मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी श्री दत्त महाराजांचा  जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्त जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.


दत्तजयंतीचे महत्त्व


दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते.

जन्मोत्सव साजरा करणे

दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजीत केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे.

महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. 


श्रीदत्तजन्माख्यान -श्री दत्तात्रय दैवत आगळे, दत्तजन्म कथा


दत्तात्रय हा शब्द 'दत्त' व 'आत्रेय' अशा दोन शब्दांनी बनला आहे. 'दत्त' या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्‍तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि 'अत्रेय' म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मा‍त्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे, असाच बोध होतो.

अत्रीऋषींनी पुत्रप्राप्‍तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली.


श्रीदत्तजन्माची एक कथा ब्राह्मणपुराणात आहे. अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्‍तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्‍त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्‍त झाली.


याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की, राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंध:कारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णु यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला.


भारतात शैव, वैष्णव आणि शाक्‍त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात श्रीदत्त आराधणेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करताना दिसतात.


श्री दत्त संप्रदायातील साधक 'अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त' असा जयघोष करत असतात. अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे- नेहमी आनंदात रमणारा, प्रत्येक क्षण वर्तमानकाळात जगणारा होय. श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्‍वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे. श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते. पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णु असावे, अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती. तसेच त्यांनी अग्नीला गुरु माणून आपला देह हा क्षणभंगूर आहे, अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती. अशाप्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे. ते पाहण्यासाठी श्रीदत्तगुरूंनी चोवीस गुरु केले होते.


श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबुलभक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्यारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरनार येथे करीत असता. श्री दत्त अवलिये होते. क्षणात कोठेही अंतर्धान पावत असत. श्री कृष्णांच्या लीलाप्रमाणेच श्रीदत्तात्रयाच्या लीला आहे.

महाराष्ट्रात हिंदूच्या बरोबरीने मुस्लिम समाजही श्रीदत्तप्रभुची उपासना करताना दिसतो. 'श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार, 'श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा तर 'स्वामी समर्थ  हा तिसरा अवतार आहे. जैनपंथीय श्री दत्तगुरूंची 'नेमिनाथ' म्हणून पूजा करतात तर मुसलमान 'फकिर' म्हणून पूजतात. दत्तजयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो. गुरुचरित्राचे पारायण केले जाते. भजन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजन केले जाते.

आंतरजालावरून साभार - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top