नारळी पौर्णिमा

प्रस्तावना

 सण, उत्सव व व्रते यांच्यामागचे शास्त्र लक्षात घेऊन श्रद्धापूर्वक साजरे करण्यात आपलेच कल्याण असते. वास्तविक आपल्या जीवनात नेहमीच संयम पाहिजे, पण तो पाळला जात नाही; म्हणून निदान सण, धार्मिक उत्सव व व्रतांच्या दिवशी तरी तो पाळला जावा, म्हणजे हळूहळू नेहमीच संयमित जीवन जगता येईल. कर्मकांडाच्या दृष्टीने सण, धार्मिक उत्सव व व्रते इतकी महत्त्वाची आहेत की, वर्षातील जवळजवळ ७५ टक्के तिथींना यांपैकी काही ना काही असतेच. यात श्रावण महिन्याला सण, धार्मिक उत्सव व व्रतांचा महिनाच म्हटले जाते. या महिन्यात येणार्‍या सण, धार्मिक उत्सव व व्रतांमध्ये नारळी पौर्णिमा हा एक सण साजरा केला जातो.

नारळी पौर्णिमेला करण्यात येणारे वरूणदेवतेचे पूजन

पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो, तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात. नागपंचमी नंतर श्रावणात येणारा हा दुसरा सण आहे. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्‍तीचेही प्रतीक मानलेले आहे. नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. `सागरे सर्व तीर्थानि' असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा. जहाजांनी मालाची वाहतूक करतांना वरुणदेव प्रसन्न असल्यास तो साहाय्य करतो.

नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण का करावा ?

(नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपतत्त्वात्मक यमलहरींचे आधिक्य असल्याने व नारळाच्या पाण्यातील तेजतत्त्व यमलहरींना ताब्यात ठेवत असल्याने जलावर ताबा मिळवणार्‍या सागररूपी वरुणदेवतेला नारळ अर्पण करतात.) या दिवशी ब्रह्मांडात आपतत्त्वात्मक यमलहरींचे आधिक्य असते. या लहरी ब्रह्मांडात भोवर्‍याप्रमाणे गतिमान असतात. वरूणदेवता ही जलावर ताबा मिळवणारी व त्याचे संयमन करणारी असल्याने या दिवशी सागररूपी वरुणदेवतेला आवाहन करून तिला नारळ अर्पण करून ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या यमलहरींना ताब्यात ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते. नारळातील पाण्यात तेजतत्त्वाचे प्रमाण अधिक असते. नारळातील पाणी हे आपतत्त्वाचे प्रमाण जास्त असणार्‍या यमलहरी ग्रहण करण्यात अतिशय संवेदनशील असते. वरुणदेवतेला आवाहन करतांना तिच्या कृपाशीर्वादाने यमलहरी नारळाच्या पाण्याकडे आकृष्ट होतात. नारळाच्या पाण्यातील तेजतत्त्व या यमलहरींना ताब्यात ठेवून त्यांतील रज-तम कणांचे विघटन करून त्यांना सागरात विलीन करते; म्हणून या दिवशी वायुमंडलातील यमलहरींचे नारळाच्या माध्यमातून उच्चाटन करून सागररूपी वरुणदेवतेच्या चरणी त्यांचे समर्पण करण्याला महत्त्व आहे. यामुळे वायुमंडलाची शुद्धी होते. यमलहरींच्या वातावरणातील अधिक्यामुळे शरीरात अधोगामी वहाणारे वायु कार्यरत् झाल्याने पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या त्रासदायक लहरी पटकन जिवाच्या तळपायाकडे आकृष्ट झाल्याने त्याला त्रास होण्याची शक्यता जास्त असते.

समुद्राला नारळ `अर्पण' कसा कराल ? 

 

नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतांना तो पाण्यात फेकू नका, तर हळुवारपणे सोडा ! नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुणदेवतेला आवाहन करून सागराला नारळ अर्पण करतात. ते करतांना काही जण नारळ पाण्यात फेकतात. त्यामुळे नारळ अर्पण करण्यामागील अपेक्षित लाभ मिळत नाही; म्हणून तो भावपूर्णपणे हळुवार पाण्यात सोडावा.

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी



टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top