श्री स्वामी समर्थ........ एक मुसलमान वयस्कर स्त्री घरी बनवलेले दही विकुन आपला चरितार्थ चालवत असे. तिने बनवलेल्या गोड दह्याला बरीच मागणी होती. अश्याप्रकारे ती वयस्कर बाई आपला आयुष्य कंठीत होती .
तिने स्वामींचे नाव ऐकले होते पण कधी प्रत्यक्ष दर्शन घेतले नव्हते. दही बनवताना शांतपणे नामस्मरण करणे एवढीच तिची भक्ती मर्यादित होती.
एक दिवस तिला सगळ्यांना एवढे आवडणारे दही, स्वामींना आपल्या हाताने भरवण्याची तीव्र इच्छा झाली. झालं!! एक दिवस ती बाई पहाटे लवकर उठून, घरी लावलेलं दही घेऊन अक्कलकोटच्या मार्गावर चालू लागली.
तिला दुपारच्या आत अक्कलकोटला पोचायचे होते. कारण सुर्य डोक्यावर आल्यावर झालेले आंबट दही स्वामींना कसे द्यायचे? हा प्रश्न तिला भेडसावत होता. भरभर पाउलं टाकत ती बाई अक्कलकोटच्या मार्गाने चालत होती.
दिवस वर येऊ लागला तस उन वाढू लागले. त्या वयस्कर बाईची दमछाक होऊ लागली. तरीही नेटाने ती बाई जोरात चालतच राहिली. बघता बघता माध्यान्य झाली. सूर्य डोक्यावर आला.उन्हाळ्याचे दिवस होते. बाईच्या तोंडाला कोरड पडली. पाउल पुढे टाकवेना. जीव कासावीस झाला. तरीही ती बाई नामस्मरण करत वाट तुडवतच राहिली. एक वेळ आली की बाईला पाउल पुढे टाकवेना. तिचा प्राण कंठाशी आला. दमून ती बाई एका झाडाच्या सावलीत बसली. डोक्यावरचे दह्याचे मडके तिने आपल्या समोर ठेवले. त्या मडक्याकडे बघून त्या बाईच्या डोळ्यात पाणी आले.
माझ्या स्वामींना मी दही भरवू शकत नाही. संध्याकाळपर्यंत दही आंबट झाले कि ते त्यांना आवडणार नाही. या कल्पनेने ती व्याकूळ झाली. तिचा जीव कळवळला. स्वामींच्या नामस्मरणाखेरीज दुसरा पर्याय तिच्याकडे उरला नव्हता. गरीब बिचारी ती अगतिक म्हातारी झाडाखाली बसून स्वामीचा जप करू लागली. डोळ्यातून अश्रू यायचे थांबत नव्हते.
इकडे त्या दिवशी स्वामींना राजवाडयात जेवायचे आमंत्रण होते. जय्यत तयारी मालोजीराजांनी केली होती. भव्य पंगत, नाना पक्वाने, सगळा राजेशाही थाट होता. तयारी सगळी झाली होती. अवघी सभा स्वामींची प्रतीक्षा करत होती.
ठरल्यावेळी स्वामी आले. मालोजीराज्यानी त्यांना स्वतः पाटावर बसवले, पूजा केली. चरण धुतले. आता सुरवात करायची. स्वामीनी पहिला घास घेतला कि सभा पण जेवायला मोकळी.
स्वामीनी पहिला घास घेतला मात्र तोंडाकडे आणून ते थबकले,त्यांची समाधीच लागली. सभेला काही कळेना.सगळेजण तर्कवितर्क काढू लागले. मालोजीराज्याना वाटले जेवण अळणी आहे, किंवा काहीतरी चुकले आहे. त्यांनी तशी स्वामींना विचारणा केली. पण स्वामी काही बोलेचनात.
इकडे या बाईसमोर स्वामी प्रकट झाले आणी म्हणाले "आई जेवायला बसलो ग! पण दहीच नाही बघ. तुझ्याकडे आहे ना,भरव मला" ती म्हातारी खूप आनंदीत झाली. पटापट तिने मडके उघडून स्वामींना दही भरवले. दही भरवताना तिच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. स्वामी दही खातखात ते अश्रू पुसत होते. झाले! दही खाऊन स्वामी निघून गेले. या म्हाताऱ्या बाई चे समाधान झाले.
इकडे पंगतीमध्ये जरावेळाने स्वामीनी पहिला घास घेतला. सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.
मालोजीराज्याना स्वामी म्हणाले, "मालोज्या, गोड दह्याशिवाय जेवणात मजा नाही बघ". सगळ्यांना आश्चर्य वाटले कारण त्या दिवशी जेवणात दहीच नव्हते. कोणालाच काही कळेना.
संध्याकाळी ती म्हातारी बाई अक्कलकोटला पोहचल्यावर सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला.

श्री स्वामी समर्थ.

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top