जेनेल हॉफमन या अमेरिकन आईनं आपल्या १३ वर्षाच्या मुलाला आयफोन घेऊन दिला. आणि
त्याबरोबर घातल्या काही अटी. जगभरातल्या आयांमध्ये चर्चेचा विषय ठरलेली ग्रेगच्या मॉमची ही गोष्ट. जेनेल हॉफमन ही एक अमेरिकन आई. तिला एकूण पाच मुलं आहेत. तिचा १३ वर्षाचा ग्रेग शाळा सुरू
झाल्यापासून तिच्या मागे भुणभुण करत होता की, मला माझा स्वत:चा मोबाइल हवाय आणि तोही आयफोनच! शेवटी जेनेलच्या लक्षात आलं की, आयफोन हे काही ग्रेगच्या डोक्यातलं तात्पुरतं
खूळ नाही. शेवटी तिनं आणि तिच्या नवर्यानं निर्णय घेतला आणि गेल्या ख्रिसमसला ग्रेगला
त्याचं गिफ्ट मिळालं - आयफोन! पण जेनेलनं आणखी एक गोष्टही तिच्या मुलाला दिली
त्याच्यासाठी आणलेल्या नव्याकोर्या आयफोनच्या खोक्यात तिनं एक चिठ्ठी ठेवली होती.
आयफोन हातात आलेल्या मुलासाठी काही नियम होते त्या चिठ्ठीत.
जेनेल इंटरनेटवर स्वत:चा ब्लॉग लिहिते. ग्रेगला लिहिलेली ती चिठ्ठी तिनं नंतर आपल्या ब्लॉगवर टाकली आणि जगभरातल्या आया ते वाचून भलत्याच खूश झाल्या.

लहान वयात टेक्नॉलॉजी हाताळण्यासाठी उताव असलेल्या हल्लीच्या मुलांना कसं आवरावं
आणि त्या टेक्नॉलॉजीच्या दुष्परिणातून त्यांना कसं दूर ठेवावं या चिंतेत असणार्या आयांना जेनेलनं
आपल्या या ब्लॉगमधून जणू एक नवा मार्गच दाखवला आहे. 'माझ्या मुलाला तंत्रज्ञानाचं व्यसन
लागू नये, त्यानं त्याचा दुरुपयोग करू नये असं मला वाटत होतं. तंत्रज्ञानाच्या आहारी न
जाता त्याचा उत्तम उपयोग कसा करावा हे माझ्या मुलानं शिकावं असं मला वाटत होतं म्हणून
मी त्याला एकूण १८ अटी घातल्या '- जेनेल हॉफमन लिहिते.

जेनेलच्या या १८ अटी सध्या इंटरनेटवर भलत्याच चर्चेत आहेत. त्यांचा हा अनुवाद

प्रिय ग्रेग,

१. हा आयफोन तुझ्यासाठी आणला असला तरी त्याच कारण याचे पैसे मी दिलेले आहेत. हा फोन तुझा नाही, तो मी तुला वापरायला दिलेला आहे, हे लक्षात ठेव.
२. त्या फोनला पासवर्ड टाकलास, तर तो मला माहिती असला पाहिजे.
३. रिंग वाजली की फोन उचलायचा. तो 'फोन' आहे. त्यावर तुझ्याशी बोलता येणं हा
त्याचा मूळ उपयोग आहे. शिवाय फोन न उचलणं असभ्यपणाचं आहे. त्यामुळे 'मॉम'किंवा 'डॅड' हे नाव फ्लॅश झालं की तो फोन उचलायचा..लगेच!
४. रोज संध्याकाळी ७.३० वाजता आणि शनिवार- रविवारी रात्री फोन माझ्याकडे द्यायचा. मी तो फोन रात्री बंद करीन आणि सकाळी ७.३० वाजता चालू करून परत तुला देईन. रात्री उशिरा तुला एखाद्या मित्राल मैत्रिणीला फोन करायचा झाला, तर तो त्यांच्या घरच्या फोनवर करायचा. त्यांच्या आई-वडिलांपासून लपवण्यासारखं त्यात काही असेल, तर असा फोन न करणंच उत्तम.
५. फोन शाळेत घेऊन जायचा नाही. ज्या कुणाशी तुला फोनवरून चॅटिंग करावंसं वाटतं त्यांच्याशी प्रत्यक्ष बोल. गप्पा मार. ही गोष्ट छान आयुष्य जगण्यासाठी फार आवश्यक आहे.
६. हा फोन पाण्यात पडला, संडासात पडला, हरवला फुटला किंवा त्याचं काहीही नुकसान झालं तर
त्याच्या दुरुस्तीचा किंवा रिप्लेसमेंटच करणं ही तुझी जबाबदारी असेल. त्यासाठी तू सुट्टीत
काम करू शकतोस, वाढदिवसाच्या पार्टीचे पैसे वाचवू शकतोस किंवा खाऊला दिलेले
पैसेही त्यासाठी वापरू शकतोस. फोनच्या बाबतीत अशा गोष्टी होतात. त्यामुळे त्याची तयारी ठेव.
७. या फोनचा वापर कधीच कोणाशी खोटं बोलायला किंवा कोणाला फसवायल नकोस.
भांडणं झाली तर एक चांगला मित्र जसा वागेल तसा वाग आणि नाहीतर त्या भांडणात
पडू नकोस.
८. ज्या गोष्टी तू प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीला सांगू शकत नाहीस त्या एसएमएस, मेल किंवा फोन करून सांगू नकोस.
९. एखाद्या मित्राच्या किंवा मैत्रिणी तू जी गोष्ट बोलणार नाहीस, ती फोन वापरून लपून मेल,
एसएमएस किंवा फोन करून सांगू नकोस.
१0. फोनवर कुठलंही साहित्य उघडायचं नाही. तुला इतर कामासाठी, प्रोजेक्टसाठी जी माहिती हवी असेल त्यासाठी जरूर फोनवरचं इंटरनेट वापर. पण त्याव्यतिरिक्त तुला काही प्रश्न असतील तर
माझ्याशी किंवा डॅडशी मोकळेपणानं बोल.
११. सार्वजनिक ठिकाणी, थिएटरमध्ये, हॉटेलमध्ये किंवा कुठल्या माणसाशी बोलत असताना फोन सायलेंट कर किंवा बंद कर, पण तो बाजूला ठेवून दे. समोरचा माणूस बोलत असताना आपण फोनशी खेळ करणं उद्धटपणाचं आहे. शिवाय आयफोन ही बोलण्यासाठी वापरायची एक गोष्ट आहे.
तो मिरवायचा स्टेट्स सिम्बॉल नाही.
१२. तुझ्या स्वत:च्या किंवा इतर कोणाच्या खासगी भागांचे फोटो काढून ते शेअर करू नकोस. हसू नकोस!
मला माहिती आहे की तुला सगळं समजतं. पण तरीही तुला असा मोह कधीतरी पडू शकतो. सायबर स्पेस खूप मोठी आहे आणि इथे एकदा आलेली प्रत्येक गोष्ट, वाक्य, फोटो, कॉमेंट कायम इथेच राहतं. अशा एखाद्या गोष्टीमुळे तुझं संपूर्ण आयुष्य बरबाद होऊ शकतं.
१३. उगीच हजारो फोटो आणि व्हिडिओ काढत बसू नकोस. प्रत्येक गोष्ट काही फोटो काढून ठेवण्याइतकी महत्त्वाची नसते. त्यापेक्षा तो क्षण मनापासून एन्जॉय कर, ते तुझ्या कायम लक्षात राहील.
१४. कधीतरी फोन घरी ठेवून बाहेर पड. फोन बरोबर नाही म्हणजे काहीतरी चुकतंय, काहीतरी राहून जातंय असं वाटून घेऊ नकोस. फोन न नेल्यामुळे काही गोष्टी मिस् होतील. तर त्या होऊ देत. पण त्या वेळात तुला जे मिळेल ते त्या 'फिअर ऑफ मिसिंग आऊट'पेक्षा मोठं असेल. १५. सगळे जण ऐकतात त्यापेक्षा वेगळं संगीत ऐक. शास्त्रीय संगीत ऐक. तुम्हाला आजवर कधीच नव्हतं एवढं संगीत नेटवर
सहज उपलब्ध आहे. त्याचा फायदा घे.
१६. मेंदूला ताण देणारे खेळ, शब्दांचे खेळ, कोडी मधून मधून खेळत जा.
१७. डोळे कायम उघडे ठेव. खिडकीच्या बाहेर काय आहे ते बघ. पक्ष्यांचे आवाज येतात का ते बघ, पाऊस हातावर घेऊन बघ, पायी चक्कर मारायला जा. गूगलशिवाय इतर गोष्टींमधली मजा समजून घे.
१८. मला माहितीये की तू यातले नियम मोडशील. मग मी फोन काढून घेईन. मग आपण त्यावर बसून चर्चा करू. मग तू परत प्रॉमिस करशील. मग मी तुला फोन परत देईन. आपण पुन्हा सुरुवात करू..
काय? चालेल नं? आयफोनबरोबर कसं वागायचं हे तू पहिल्यांदा शिकतो आहेस, तशी माझीही ही पहिलीच तर वेळ आहे. - मला अशी आशा आहे की, या अटी तुला मान्य असतील. यातल्या बहुतेक सगळ्य़ा अटी जरी नुसत्या फोनच्या बाबतीतल्या व आयुष्याबद्दल आहेत. तू आणि तुझ्या आजूबाजूच्या गोष्टी.. रोज बदलतायत, रोज वाढतायत. हे खूप एक्सायटिंग आहे पण त्याचबरोबर खूप कॉम्प्लिकेटेड
आहे. त्यामुळे होता होईल तेवढय़ा गोष्टी साध्या सरळ सोप्या ठेवायचा प्रयत्न कर. आणि सगळ्य़ात
महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही तंत्रज्ञानापेक्षा तुझं मन आणि तुझी बुद्धी यावर जास्त विश्वास ठेव.
तुझ्या नवीन आयफोनसाठी खूप खूप शुभेच्छा!

तुझीच, मॉम


आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top