश्विन ) अशी दहा नक्षत्रे मानतो. हस्त हे नववे नक्षत्र. या नक्षत्रातच पाउस संपतो. चित्रा नक्षत्रात क्वचितच पडतो. ( सध्या तरी आस काही नियम राहिला नाही , कारण पाउस कधीही पडतो ) त्यामुळे हदग्याच्या सणाच्या निमित्ताने मुली पावसाळ्याचा निरोप घेतात.






कोजागिरी पौर्णिमा ( Kojagiri pournima ) :- आश्विन शुद्ध पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. पावसाळ्यानंतरची ही पहिली पौर्णिमा! पावसाळ्याच्या चार महिन्यांत चंद्राचे दर्शन होत नाही, आकाश निळेभोर दिसते आणि त्यात पौर्णिमेचा पूर्ण चंद्र तारांगणासह शोभून दिसतो. खूप दिवसांनी दिसलेल्या या चंद्राचे तेज वाढल्यासारखे वाटते. अश्विन महिन्यात शरद ऋतू असतो. पावसाळ्यानंतर येणारा हा ऋतू मनोहर आणि आल्हाददायक असतो. त्या शोभेत रात्री चंद्राचे दर्शनही मनाला सुखाविते. ज्योतिषशात्राप्रमाणे या पौर्णिमेला पृथ्वी आणि चंद्रा अगदी जवळ असतात. चंद्राच्या अमृतमयी वर्षावात निसर्गाचे लोभस , सुंदर दर्शन घडविणारी पौणिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. असे म्हणतात की , या रात्री लक्ष्मी आणि कुबेर आकाशातून फिरत असतात आणि कोण जागे आहे हे पाहत असतात . जो जागा राहतो , त्याला लक्ष्मीचे दर्शन होते , लक्ष्मी प्राप्त होते.





दीपावली ( दिवाळी ) ( Dipavali ) :- दीपावलीचा सण आश्विन वद्य त्रयोदशीपासून ते कार्तिक शुध्द द्वितेयेपर्यंत म्हणजे पाच दिवस साजरा करतात. यात धनत्रयोदशी , नरक चतुर्थशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा पाच वेगवेगळ्या सणांचा समावेश असतो. दिवाळीच्या सणाला लहान मुले मातीचे किल्ले करण्यात दंग असतात. घरातील स्त्रिया दिवाळीच्या आधी दोन / चार दिवसापासून फराळाचे पदार्थ बनविण्यात दंग असतात. प्रत्येकाच्या घरात फराळांच्या पदार्थांचा , उटणे , वासाचे तेल ह्यांचे सुगंध दरवळत असतात. घरासमोर अंगणात रांगोळ्या काढल्या जातात. त्यात अत्यंत सुंदर असे निरनिराळे रंग भरले जातात. निरनिराळ्या आकाराचे आणि रंगांचे आकाशकंदील घराच्या बाहेर लावले जातात. सगळीकडे दिव्यांचा लखलखाट असतो. खेडेगावात घरासमोरील अंगणात शेणाचा सडा घालतात आणि त्यावर वेग वेगळ्या रंगानी भरलेली रांगोळी काढतात. एक वेगळ्याच प्रकारचा तो वास हवेत दरवळत असतो. तो सुगंधच खेडेगावाची ओळख.


१. धनत्रयोदशी ( Dhanatrayodashi )  :- दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. आश्विन वद्य त्रयोदशी! या दिवसाला ' धनतेरस ' असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी धनाची पूजा करतात. म्हणजे सोने-नाणे , अलंकार, रूपे यांची पूजा करतात. तसेच विष्णु, लक्ष्मी, गणेश, नाग या देवतांचेही पूजन करतात. या दिवशी अखंड दिवा लावावा तसेच आपल्या कुवतीप्रमाणे परोपकार करावा असे शास्त्रात सांगितले आहे. या दिवशी आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा लावतात. याला ' यमदीप ' म्हणतात. इतर कोणत्याही दिवशी दिव्याचे तोंड दक्षिणेकडे करीत नाहीत. दक्षिण दिशा ही यमधर्मराजाची मानली जाते. यमधर्मराज ही मृत्यूची देवता. या दिवशी त्याला दीपदान केलें जाते ते अपमृत्यू टाळण्यासाठी!. हाय मागे एक गोष्ट आहे ती अशी, एकदा यमराजाने आपल्या दूतांना एक प्रश्न विचारला ," काय रें , आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राण हरण केलेत, पण हे करीत असताना असा एखादा प्रसंग घडला का , की ज्यामुळे तुम्हालाही वाईट वाटले ? तुम्हालाही दुख झाले?. " थोडा विचार करून दूतांनी उत्तर दिले , " आठवतो . आम्हाला असा एक प्रसंग. महाराज, पृथ्वीवरील हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचे प्राण हरण करताना आम्हाला अतिशय दुख झाले. कारण महाराज या राजकुमारचा विवाह चार दिवसांपूर्वीच झाला होता. सगळ्या राज्यात , राजवाड्यात खूप आनंदी आनंद होता. पण तो आनंद संपायच्या आत , राजपुत्राने आपल्या विवाहाचा साज शृंगार उतरायच्या आताच त्याचे प्राण हरण करण्याची वेळ आमच्यावर आली. नुकत्याच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीपासून त्याचे प्राण हरण करताना आमचेही डोळे ओले झाले. तिचा शोक पाहून आम्हालाही दुख झाले". हा प्रसंग ऐकून यमराजालाही वाईट वाटले. त्याच्याही डोळ्यांत पाणी आले. तोच दूत पुढे म्हणाले " महाराज , कृपा करा आणि पुन्हा असा अपमृत्यूचा प्रसंग कोणावरही येऊ नये, असे काहीतरी करा '. तेव्हा विचार करून यमराज म्हणाले," ठिक आहे. जें लोक या त्रयोदशीला मला दीपदान देतील आणि आजपासून पुढे पाच दिवस दीपोत्सव साजरा करतील, त्यांच्यावर असा अपमृत्यूचा प्रसंग येणार नाही,' आणि त्या दिवसापासून ही प्रथा पडली. तर दीपदान व आपल्या कुवतीप्रमाणे परोपकार करून हा सण साजरा करतात.




२ वसुबारस ( Vasubaras ) ;- वासुबारसेच्या दिवशी संध्याकाळी गाय - गो- ऱ्ह्याची पूजा करतात. खरीपाचे पीक तयार झालेले असते. त्याचा गोड घास त्यांना खायला घालतात. प्राचीन काळापासून हिंदू धर्मातील लोक गायीला पवित्र मानत आले आहेत. गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत असे मानले जाते. तिला गोमाता म्हणतात. तिच्यामुळे होणारे फायदे व थोरवी ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि श्रीकृष्ण यांनी गो-सेवा केली. आपण अनेक प्रसंगी दान करीत असतो ,त्यात ' गोदान ' हे सर्वश्रेष्ठ दान मानले आहे. तुकारामांनी सुद्धा म्हटले आहे ," ज्याचे घरी गाय | तेथें विठ्ठलाचे पाय ". गायीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व तिचे श्रेष्ठत्व मानून तिचे पूजन करण्यासाठी हा दिवस साजरा करतात.


३ नरकचतुर्थदशी ( Narakchaturdashi ) :- धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी नरकचतुर्दशी असते. या दिवशी सर्व लोक पहाटेच उठून वासाचे तेल , उटणे लावून गरम पाण्याने स्नान ( आंघोळ ) करतात. घरात सगळीकडे दिवे लावतात. घर प्रकाशाने उजळून टाकतात. या दिवशी जो उशिरा उठेल , तो नरकात जातो अशी समजूत आहे. हा उत्सवाची सुधा एक कथा आहे ती अशी , प्राग्जोतिष नावाचे एक राज्य होते. तेथें नरकासुर नावाचा राक्षस राज्य करीत होता. तो अत्यंत क्रूर , वाईट होता. अनेक राजांना त्याने तुरुंगात डांबले होते. एवढेच नाही , तर राजकन्यांना , स्त्रियांनाही म्हणजेच एकूण सोळा हजार स्त्रियांना त्याने तुरुंगात डांबले होते. स्त्रियांना तो फार त्रास देत असे. श्रीकृष्णाला हे समजल्यावर तो अत्यंत संतापला. त्याने नरकासुराचा नाश करण्याचे ठरविले. त्याच्याशी युध्द करण्याची तो तयारी करू लागला. ही बातमी कृष्णाची पत्नी सत्यभामा हिला समजली. ती कृष्णाकडे आली नि म्हणाली ," त्या दृष्ट राक्षसाने स्त्रियांना त्रास दिला आहे ना ? मग मीच त्याच्याशी युध्द करून त्याला मारीन. तुम्ही मला फक्त मदत करा " आणि रथात बसून सत्यभामा नरकासुराचा नाश करायला निघाली. मदतीला श्रीकृष्ण होताच. नरकासुराशी युध्द करून आश्विन वद्य चतुर्दशीला तिने त्याचा वध केला. बंदिशालेतील स्त्रियांना मुक्त केलें. त्या स्त्रियांनी आपापल्या घरी जाऊन सडा - संमार्जन करून , रांगोळ्या काढून आनंदोत्सव साजरा केला. घरभर दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. तेव्हापासून हा उत्सव साजरा करण्याची प्रथा पडली आहे. त्या नरकासुराला तर देवीने मारले , पण खरे म्हणजे नरकासुर म्हणजे नरक - घाण !. आणि म्हणूनच घरातील , गावातील , शहरातील या नरकासुराचा रोज नाश केला पाहिजे, सगळीकडे स्वच्छता वाढेल आणि आरोग्य चांगले राहील ह्यासाठी सर्वांनी हातभार लावला पाहिजे.




४ लक्ष्मीपूजन( Lakshmipujan ) :- नरकचतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आश्विन वैद्य अमावस्येला घरोघरी लक्ष्मीपूजन होते. या दिवशी बळीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली , त्यामुळे सर्वाना आनंद झाला. तिचे वास्तव्य आपल्या घरात कायमचे राहावे , अशी सगळ्यांचीच इच्छा असते. त्यासाठी सर्वजण तिची मोठ्या भक्तिभावाने पूजा करतात. व्यापारांकडेही या दिवशी लक्ष्मीपूजन करतात. साळीच्या लाह्या, बत्तासे, गूळ या पदार्थांचा प्रसाद देतात. या दिवशी रोषणाई करतात. घरात , घराबाहेर तेला / तुपाचे दिवे लावले जातात. तेला तुपाचा दिवा ह्यासाठी लावावा की तो तेवत असताना भोवती मांगल्य जाणवते, पावित्र्य जाणवते. आपल्या पुराणात एक गोष्ट सांगितली आहे ती अशी , आश्विनी आमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधून काढते. जिथे स्वच्छता , शोभा , रसिकता आढळते , तिथे तर ती आकर्षित होतेच, पण ज्या घरात संस्कारक्षम ,चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष , संयमी , धर्मनिष्ठ, नि क्षमाशील पुरुष व गुणवती , पतिव्रता स्त्रिया राहत असतात , त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.
३३) बलिप्रतिपदा( Balipratipada ):- कार्तिक शुध्द प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा. या दिवसाची बळीराजाची आणि वामनाची कथा ओणम मध्ये दिलेली आहेच. प्रांताप्रांतातून या पौराणिक कथेत थोडा फार बदल दिसून येतो. त्यानुसार ' कार्तिक शुध्द प्रतिपदेला लोक तुझे स्मरण करून आनंदोत्सव साजरा करतील ' असा वामनाने बळीराजाला वर दिला होता , असे मानतात. या दिवशी बळी व त्याची पत्नी विंध्यावली यांचे चित्रा काढून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी बळीची पिठाची मूर्ति काढून तिची पूजा करतात. या दिवशी गोवर्धन पूजाही करतात. एकदा शरदऋतूत गोकुळातील लोकांनी इंद्राचा उत्सव सुरु केला. त्या वेळी कृष्णाने त्यांना सांगितले, गोवर्धन पर्वतामुळे आपली उपजीविका होते, तेव्हा इंद्राऐवजी गोवर्धनाची पूजा करा. त्यांनी तसे करताच इंद्राला राग आला. त्याने गोकुळावर मुसळधार पाऊस पडायला सुरवात केली. दोन दिवस झाले तरी पाउस काही थांबेना. सारे घाबरले , कृष्णाला शरण गेले आणि त्यांनी त्याला सर्वांचे रक्षण करण्याची विनंती केली. कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला आणि त्याखाली गोकुळवासी लोकांचे रक्षण केलें. त्या स्मरणार्थ बलिप्रतिपदेच्या दिवशी गोवर्धनाची पूजा करतात. कृष्ण , गोपाळ , गायी , वासरे, इंद्र यांची चित्रे ठेवतात आणि त्या सर्वांची पूजा करतात. खेडेगावात गोठ्यातील गायी बैलांना सजवून त्यांचीही पूजा करतात व मिरवणूक काढतात. खेडेगावातून या दिवशी गुरारवी ' दिन दिन दिवाळी ! गाई म्हशी ओवाळी || गाई म्हशी कोणाच्या | लक्ष्मणाच्या || अशी गाणी म्हणत त्यांना ओवाळले जाते. याच दिवशी विक्रम संवत्सराचा प्रारंभ झाला असे मानतात. व्यापारांचे नवे वर्षही याच दिवशी सुरु होते. या दिवशी मंगल स्नान झाल्यानंतर स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात. संपूर्ण दिवस खूप आनंदात घालवतात. या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट असे की शंकर पार्वती द्यूत खेळत असताना , पार्वतीने याच दिवशी शंकराला त्यात हरविले होते ,त्यामुळे या प्रतिपदेला द्युतप्रतीपदा असे म्हणतात.



५) भाऊबीज ( Bhaubij ) :- पाडवा संपतो आणि भाऊबीज येते. भाऊबीज म्हणजे बहिण भावाच्या पवित्र प्रेमाची साक्ष देणारा दिवस. याचीही एक कथा आहे ती अशी, या दिवशी मृत्युदेव यम हे आपल्या बहिणीकडे - यमी किंवा यमुना गेले होते. तिला वस्त्रालंकार दिले. तिचा पाहुणचार घेतला. यमुनेने त्यांना ओवाळले नि त्यांनी तिला ओवाळणी घातली. तेव्हापासून या दिवशी बहिणीने भावास ओवाळण्याची प्रथा पडली आहे. हा दिवस बहिण - भावाच्या भेटीचा, बहिणीने भावाला ओवाळण्याचा म्हणून याला भाऊ -बीज असे नाव पडले.







त्रिपुरी पौर्णिमा ( Tripuri Pournima ) :- कार्तिकी पौर्णिमा म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा. या दिवशी शंकर देवाने त्रिपुराचा वध केला म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. आपल्या पुराणात या दिवसाच्या दोन कथा आहेत. पहिली कथा अशी की. त्रिपुरासुर नावाचा एक राक्षस होता. तो फार महत्वाकांक्षी होता. देवांच्यापेक्षाही श्रेष्ठ होण्याची आणि अमरत्व प्राप्त करून घेण्यासाठी त्याने ब्रम्हदेवाची भक्ती करायला सुरुवात केली. पण देवांना त्याच्या तपाचे कारण व त्यांचे परिणाम माहित असल्यामुळे देवांनी त्याच्या तापत अडचणी आणल्या. अनेक विघ्ने निर्माण केली, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्याला ब्रम्हदेव प्रसन्न झाले व त्यांनी त्याला वर दिला, पण ' तू अमर होशील ' असे मात्र म्हटले नाही. ब्रम्हदेवाने अभय दिल्याने नि देवापेक्षा श्रेष्ठ होशील असे सांगितल्याने त्याला कोणाचेही भय वाटेना व तो उन्मत होऊन त्याने आपल्या तीन नगरींच्या भोवती उत्तम तटबंदी केली. त्याच्या या तटबंदीमुळे देवांचे काही चालेना. त्याचा नाश करण्याचा प्रयत्न भगवान विष्णूंनी करून पहिला पण तो व्यर्थ गेला. अखेरीस सर्व देवांनी भगवान शंकरांना विनंती केली. शंकरांनी त्या राक्षसाशी तीन दिवस युद्ध करून त्याचा वध केला तो याच दिवशी. दुसरी कथा अशी की, मयासुर नावाच्या राक्षसाने तपश्चर्या करून ब्राम्हदेवाना प्रसन्न करून घेतले आणि तीन नगरे ( पुरे ) वसविली. या त्रिपुरातील राक्षसांनी जोपर्यन्त देवांना त्रास दिला नाही तो पर्यन्त त्यांची भरभराट झाली. पण पुढे तारकासुर हा त्रिपुराचा राजा झाला. त्याला तीन मुले होती. ताराक्ष, कमलाक्ष, विद्युन्माली ही त्यांची नावे. ताराकासुरानंतर त्रिपुराची सत्ता या तीन राक्षसांकडे आली. सत्ता हाती येताच त्यांना सत्तेची धुंदी चढून ते उन्मत झाले व अत्याचार करू लागले. तेव्हा शंकराने त्यांच्याशी युद्ध करून त्यांना जाळून टाकले. तो दिवस होता कार्तिकी पौर्णिमेचा!. या राक्षसांच्या त्रासातून सृष्टीची मुक्तता झाली. देवानाही हायसे वाटले, त्यामुळे सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला आणि दीपोत्सव साजरा केला. या दिपोत्सावामुळे या दिवसाला ' मोठी दिवाळी ' असे म्हणण्याची पद्धत आहें. यामुळे त्या दिवशी भगवान शंकराच्या उपासनेला , आराधनेला विशेष महत्व आले. या दिवशी शंकराच्या मंदिरात दीपमाळ लावतात, रोषणाई करतात. या पौर्णिमेला स्त्रिया शंकराच्या मंदिरात त्रिपुर लावतात. त्रिपुर म्हणजे कापसाच्या साडेसातशे वाती. त्या तुपात भिजवून शंकरासमोर लावतात. त्या दिवशी उपवास करतात. काही स्त्रिया कोहळा व दीप दान करतात. संध्याकाळी नदीच्या प्रवाहात दिवे सोडतात. संध्याकाळच्या वेळी प्रवाहातून हलके हलके पुढे वाहत जाणारे हे दिवे फारच सुंदर दिसतात. काही प्रांतात हा दिवस शंकराचा पुत्र स्कंद किंवा कार्तिकेय याचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात व यानेच तारकासुराचा वध केला अशीही कथा आहें. दक्षिण भारतात या दिवशी शंकराच्यासाठी ' कृत्तिका ' नावाचा महोत्सव साजरा केला जातो व शंकराची महापूजा करतात.





चंपाषष्ठी ( Champashashthi ) :-  मार्गशीर्ष शुध्द षष्ठीला चंपाषष्ठी म्हणतात. महाराष्ट्रातील काही भागात हा चंपाषष्ठीचा उत्सव खंडोबाप्रीत्यर्थ होतो. याही मागे एक कथा आहें ती अशी , फार वर्षापूर्वी मणी आणि मल्ल ह्या नावाचे दोन राक्षस उन्मत्त होऊन लोकांना त्रास देत होते आणि त्यांच्या त्रासातून लोकांना सोडविण्यासाठी शंकरांनी खंडोबा या नावाने योद्ध्याचे रूप घेऊन मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत त्याच्याशी युध्द केलें आणि षष्ठीच्या दिवशी त्याचा वध केला . त्यानिमित्त षष्ठीच्या दिवशी खंडोबाच्या देवळातून हा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रातील कित्येक घराण्यांचे खंडोबा हे कुलदैवत आहें. काही घरांतून या सहा दिवसांत खंडोबाचे नवरात्रही असते. चंपा षष्ठीच्या दिवशी कुळधर्म असतो. खंडोबाला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवतात. खंडोबाच्या नावाने भंडारा ( हळद ) उधळून तळी भरतात आणि त्याच्या नावाने जल्लोष करतात.





दत्त –जयंती ( Datta-Jyanti ) :- मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती येते. या दिवशी संध्याकाळच्या वेळी दत्ताचा जन्म झाला असे मानतात. दत्तात्रेयांचा जन्माची एक कथा ती अशी , दत्तात्रयांचे पिता अत्रीऋषी आणि माता अनसूया. अत्रीऋषी हे ब्रम्हदेवाचे मानसपुत्र. ते मोठें तपस्वी होते. तपाने त्यांची कांती तपस्वी दिसायची. त्यांची पत्नी अनसूया महान पतिव्रता होती. तिच्या पतीव्रताच्या अनेक कथा नारदमुनी स्वर्गातील देव देवतांना सांगत असत. एकदा त्या कथांची रसभरीत वर्णने नारदांनी ब्रम्हदेव पत्नी सरस्वती , विष्णुपत्नी लक्ष्मी आणि मेह्शपत्नी पार्वती यांना ऐकवली. ती ऐकून या तिघींच्या मनात मत्सर, असूया निर्माण झाली . ' पृथ्वीवरील एक ऋषीपत्नी पतीव्रतात आमच्यापेक्षाही श्रेष्ठ आहें ?' हा विचार त्यांना अस्वस्थ करू लागला . या तिघींनीही आपापल्या पतिराजांना बोलावले आणि अनसूयेचे सत्व नष्ट करण्यास सांगितले. त्यानुसार ब्रम्हा , विष्णु , महेश यांनी अतिथीची रूपे घेतली. ते अत्रीऋषींच्या आश्रमात आले. त्या वेळी अत्रीऋषी परगावी गेले होते. अतिथी आलेले पाहताच अनसूयेने त्यांचे स्वागत केलें. त्यांच्यासाठी भोजन तयार केलें. पण जेवायला बसताना अतिथींनी विचित्र अट घातली की अनसूया विवस्त्र होऊन त्यांना वाढणार असेल तरच ते अन्न ग्रहण करतील. क्षणभर अनसूया गोंधळली. काय करावे असा विचार करत असतानाचा तिच्या मनात विचार आला की हे आपल्या पतीव्रतेची परीक्षा तर घेत नसतील ना ? ही आपल्या कसोटीची वेळ आहें. आपण यात यशस्वी झाले पाहिजे. आणि तिने आपल्या तपोबलाने तिघांनाही बालस्वरुप बनविले, पाळण्यात घातले आणि सोमं, दत्त, दुर्वास अशी त्यांची नावे ठेवली. हळू हळू मुले मोठी होऊ लागली, पण तिकडे स्वर्गलोकांत गोंधळ उडाला. तिन्ही देवांच्या पत्नी कासावीस झाल्या. त्या करायला गेल्या एक आणि झाले भलतेच ! तिन्ही देवांनीही अनसूयेची क्षमा मागितली आणि आपापले अंश त्या बाळात तेवून ते स्वर्गलोकी गेले. मुले मोठी झाल्यावर सोमं चंद्रलोकी गेला, दुर्वास तपाचरणासाठी अरण्यात निघून गेला आणि जाताना त्या दोघांनीही आपले अंश दत्ताच्या ठिकाणी ठेवले त्यामुळे दत्ताच्या ठिकाणी ब्रम्हा , विष्णु आणि महेश या तीनही देवांचा संयोग घडून आला. दत्ताची उपासना करणारा एक संप्रदाय आहें त्याला ' दत्त - संप्रदाय ' असे म्हणतात. महाराष्ट्रातील दत्तोपासनेचे मुख्य प्रणेते नृसिंहसरस्वती होते. या पंथाचा मुख्य ग्रंथ ' गुरुचरित्र ' हा आहें. तसेच ,दत्ताची मूर्ति तीन मुखांची आणि सहा हातांची असते. पण एकमुखी दत्त मानणारा एक पंथ महाराष्ट्रात आहें त्याचे नाव महानुभाव पंथ! हे दत्तत्रयाला प्रत्यक्ष परब्रम्ह परमेश्वराचा अवतार मानतात.







मकर संक्रांत ( Makar Sankrant ) :- पौष महिन्यात येणारा एकुलता एक सण म्हणजे संक्रांत. संक्रमण म्हणजे ओलांडून जाणे अर्थात मकर नावाच्या राशीत सूर्याचा प्रवेश होणे याला मकर संक्रमण म्हणजेच मकर संक्रांत म्हणतात. संक्रांतीच्या दिवसापासून सूर्य उत्तरेकडे जाऊ लागतो, सूर्याच्या या गमनास ' उत्तरायण ' असे म्हणतात. उत्तरायणात दिवस मोठा होतो आणि रात्र लहान होते. सूर्यप्रकाश अधिकाअधिक मिळू लागतो. या घटनेचा मानवी जीवनावर परिणाम होतो. आषाढ महिन्यापासून रात्र मोठी होऊन दिवस लहान होतोआणि त्यात पावसाळ्याची कुंद हवेने आलेली मरगळ या दिवसापासून बदलून अधिका अधिक सूर्यप्रकाश मिळण्याचा संकेत मिळतो आणि या आनंदाचा सण म्हणजे संक्रांत!. या दिवशी देवास तीळ व तांदूळ वाहतात. स्त्रिया सुगडामध्ये ( मातीच्या घटाला सुगड म्हणतात ) गहू, उसाचे तुकडे , हळकुंडे, व कापूस हे पदार्थ घालून ते ब्राम्हणास देतात. त्या दिवशी हळदी - कुंकू केलें जाते. तीळगुळाबरोबर एखादी संसारपयोगी वस्तू सुवासिनींना देतात. आणि तीळ गूळ देताना ' तीळ गूळ घ्या , गोड बोला ' असे म्हणतात. संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला ' भोगी ' म्हणतात. त्या दिवशी मुगाच्या डाळीची खिचडी , तिळाची भाकरी, लोणी देवाला समर्पण करून नंतर सेवन कराव्यात असे सांगितले आहें. ह्या सणाची सुद्धा एक कथा आहें , ती अशी मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांत देवीने संकारासुराचा नाश केला अशी कथा पुराणात आहें. या देवीला अनेक हात आहेत. एखाद्या वाहनावर बसून , वस्त्रलंकारांनी सुशोभित होऊन हातात विविध शस्त्रे घेऊन ती एका दिशेकडून दुसऱ्या दिशेला जात असते , असे वर्णन पंचांगात दिलेले असते. संक्रांतीचे हे वर्णन प्रत्येक वर्षी वेगळे असते. विशेष म्हणजे संक्रांतदेवीस ज्या गोष्टी आवडतात , त्या गोष्टींची महागाई होते असे मानतात. यावरूनच आपल्याकडे ' संक्रांत वळणे ' म्हणजे ' संकट येणे ' हा वाक्यप्रचार आला आहें.





पोंगल ( Pongal ) :- दक्षिण भारतात प्रामुख्याने तमिळनाडूमध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. हा सण तीन दिवस साजरा करतात. पोंगल म्हणजे महाराष्ट्रातील संक्रांतीचा सण. पहिल्या दिवशी ' भोगी पोंगल ' म्हणतात. या दिवशी स्त्रिया अंगणात सडा - संमार्जन करून रांगोळ्या काढतात. घर सजविले जाते. हा दिवस इंद्राच्या पूजेचा असतो. तेथील लोक इंद्राला पावसाची देवतात मानतात. एका अर्थाने तो अन्नदाताच! आणि त्याची ही पूजा. या दिवशी विविध पदार्थ केलें जातात, पण खास करून तांदुळाची दुधात शिजविलेली खीर हे मुख्य पक्वान्न असते. दुसऱ्या दिवसाला 'सूर्य ' किंवा ' पेरूम पोंगल ' म्हणतात. या दिवशी सुवासिनी स्त्रिया पहाटेच आंघोळ करून ओलेत्याने अंगणात दुधातली तांदळाची खीर शिजवतात. खिरीला उकळी फुटली की , ' पोंगल ओ पोंगल ' असे मोठ्याने ओरडतात. खीर शिजवल्यानंतर सूर्य आणि गणपती यांना नैवेद्य दाखवता. काही भाग गायीला खायला देतात. नंतर सर्वजण मिळून खीर खातात. तसेच सकाळी सूर्य पूजेसाठी स्त्रिया जेथें स्वच्च ऊन पडलेले असेल अशी जागा शोधून गायीच्या शेणाने सारवतात आणि वाळल्यावर त्यावर तांदुळाच्या पीठाने सूर्याची प्रतिमा काढतात. त्याच्या दोन बाजूस दोन स्त्रियांची चित्रे काढतात. या दोन स्त्रिया म्हणजे सूर्याच्या भार्या , एकीचे नाव संज्ञा आणि दुसरीचे छाया ! या दिवशी लोक एकमेकांच्या घरी जातात, एकमेकांना भेटवस्तू देतात आणि 'पोंगल . . पोंगल ' असे म्हणतात. तिसरा दिवस म्हणजे ' मुट्टू पोंगल ' या दिवशी गायी बैलांची पूजा करायची असते. सकाळीच केशरयुक्त पाण्याने गायी- बैलांना आंघोळ घालतात. त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात, शिंगाना बेगड लावतात. त्यांना गोडाचे जेवण घालतात. संध्याकाळी त्यांची व देवतांची मिरवणूक काढतात. अशाप्रकारे तीन दिवस अस सण साजरा होतो.







रथसप्तमी ( Rathasaptami ) :- माघ महिन्यातला शुध्द सप्तमीस रथसप्तमी असे म्हणतात. हा दिवस सुर्योपासानेचा! या दिवशी सूर्य आपल्या सात घोड्यांच्या रथात बसून आकाशमार्गाने भ्रमण करायला निघतो असे मानतात. या दिवशी स्त्रिया सकाळी तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढून त्यावर एक पाट ठेवून त्यावर तांबड्या चंदनाने सात घोड्यांचा रथ काढून त्या रथात सारथ्यासह सूर्याची प्रतिमा काढतात आणि त्याची पूजा करतात. सूर्याला खिरीचा नैवेद्य दाखवितात. संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलावतात. तसेच या दिवशी मातीच्या भांड्यात दूध घालून ते भांडे अंगणात गोवऱ्या पेटवून त्याच्यावर दूध उतु जाईपर्यंत ठेवतात. या दिवसासंबंधी एक कथा आहें ती अशी , कुंबुज देशात यशोवर्मा नावाचा राजा राज्य करीत होता. त्याची प्रजा सुखी होती. त्याने आपले राज्य भरभराटीला आणले. त्याला एक मुलगा होता. तो नेहमी आजारी असायचा. अनेक हकीम झाले, वैद्य झाले, पण कोणाच्याही औषधानें त्याला गुण येईना. तेव्हा एका भाविकाने त्याला रथसप्तमीचे व्रत करायला सांगितले. त्याने आपल्या मुलाकरवी ते व्रत करायला सुरुवात केली. सूर्यपूजा केली , सूर्योपासना केली आणि राजपुत्राची प्रकृति हळूहळू सुधारू लागली आणि काही दिवसातच तो पूर्ण बरा झाला. आणि म्हणूनच ह्या दिवशी सूर्याची पूजा करतात.



महाशिवरात्र ( Mahashivaratra ) :- माघ वद्य चतुर्दशीस महाशिवरात्र म्हणतात. तसे प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशी ही शिवरात्र असते; पण माघ महिन्यातील शिवरात्र महत्वाची मानली जाते. हा दिवस शंकराच्या उपासनेला मानतात. या दिवशी उपवास करतात. शंकराला अभिषेक , लघुरुद्र, महारुद्र करतात. शंकराला बेलाची पाने भक्तिभावाने वाहतात. महाशिवरात्रीची कथा अशी आहें की , खूप वर्षापूर्वी एकदा एक पारधी शिकारीसाठी रानात जायला निघाला. त्या दिवशी महाशिवरात्र होती. जाता जाता त्याला एक शिवमंदिर लागले. देवळात काही लोक शंकराची पूजा करीत होते. काही ' ॐ नम: शिवाय ' असा जप करीत होते. ते पाहून तो हसला आणि त्यांची चेष्टा करावी म्हणून तो जाताना ' शिव शिव ' असे म्हणू लागला. त्यामुळे त्याच्याकडून नकळत शिवोपासना घडू लागली. तो रानात आला. एका तळ्यासाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी दबा धरून बसला. त्याच्या डोळ्यांसमोर पानांचे झुबके येऊ लागले. त्यामुळे त्याला सावज ( शिकार ) नीट दिसत नव्हते; म्हणून त्याने ती पणे तोडून खाली टाकायला सुरुवात केली. योगायोगाने त्या झाडाखाली शंकराची पिंड होती. त्यावर बेलाच्या पानांचा अभिषेक सुरु होता. व्याधाच्या नकळत शिवोपासना घडत होती, वाढत होती. तेवढ्यात हरणांचा एक कळप तेथें पाणी पिण्यासाठी आला. व्याधाने आपला तीरकमठा सज्ज करून एका हरीणीवर नेम धरला. हरिणीला चाहूल लागली आणि ती सावध झाली आणि कळवळून व्याधाला म्हणाली ,' हे व्याध , थोडा थांब. मला आत्ताच मारू नकोस . माझी मुले बाळे माझी वट पाहत असतील. मला त्यांना भेटू दे. मी पुन्हा येते. माग तू मला खुशाल मार'. हरिणीने त्याला विनवल्यावर त्याने तिला परवानगी दिली. तो त्या झाडावरच तिची वट पाहत बसला. रात्रभर खायला काहीच न मिळाल्यामुळे त्याला उपवास घडला. वेळ जायला काही तरी उद्योग हवा, म्हणून तो रात्रभर बेलाची पाने खुडून खाली टाकत होता. तीही शिवलिंगावर पडतच होती. दुसऱ्या दिवशी ती हरिणी आपल्या परिवारासह तेथें परत आली. ते पाहून व्याधाला आश्चर्य वाटले. रात्रभर घडलेल्या उपासाने त्याचे मन विचार करू लागले. त्यामुळे हरिणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला कौतुक वाटले. त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या. हे मनाचे ' शिव ' म्हणजेच कल्याणकारी रूप प्रकट होताच भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. त्या सर्वाना त्यांनी विमानात बसवून स्वर्गात नेले. रात्रीच्या वेळी आकाशात हे मृग नक्षत्र दिसते. त्याच्याशेजारी व्याधाची एक तेजस्वी चांदणीही लुकलुकत असते. शंकराची उपासना संपूर्ण भारतात केली जाते. शिवोपासानेचा एक पंथ असून त्याला ' शैव पंथ ' म्हणतात. शिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून रात्री जागरण करून शिवभजनात काळ घालवितात.







होळी ( Holi ) :- फाल्गुन पौर्णिमेला ' हुताशनी पौर्णिमा ' म्हणतात. या दिवशी होळीचा उत्सव साजरा केला होतो. यानंतर पुढेही पाच दिवस वेगवेगळे उत्सव साजरे होतात. दुसऱ्या दिवशी धुळवड असते. पंचमीला रंगपंचमी साजरी होते. या उत्सवाला आपण होळी म्हणतो. पण वेगवेगळ्या प्रांतात याची नावे वेगवेगळी आहेत. उत्तर भारतात याला ' डोलापात्रा ' , ' होरी ' असे म्हणतात. महाराष्ट्रात ' शिमगा ' असेही म्हणतात. दक्षिण भारतात हा उत्सव ' कामदहन ' या नावाने ओळखला जातो. या उत्सावामागेही काही कथा आहेत, त्यातील पहिली अशी की, उत्तरेत हा उत्सव कृष्णासाठी आहें असे म्हणतात. कृष्ण तान्हा असताना, त्याला मारण्यासाठी कंसाने पुतना नावाच्या राक्षसिला पाठविले होते. कृष्णाने तिचे कपट ओळखले आणि तिचे दूध पिता पिता तिचे प्राणही प्राशन केलें. त्या पुतनेला होळीच्या दिवशी रात्री जाळण्यात आले, असे ती लोक मानतात. दुसरी कथा अशी की , महाराष्ट्रात असे मानले जाते की प्राचीन काळी ढुढा नावाची राक्षसी लहान मुलांना त्रास देत असे. तिला हुसकावून लावण्यासाठी फाल्गुनी पौर्णिमेला मोठा जाळ केला होता; त्यामुळे ती पळून गेली. त्याची आठवण म्हणून होळी पेटवली जाते. तिसरी कथा आहें दक्षिण भारतातली ती अशी की, तेथील लोक शंकरभक्त आहेत. ते हा उत्सव कामदेवासाठी मानतात. भगवान शंकर आपल्या तपश्चर्येत मग्न होते. देवांनी शंकरांचे लक्ष पार्वतीकडे वेधण्याचे काम कामदेवाला सांगितले. ते शंकराला समजताच ते रागावले . त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला किंवा मदनाला जाळून टाकले त्याची आठवण म्हणून तिकडे ' कामन्ना ' चा पुतळा तयार करून तो जाळण्याची प्रथा आहें. या सणाचा महत्वाचा भाग म्हणजे होळी पेटविणे. पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी अंगणासमोर सारवून व रांगोळी घालून त्या ठिकाणी गोवऱ्या व लाकडे पेटवून होळी करतात. पण त्या संबंधी सुद्धा वेग वेगळ्या प्रथा आहेत. बंगालमध्ये चतुर्दशीलाच ' दोलायात्रा ' या उत्सवाला सुरुवात होते. घराचा कर्ता पुरुष त्या दिवशी कृष्णाची आणि अग्नीची पूजा करतो. नंतर कृष्णावर गुलाल उधळतो. जमलेल्या लोकांनाही तो वाटण्यात येतो. नंतर घराबाहेर गवताची एक मूर्ति जाळण्यात येते. तिलाच होळी म्हणतात. पौर्णिमेस झोपाळ्यावर किंवा पाळण्यातल्या श्रीकृष्णास मधून मधून झोके देण्याची पद्धत आहें. खेड्यांमध्ये हा उत्सव सामुदायिकरीत्या साजरा केला जातो. तसेच उत्तर भारतात फाल्गुन शुक्ल पंचमीपासून या उत्सवाला सुरुवात होते. लोक लाल, पिवळी वस्त्रे धारण करतात. गुलाल उधळीत, गाणी गात फाल्गुन पौनिमेपर्यंत दिवस मोठ्या मजेत घालवतात. पौर्णिमेस प्रशस्त जागी होळी पेटवतात. ती शांत झाली की माग लोक आपापल्या घरी जातात.






शिवजयंती ( Shivjayanti ) :- फाल्गुन वद्य तृतिया ही शिवजयंती. या तिथीला शिवनेरी किल्यावर , महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आणि दैवत असलेले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. शिवजयंतीचा उत्सव महाराष्ट्रात अत्यंत उत्सवात, धूमधडाक्यात साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयासाठी प्रेरणा मिळावी, जनतेसमोर आदर्श राहावा, म्हणून ' सार्वजनिक शिवजयंती उत्सव' सुरु केला. ४४) अधिक मास (Addhik Mas) :- दिवस , महिना आणि वर्ष ही काळगणनेची मापे आहेत. पृथ्वीची स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पुरी झाली, की एक दिवस होतो. चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पुरी करायला जो वेळ लागतो, तो एक महिना आणि पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला जो वेळ लागतो, त्याला एक वर्ष म्हणतात. आपण तीस दिवसांचा महिना आणि बरा महिन्यांचे वर्ष म्हणत असलो , तरी ती तितकेसे खरे नाही; कारण चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्याला साधारण २९. ५ दिवस लागतात. याला चांद्रमास असे म्हणतात. अशा बरा प्रदक्षिणा पूर्ण होण्यास सुमारे ३५४ दिवस लागतात आणि पृथ्वीची सूर्याभोवती एक प्रदक्षिणा संपण्यास म्हणजेच एक वर्ष संपण्यास ३६५ दिवस लागतात. दर वर्षी हा जो अकरा दिवसांचा फरक पडतो, तो सतत वाढू न देता प्रत्येक तिसऱ्या वर्षी एक महिना वाढवून त्यांचा मेळ घातला जातो. हा जो वाढविलेला महिना त्यालाच अधिक महिना म्हणतात. हा अधिक मास चैत्रापासून आश्विनापर्यंत येतो. कार्तिक , मार्गशीर्ष , पौष , माघ या चार महिन्यांत कधीही अधिक मास नसतो. अगदी एखाद्या वेळेस फाल्गुनात अधिक मास येतो. अधिक मासाला मलमास, पुरुषोत्तम मास, अधिमास, धोंड्याचा महिना अशी विविध नावे आहेत. काही व्रतवैकल्ये करून या महिन्यात पुण्य प्राप्ती करता येते, असे मानतात. या महिन्यात उपवास करणे किंवा एक वेळ जेवणे किंवा जेवताना मौन पाळण्याचे व्रत घेतात. या महिन्यात आपल्याला आवडता खाद्यपदार्थ न खाण्याचेही व्रत घेतात. महिन्याचे शेवटी सत्पात्र ब्राम्हणाला त्या वस्तूचे दान करून मग त्या वस्तूचे सेवन करतात. अधिक महिना सामान्यतः तेहतीस महिन्यांनी येत असल्याने तेहतीस अनारशांचे किंवा बात्ताशांचे दान करावे, असे सांगितले आहें. काही लोक सवत्स धेनूचे दान करतात. काही लोक दीपदान करतात. अशी विविध दाने या महिन्यांत करावीत पण ते दान सत्पात्री असावे ( म्हणजेच ज्याला ज्या गोष्टीची आवश्यकता आहें अशा सज्जनाला ते करावे ) तरच त्याचे पुण्यही मिळते आणि आनंद व समाधानही.








वैशाखी ( Vaishakhi ) :- वैशाखी शुध्द प्रतिपदेला पंजाबात शीख धर्मीय लोक ' वैशाखी ' हा उत्सव अतिशय आनंदाने, उत्साहाने साजरा करतात. ह्या दिवशी शीख धर्माची स्थापना झाली. गुरुनानकांनी या धर्माची स्थापना केली होती. वैशाखीच्या दिवशी गुरु गोविंदसिंगांनी पंच प्याऱ्याना अमृतादीक्षा दिली आणि खालसाची स्थापना केली. या दिवसाच्या अगोदर अठ्ठेचाळीस तास ग्रंथसाहेब या धर्मग्रंथांचे अखंड वाचन गुरुद्वारात चालते. हे वचन ऐकण्यासाठी लोक येत असतात. आणि वैशाखीच्या दिवशी सकाळी हे वाचन संपते. या दिवशी पुरुष केशरी किंवा पिवळा किंवा निळा फेटा बांधतात आणि स्त्रियाही याच रंगांचा वेश धारण करतात. हे रंग त्याग, सेवा, मनाची विशालता यांचे प्रतिक आहेत. अशाच उदात्त भावना मनात निर्माण व्हाव्यात ही कल्पना त्या रंगांचे पोशाख धारण करताना असते. या दिवशी ग्रंथ वाचनानंतर कवी दरबार असतो. त्या वेळी कवी आपल्या रचना सदर करतात. मानधन देऊन किंवा फेटे बांधून कवींचा सन्मान केला जातो. पाच सात वर्षाच्या मुलांना ' अमृत संस्कार ' असे म्हणतात. तसेच या दिवशी ग्रंथ साहेबांची वाजत गाजत मिरवणूक काढतात. ' पंचप्यारे ' म्हणून पाच नेते हाती नंग्या तलवारी धरून पुढे चाललेले असतात. त्यांनी केशरिया पोशाख केलेला असतो. ग्रंथसाहेबांच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर असते. या दिवशी समारंभाला जें कोणी (कोणत्याही धर्माचे ) लोक येतील त्यांना भोजन दिले जाते. या भोजन समारंभाला ' गुरूला लंगर ' असे म्हणतात.







पतेती , खोर्दाद साल ( Pateti , Khordad Sal ) ;- पतेती म्हणजे नव वर्षाचा सण. त्या दिवशी संपलेल्या वर्षात काय केलें ,याचा आढावा घ्यावा आणि नवीन वर्षासाठी शुभसंकल्प करावा अशी अपेक्षा असते. पारशी वर्षारंभ दिनाला ' नवराज ' म्हणतात. तो ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबर महिन्याच्या आरंभी येतो. त्यापूर्वी वर्षा अखेरचे सहा दिवस ' पतेती ' सण असतो. शेवटच्या दिवशी अहुर माझ्दाने विश्वाची निर्मिती केली आणि त्याच दिवशी पूर्ण इराणचा राजा गुस्तास्प याने झरतुष्ट्री धर्म ( पारशी धर्म ) स्वीकारला असे समजतात. हा सण दिवाळी सणासारखाच साजरा केला जातो. 'खोर्दाद साल' हा पारशी धर्माचे संस्थापक झरतुष्ट्राचा जन्मदिवस. हा दिवस मनोरंजनापेक्षा धार्मिक कृत्ये करून साजरा केला जातो. या दिवशी लोक अग्यारीत ( प्रार्थना स्थळ ) जातात व प्रार्थना करतात. झरतुष्ट्राने पहिला धर्मोपदेश केल्याने या दिवसाला विशेष महत्व आले आहें.






नाताळ ( Natal ) :- ख्रिस्ती धर्माचे संस्थापक , येशु ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबरला झाला. त्यामुळे या दिवसापासून ते नविन वर्षाच्या प्रारंभापर्यंत म्हणजे १ जानेवारीपर्यंत नाताळाचा सण किंवा ख्रिस्त जयंती चा सण साजरा केला जातो. या सणाच्यावेळी मोठ्या आनंदाचे वातावरण असते. लोक घरा दाराची स्वच्छता करतात, रंगरंगोटी करतात, कागदी फुलांच्या माळा, पताका, फुगे, विविध प्रकारची सुंदर चित्रे लावून घराची सजावट करतात. अशा सजलेल्या घरावर आकाश कंदील लावतात. हा बहुधा चांदणीचा आकाराचा असतो कारण येशू कोणत्या घरात जन्माला आला त्याचे मार्गदर्शन आकाशातल्या एका ताऱ्यानें केलें होते. घरात गोड पक्वान्ने केली जातात. 25 तारखेला लोक चर्चमध्ये येशू ख्रिस्तासंबंधी असणाऱ्या अनेक प्रार्थना म्हटल्या जातात. गाणी गायिली जातात. या दिवशी प्रत्येक घरात ' ख्रिसमस ट्री ' तयार करतात. त्याला पातकांनी सुशोभित करतात. येशू ख्रिस्त एक महान शांतिदूत होते. परस्परांवर प्रेम करा असे सांगणाऱ्या येशूने शत्रूवरही प्रेम करायला सांगितले आहें.







ईद-ए-मिलाद ( Id E Milad ) :- अरबस्थानात इसवी सनाच्या शतकाच्या प्रारंभी आपल्या इस्लाम धर्माची स्थापना झाली. हजरत मुहंमद पैगंबर हे या धर्माचे संस्थापक होते. इतर धर्मामध्ये जसे सण आहेत , तसेच या धर्मामध्येही सण साजरे केलें जातात. हे लोक ईद - ए - मिलाद , मोहरम , बकरी ईद , इत्यादि सण साजरे करतात. आपल्या इस्लाम धर्मातील सण ज्या महिन्यात येतात त्यांच्या कालगणनेस ' हिजरी सन ' असे म्हणतात. त्यांच्या नव्या दिवसाला सूर्यास्तापासून प्रारंभ होतो. ते चांद्रवर्ष मानीत असल्यामुळे त्यांचे महिने दर वर्षी वेग वेगळ्या ऋतूत येतात. इस्लाम महिन्यांची नावे अशी - मोहरम, सफ्फर, रबिउल अव्वल, रबिउल आखर, जमा दिलअव्वल, जमी दिलआखर, रज्जब , साबान, रमजान, सव्वाल, जिल्काद, जिल्हज यापैंकी सातवा , अकरावा , आणि बारावा हे तीन महिने विशेष पवित्र मानले जातात. ' ईद - ए - मिलाद - हा सण विशेष महत्वाचा मनाला जातो. मुहंमद पैगंबरांचा जन्म या दिवशी झाला आणि मृत्यूही त्याच दिवशी झाला. त्यामुळे या सणाला दुहेरी महत्व प्राप्त झालेले आहें. या दिवशी सगळे एकमेकांना भेटून ' ईद मुबारक' असे म्हणून ईदच्या शुभेच्छा देतात. मुस्लिम लोक मशिदीत जमून नमाज पढतात आणि कुराणाचे श्रवण पठण करतात.







मोहरम ( Moharam ) :- मोहरम हा सणही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा सण मोहरम महिन्याच्या सुरुवातीपासून दहा दिवस साजरा केला जातो. या सणामागे एक मोठा इतिहास आहें. मुहंमदाच्या मृत्युनंतर पैगंबराच्या गादीवरून वाद निर्माण झाला. मुहंमदाच्या मुलीचे हसन आणि हुसेन असे दोन मुलगे होते. थोरला हसन ह्याचा आजोबांच्या गादीवर डोळा होता. आपसात युद्ध नको, म्हणून हसन एका अटीवर गादी सोडायला तयार होता. अट फक्त एवढीच होती की, मायावियाने आपल्या परिवाराला त्रास देता काम नये. पण त्याने ही अट तर पाळली नाहीच, उलट हसनला ठार मारले. पुढे मायाविया मरण पावला पण त्याने आपल्या मुलाला गादीवर बसवले होते. लोकांना तो खलिफा नको होता. त्यांची इच्छा होती, सदाचरणी हुसेनने खलिफा व्हावे, तसे त्यांनी सुचविले. हुसेन आपल्या परिवारासह तिकडे यायला निघाला. ही बातमी शत्रूला ( मायावियाचा मुलगा यजिद याला ) anसमजली. त्याने त्याच्यावर आपले सैन्य पाठवले. त्यांनी हुसेनला गाठले. तहानेने व्याकूळ झालेला हुसेन आणि त्याच्या बरोबरचे लोक नदीकडे जात असता यजिदच्या सेनापतीने त्यांना ठार मारले. ह्या घटनेची आठवण म्हणून मोहरमच्या दिवशी आपले मुस्लिम लोक डोले ( ताजिये ) किंवा ताबूत तयार करतात. ते ताबूत मिरवत नेऊन नदीत शांत करतात. अशा तऱ्हेने मोहरामाचा हा सण हुसेनचा स्मृतिदिन आहें.

Post a Comment Blogger

 
Top