आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात.

ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा,
त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी,
आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना
साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर
महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या
ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा
सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला
मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना 'व्यासांचा मागोवा
घेतू' असे म्हणून सुरुवात केली.

व्यासपौर्णिमेच्या दिवशी 'ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे' अशी
प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे.
आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे.
आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर
आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने
कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी
प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.

आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय
गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य,
शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण,
परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र
एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत
नाही.

भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी
वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात
विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर.
भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.
गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे
प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत
पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु
घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी
मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला
ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. 'गुरु बिन ज्ञान
कहासे लाऊ?' हेच खरे आहे.

गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून
श्लोक बाहेर पडतो -
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll

अशा या गुरु पौर्णिमेच्या मंगल दिनाच्या  सर्वांना  हार्दिक शुभेच्छा !!

आभार - बालसंस्कार.कॉम

टिप्पणी पोस्ट करा Blogger

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top