दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ रोजी मंगळवारी , कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे . ग्रहण ग्रस्तोदित म्हणजे ग्रस्त असलेले ग्रहण सुरू झालेले चंद्रबिंब उदयाला येईल . त्यामुळे भारतात ग्रहण स्पर्श दिसणार नाही . पूर्व भारतात मात्र खग्रास चंद्रग्रहण दिसेल , तर उर्वरित भारतात खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल . भारतासह पूर्ण आशिया , ऑस्ट्रेलिया , पूर्व अमेरिका व दक्षिण अमेरिका या देशात ग्रहण दिसेल .
ग्रहणाचा वेध
हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने मंगळवारी ८ नोव्हेंबर च्या सूर्योदयापासून मोक्षापर्यंत म्हणजे सायंकाळी ६:१९ पर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत . बाल , वृद्ध , अशक्त , आजारी आणि गर्भवती यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजेपासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत . वेधामध्ये भोजन करू नये , स्नान , जप , देवपूजा , श्राद्ध , इत्यादी करता येतील . तसेच पाणी पिणे , झोपणे , मलमूत्रोत्सर्ग करता येईल . ग्रहण पर्वकाळात म्हणजे आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून ते सायंकाळी ६:१९ पर्यंत या काळात पाणी पिणे , झोपणे , मलमुत्रोत्सर्ग ही कर्म करू नयेत .
ग्रहणातील कृती
सूर्यास्त होतात स्नान करावे . पर्व कालामध्ये देवपूजा , तर्पण , श्राद्ध , जप , होम व दान करावे . पूर्वी घेतलेल्या मंत्रांचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे .तसेच ग्रहणकाळात केलेल्या उपासनेमुळे मंत्रसिद्धी प्राप्त होणे, वाचासिद्धी प्राप्त होणे तसेच अनेक समस्येपासून मुक्ती मिळू शकते. जे साधक आहेत त्यांनी वेध सुरू झाल्यापासून ग्रहण मोक्षापर्यत शक्यतो मौन राहून जास्तीत जास्त तुम्ही करत असलेल्या मंत्रांचे जप करावेत. ग्रहणकाळात तुळशीला स्पर्श करू नये किंवा तुळशीची पाने अजिबात तोडू नयेत. ग्रहण मोक्षानंतर परत स्नान करावे . अशौच असता ग्रहणकालात ग्रहणा संबंधी स्नान , दान करण्यापूर्ती शुद्धी असते .
ग्रहणाचा पर्वकाळ
खग्रास चंद्रग्रहण स्पर्श दुपारी 02.39 वाजता असून मध्य दुपारी 04.30 वाजता आहे आणि ग्रहण मोक्ष सायं. 06.19 वाजता होईल.
वरील वेळा संपूर्ण भारताकरता आहेत .
ग्रहणाचे राशी परत्वे फल
शास्त्रानुसार ज्यांची चंद्र रास सिंह, तूळ, धनू आणि मीन आहे अशा राशी असणार्यांना मध्यम फलप्राप्ती होईल. ज्यांची रास मिथून, कर्क, वृश्चिक आणि कुंभ राशी असणार्यांना शुभ फलप्राप्ती होईल. ज्यांची रास मेष, वृषभ, मकर आणि कन्या राशी असणार्यांना ह्या ग्रहणाचे अशुभ फल प्राप्त होवू शकते.
( संदर्भ: दाते पंचांग)
तुळशी विवाह
कार्तिक शुद्ध द्वादशी शनिवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी तुलसी विवाह आरंभ होत आहे . दिनांक ५ ,६ , ७ नोव्हेंबर यापैकी एका दिवशी तुळशी विवाह करणे योग्य होईल . ते शक्य नसेल तर
पौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी तुलसी विवाह समाप्ती दिवशी मंगळवारी चंद्रग्रहण असल्याने सायंकाळी ६:१९ नंतर म्हणजे ग्रहण मोक्ष झाल्यानंतर स्नान करून नंतर तुलसी विवाह करता येईल .
बरेच जणांकडे पौर्णिमेचा कुलधर्म कुलाचार आहे तो कुलाचार ग्रहण समाप्तीनंतर स्नान केल्यावर करता येईल .
कार्तिक स्वामी दर्शन
यावर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला कार्तिक स्वामी दर्शनाचा योग नाही कारण पौर्णिमेच्या दिवशी जर कृतिका नक्षत्र असेल तरच स्त्रियांना कार्तिक स्वामी दर्शन करता येते . पण यावर्षी पौर्णिमेला भरणी नक्षत्र आलेले आहे , त्यामुळे कार्तिक स्वामी दर्शन महिलांना यावर्षी घेता येणार नाही .
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
टिप्पणी पोस्ट करा