थर्टी फस्ट'चा बेभान जल्लोष करण्यापूर्वी. हे पत्र वाचा.!
ठरवलं असेल ना तुम्ही,
थर्टी फस्र्टला खूप धमाल करायची.. दरवर्षीपेक्षा काहीतरी हटकेच करायचं.
कुणी कितीही ओरडाआरडा करो.
आई-बाबा परवानगी देवो ना देवो
तुम्ही ठरवलेही असतील एव्हाना तुमचे प्लॅन्स.
किती लवकर संपलं ना हे वर्ष.
त्याला निरोप द्यायचा तर जंगी प्लॅनिंग करायलाच हवं.
काही दिवसांवर आलाय थर्टी फस्ट.
फुल्ल कल्ला करायचा आणि सॉलिड एन्जॉय करायचं प्लानिंग असेल तुमचं.!
एन्जॉय.! करा, मस्त मज्जा.!!
पण एक मिनिटं, थर्टी फस्ट आणि कोरडं.?
तुम्हीही ठरवलंय का. की यंदा थर्टी फस्टला 'ते'ही हवंच म्हणून.!
ठरवा हवं तर.
दारू प्यायची की नाही यावर तात्त्विक चर्चा नाही करत आत्ता.आत्ता मुद्दा थोडासा वेगळा आहे.
थर्टी फस्टची पार्टी संपली की घरी परत येताना कसे याल तुम्ही.? आणि मुख्य म्हणजे याल ना.?
दारू पिऊन गाडी चालवू नये, दुचाकी-चारचाकी दामटू नये. हा झाला नियम. तो किती जण पाळतात. ?
प्रत्येक वर्षी ड्रिंक आणि ड्राईव्हमुळे किती तरुण जीव आनंदाला मुकतात.?
आनंद करायचा म्हणून असं स्वतशीच वैर करायचं का, तुम्हीच ठरवा.!
पण ते ठरवणं सोपं जावं, म्हणून ही एक सध्या इंग्रजीतून फॉरवर्ड होत असलेली इमेल वाचा.
तुमचं सेलिब्रेशन प्लॅनिंग सुरू असेल सध्या. त्यात पाच मिनिटांत वाचून होईल ही ईमेल.
एका मुलाने आपल्या आईला लिहिलेलं हे पत्र आहे.
अशी मेल आपल्या आई-बाबांना वाचायला लागू नये.एवढंच.!
आई,
तू म्हणाली होतीस,
पार्टीला जायचंय, तर जा..
पण 'पिऊ' नकोस.. !
आई,
खरं सांगतो. मी नाही प्यायलो.
मी फक्त सॉफ्टड्रिंक प्यायलो.
सोडा असलेलं..!
आई,
खूप आग्रह केला मित्रांनी.
म्हणाले पी रे. पी रे.
पण नाही प्यायलो मी.
सगळ्यांनी चिडवलं मला,
भरीस पाडलं.
पण मी नाहीच ग्लासला हात लावला.
तुला दिलेलं प्रॉमिस पाळलं. न पिण्याचं.!
आई,
कोणी काहीही म्हणो.
न पिता एन्जॉय करता येतं
हे तुझं वाक्य माझ्या लक्षात होतं.
मला गरजच नाही वाटली नशेची.!
आई,
पार्टी संपत आली आहे आत्ता.
जो तो घराकडे निघालाय.
खूप पिऊन 'टाईट' झालेले
माझे मित्र
स्वत ड्राईव्ह करत घराकडे निघालेत.
मीही माझ्या कारजवळ पोहोचलोय.
निघालोय. पूर्ण शुद्धीत..!
मी येईन घरी धडधाकट.
नशेत गाडी ठोकण्याचा,
काहीबाही होण्याचा प्रश्नच नाही
मी प्यालोच नाही.
तर बेभान होण्याचं काही कारणही नाही.
आई,
मी निघालो.
गाडी काढतच होतो बाहेर.
पण पाहतो तर काय
समोरून एक गाडी सुसाट
येताना दिसतेय.
माझ्या जवळ अगदी जवळ येतेय ती. माझ्या गाडीवर..आदळतेय..
आई,
मी पडलोय गाडीबाहोर..
काहीच कळत नाहीये.
अंगातून काहीतरी
कारंजं फुटल्यासारखं उडतंय.
कोणीतरी हवालदार ओरडतोय जोरजोरात.
दारू पिऊन बुंगाट गाडी चालवत होती ती पोरं.
त्यांच्या गाडीनं ठोकलं याला.
मरणार हे पोरगं हकनाक.
आई,.
मला वेदना होताहेत गं खूप.
तू जवळ असावीस असं वाटतंय.
मी. मी.? आई.
मला का ठोकलं गं त्यांनी.
रक्ताच्या थारोळ्यात पडलोय मी.
जमलेत इथे सगळं जण.
डॉक्टर, पोलीस, .
ते डॉक्टर म्हणताहेत..
काही चान्सेस नाही,
संपलंय सारं.
काहीच उपाय नाही.
नाही वाचणार हा.
आई,
तुझी शपथ.
मी 'प्यायलो' नव्हतो गं.
त्या गाडीतली मुलं नशेत होती.
खूप प्यायली होती.
दारू पिऊन गाडी चालवत होती..
आई,
ती मुलंही माझ्याच बरोबर
त्या पार्टीत होती बहुतेक
फरक इतकाच..
की प्यायले ते आणि मरतोय मी.!
का पितात गं आई हे लोकं.?
सगळं आयुष्य नासवतात..
स्वत:चं.
आणि दुसर्यांचंही. !
आई,
मला आता असह्य वेदना होतायंत.
आतल्या आत काहीतरी चिरत, कापत जातंय.
आई,
ज्या मुलाने माझी ही अवस्था केली
तो शुद्धीत येतोय आता.
मी कळवळतोय आणि
तो फक्त पाहतोय. सुन्नपणे. !
आई,
माझ्यासारखंच त्यालाही कुणीतरी सांगायला हवं होतं.
दारू पिऊन गाडी चालवू नकोस.
त्यानं ते ऐकलं असतं तर
आज मी जिवंत राहिलो असतो गं.
आई,
मला आता श्वास लागायला लागलाय.
तुटायला लागलोय मी अख्खा. आतल्या आत.
पण
तू नाही रडायचंस माझ्यासाठी.
मला जेव्हा जेव्हा तुझी गरज होती.
तेव्हा तेव्हा होतीस तू माझ्या बरोबर.
माझ्यासाठी.!
पण मरताना मला फक्त
एक शेवटचा प्रश्न पडलाय.
जर मी दारू पिऊन गाडी चालवत नव्हतो तर मग मी का मरायंचं?
दुसर्याच्या चुकीची शिक्षा
मीच का भोगायची..?
आई. का लोक दारू पिऊन गाडी चालवतात गं.?
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.