.. नक्की वाचा…
***************
"मल्हार बाळा... तू शाळेत जायचास …. तेव्हा मास्तरांनी पत्र लिहायला शिकीवले असल ना?"
"हो बाबा… सांगा कुणाला लिहायचे आहे पत्र ?"
कृषिमंत्री असतात ना, त्यांना लीहायचे हाय… लेका, पोटासाठी...शेतीसाठी कर्ज मागायचे हाय…. लिहशील?"
"नक्कीच लिहितो…"
आणि मग १२ वर्षांचा छोटा मल्हार पत्र लिहू लागला....

*****************

"…
माननीय,
कृषी मंत्री ,
भारत.
विषय : इतक्या कमी शब्दात विषय मांडू शकत नाही, त्यामुळे विषय वाचून पत्र फेकण्यापेक्षा पूर्ण पत्र वाचावे , ही विनंती.
पत्र लिहिण्यास कारण की....
मी तसा बरा आहे ...
यंदा आपल्या कृपेने आत्महत्या कमी झाल्यात .. (जास्त जण उरलेच नाहीत आत्महत्या करायला... आम्ही मोजके भित्रे बाकी आहोत फक्त ).
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही माझ्या मुलाला कपडे, पुस्तक, खेळणी तर नाही... पण त्याला एक वेळेचे अर्धवट जेवण देण्याइतपत हिरवेगार "दु:ख" माझ्या शेतात
उगवले आहे ...
पाऊस कमी झाला यात तुमची काहीच चूक नाही ... घामाने जितके पिकवता आले तेवढे पिकवले ...
उधार मागायला सावकाराकडे जावू शकत नाही .. कारण पोरगी आणि बायको सोडून गहाण ठेवण्यासारखे आता काहीच उरले नाहीय...
माझ्या पोरीला माझा सदरा दिल्यामुळे ती सध्या आनंदात तर म्हणता येणार नाही, पण खुश आहे. कारण तिचे अंग ती आता झाकू शकते...
बायको माझी अगदी शांत आहे .. एकही शब्द बोलत नाही .. बसल्या बसल्या कधी उगीच रडून देते बस...
तरी तुमच्या अमाप संपत्तीतून आम्हाला काही उधार द्यावे ही विनंती ...
आमचेच लचके तोडून जमवलेली ती संपत्ती आहे हे सुद्धा ध्यानात घेतलेत तर तुम्हा मायबाप सरकारचे भले होईल .....
आपला,
...................."
****************************



"बाबा... अजून काही लिहायचं आहे ..?"
मी पोराकडे बघत होतो ..त्यानेच हे पत्र लिहिले होते... मी मोजक्या शब्दात सांगितले होते की काय लिहायचे आहे....
तो पत्र वाचत होता तेंव्हा डोळ्यात पाणी आलेले ..स्वताचा रागही आलेला ..आणि थोडे बरे ही वाटले की पोरगा हुशार आहे ...मी त्याला जवळ घेतलं ..
माझी "तनु" पण आली माझ्याजवळ.... म्हणाली "बाबा, मीच शिकवले आहे त्याला .. फी भरली नाही म्हणून आम्हाला शाळेत बसू देत नाही ना ..तर मी त्याला आता घरीच शिकवते ..."
मी तिला ही जवळ घेतले ...
बायको भरल्या डोळ्याने अश्रू लपविण्याचा प्रयत्न करीत होती ...
तिच्यासाठी... मुलांसाठी जगेन च्या आयला ...
त्यांना पाहिले की एक विश्वास येतो मनात ....
मी म्हंटले "मल्हार, अजून एक वाक्य टाक पत्रात शेवटी..."
तो बोलला: "सांगा बाबा .."
म्हंटले : "लिह... मी भ्याड नाहीय… शेतकरी असलो तरी अंगात हिम्मत आहे... मी लढेन गरिबीशी... शेवटच्या श्वासापर्यंत..."
हे एकून मी सुद्धा कधीतरी आत्महत्या करेन अशी सदैव भीती असलेली माझी बायको सुखावली थोडी ....
आणि ओरडली....
"पुरे झाले आता...
काम करत नाही काय नाही ..
ये तनु गिळायला वाढ त्यांना ...."
....आणि आडोश्याला जाउन ढसा ढसा रडू लागली..

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top