आता विश्वात्मके देवे। येणे वाग्यज्ञे तोषावे॥ तोषोनि मज द्यावे। पसायदान हे॥१८.१७९३॥

"आता" म्हणजे कधी? तर हा आपल्या गुरुकृपाप्रसादाने अर्थात् श्री निवृत्तीनाथांच्या कृपेने आरंभिलेला ९००० ओव्यांचा हा वाग्यज्ञ पूर्णत्वास गेल्यानंतर! आता विश्वात्मक देवाने "तोषावे" म्हणजे संतुष्ट व्हावं आणि ह्या विश्वाच्या अंत:करणाच्या प्रसन्नतेच दान मला द्यावं.हे दान सुद्धा ज्ञानेश्वरांनी त्याच विश्वात्मक देवाकडे मागितलयं ज्याला अभिवादन करुन त्यांनी ह्या ऐतिहासिक वाग्यज्ञाला प्रारंभ केला होता.
ॐ नमोजि आद्या ।वेदप्रतिपाद्या॥ जयजय स्वसंवेद्या ।आत्मरुपा॥ कसं आहे विश्वात्मक देवाचं स्वरुप? ते आद्य तत्त्व आहे विश्वाच्या अणूरेणूंमध्ये ओतप्रोत भरलेलं! वेदांनी ज्याचं प्रतिपादन केलं आहे. ते स्वसंवेद्य आहे म्हणजे त्याची अनुभुती फक्त स्वत:लाच होते इतरांना करुन देता येत नाही.अशा प्रकारचं जे स्वरुप आहे तेच आत्मरुप आहे. ते आपणा सर्वांमध्ये आहे फक्त आपणाला त्याची जाणीव नाही,संवेदना नाही. असं जे अविनाशी तत्त्वं आहे त्यालाच वंदन करुन आपल्या वाग्यज्ञाला आरंभही केला अन् ह्या सर्व चराचर सृष्टीतील प्राणिमात्रांच्या अंतःकरणाचं दान सुद्धा मागितलं.पसायदान हे केवळ विश्वात्मक देवाकडे मागितलेलं दान नसून ते ज्ञानेश्वरांच्या विशाल अंतःकरणाचं प्रतिकसुद्धा आहे.
दुरितांचे तिमिर जावो | विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ||
जो जे वांछील तो ते लाहो | प्राणीजात|| १८.१७९५

“सर्व प्राणी मात्रांमध्ये जर मैत्रभाव निर्माण व्हायचा असेल तर सर्वात आधी काय हवं? तर अज्ञानाचा अंधकार नाहीसा व्हायला हवा.कसा बर होईल नाहीसा तो? ज्ञानेश्वरांनी तत्कालीन समाज व्यवस्थेचा खूप बारकाईने अभ्यास केलेला आहे. आपसात मैत्र वाढीस कसे लागेल हे सांगताना ते म्हणतात -
“दुरितांचे तिमिर जावो”
“दुरित” म्हणजे पाप
“तिमिर” म्हणजे अंधार पापाचा अंधार नाहींसा होवो, आणि
“विश्व स्वधर्म सूर्ये पाहो||”
“आपल्याकडे धर्म ह्या शब्दाने खूप गोंधळ घातलेला आहे. पण माऊलीने हा शब्द "स्वतःची कर्तव्ये" ह्या अर्थी वापरला आहे. प्रत्येकाने त्याची कर्तव्ये कशी पार पाडावीत तर सूर्य जसा निरपेक्षपणे त्याच काम करतो ना अगदी त्या प्रमाणे! प्रत्येकाने त्याचा स्वधर्म पाळला म्हणजेच स्वतःची कर्तव्ये हि व्यवस्थित पार पडली कि मग कोणतीही अडचण राहत नाही. म्हणजे विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळवत असताना इतर कोणताही मोह बाळगणे हे त्याच्या कर्तव्यापासून दूर गेल्यासारख होईल. स्त्री हि नेहमी स्त्री च असते जेव्हा ती आई होते तेव्हा तेव्हा तिच्या मध्ये मातृधर्म प्रकट होतो तेव्हा तो सोडून तिला इतर कोणताही मोह होणे हा स्वधर्मापासून परावृत्त झाल्यासारखे असेल. राजाला त्याच्या प्रजेचे हित पाहण्याचे सोडून इतर कोणताही मोह झाल्यास त्याला पापाचरण म्हणता येईल.आणि ह्याच पापाचा अंधार माऊलींना नष्ट व्हावा असे वाटते.आणि जेव्हा प्रत्येकाला स्वधर्माचे द्न्यान होईल,तेव्हा प्रत्येक जण एकमेकांच्या सुखासाठी प्रयत्न करू लागेल,दुसऱ्याला झालेला आनंद तो स्वतःचाच मानू लागेल आणि मग
“जो जे वांछील तो ते लाहो | प्राणीजात ||”
ज्याला जे हव ते मिळू दे.कारण कुणीही त्यावेळी कोणत्याही गोष्टीची इच्छा स्वार्थभावनेने करणारच नाही. मग केवळ मनुष्य मात्र नव्हे तर अखिल प्राणी जातीच्या सुखासाठी झटू लागेल. आणि खऱ्या अर्थाने स्वधर्माचा सूर्योदय होईल. आणि प्रत्येकाचे मागणे हे एकमेकांच्या हितासाठी असल्याने माऊली विश्वात्मक देवाजवळ प्रार्थना करते कि समस्त प्राणी जातीला जे इच्छा करतील ते प्राप्त होऊ दे. माणसाच्या मूळ माणूसपणावर ज्ञानेश्वरांचा किती प्रगाढ विश्वास आहे हे इथे दिसून येतंय!
वर्षत सकळ-मंगळी| ईश्वरनिष्ठांची मांदियाळी |
अनवरत भूमंडळी | भेट तू भूता||१८.१७९६||

“सत्संगती सदा घडो,सुजन वाक्य कानी पडो|
कलंक मातीचा झडो, विषय सर्वथा नावडो ||”

सर्व परिचित आणि सर्वज्ञात असे हे बोल याच चालत बोलत उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर माऊली! जेव्हा भगवंताला सृष्टीची उत्पत्ती करण्याची इच्छा झाली तेव्हा प्रथम त्याने सूर्य,चंद्र आणि ग्रह तारे निर्माण केले,त्यामध्ये पृथ्वी हा असा एकच ग्रह असा आहे,कि जिथे हजारो वर्षांपासून जीवसृष्टी अस्तित्वात आहे.ह्या पृथ्वीवरील भारतभूमी इतर भूभागांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.हि भूमी देवभूमी आहे,तपोभूमी आहे,हि आर्यभूमी तेजस्वी पुत्रांना जन्म देणारी आहे.ह्याच पवित्र भूमीवरून गंगा,सिंधू,ब्रह्मपुत्रा आदि पवित्र नद्या वाहतात.ह्या नद्यांच्या तीरावरील अनेक तीर्थक्षेत्र ह्या भूमीच्या समृद्ध आणि सांस्कृतिक वारश्याची साक्ष देतात.ह्याच भूमीवर भगवंताने दशावतार घेऊन जीव सृष्टीचा विकास केला.परमेश्वराने अनुकरणीय श्रीराम आणि चिंतनीय श्रीकृष्ण म्हणून नरदेहात जन्म घेतला.ह्याच भूमीवर चराचरांना मार्गदर्शन करण्यासाठी वैदिक धर्माची स्थापना साक्षात् परमेश्वराने केली.भगवान श्रीकृष्ण ह्या पूर्णावतारानंतर मात्र भगवंताला वाटल कि आपण मानवाची सर्वोत्तम प्राणी म्हणून उत्पत्ती तर केली,त्याला देह बरोबर मन आणि बुद्धी दिली,विवेक दिला.पण तो हळू हळू शिकणारा प्राणी आहे.षड्रिपू हे त्याच्या देहाबरोबरच येतात,ह्या षड्रिपूशी कसा सामना करायचा?ते त्याला कोण शिकवणार? त्याला आधार कोण देणार?त्याला आत्मोन्नतीचा मार्ग कोण दाखवणार?त्याला सनातन म्हणजे नित्य नवीन असणाऱ्या वैदिक धर्माचे रक्षण करण्याची शिकवण कोण देणार? भगवंताला जेव्हा समस्त मानवजातीची दया येते तेव्हा तो गुरुस्वरुपात,संत सत्पुरुषांच्या स्वरूपात जन्म घेतो.
“वर्षत सकळ-मंगळी| ईश्वरनिष्ठांची मांदियाळी |”
वर्षत म्हणजे वर्षाव व्हावा, ओघ लागून राहावा.
सकळ-मंगळी|- म्हणजे सर्व प्राणी मात्रांना! कुणाचा?
तर ईश्वरनिष्ठ लोकांचा!
माऊली म्हणते कि अशा स्वरूपातील व्यक्तींच्या जन्माचा ओघ ह्या पृथ्वीतलावर अखंड अविरत लागून राहिला पाहिजे.आणि हे लोक कसे असतात तर “ईश्वरनिष्ठ”! आपण मात्र नश्वरनिष्ठ असतो.माहित असत कि हे संपणार आहे,अशाश्वत आहे,नाश होणार आहे तरीही त्याच्या प्राप्ती साठी आयुष्यभर जीव टाकतो आणि जे नित्य चिरंतन अविनाशी तत्व आहे त्याकडे आपल लक्षच नसत.आयुष्यभर आपण सत्ता संपत्ती ह्या नश्वर गोष्टीनकरिता झगडत राहतो. आपल्याला वाटत असत कि सत्ता संपत्ती आणि शस्त्र ह्या तिन्ही पैकी एखादी जरी गोष्ट मला प्राप्त झाली तरी मी जगावर राज्य करू शकेन. पण ह्या तिन्ही गोष्टी अत्यंत बेभरवशासाठी प्रसिद्ध! सत्ता आज आहे उद्या नाही,संपत्ती हि तर चंचलपणासाठी प्रसिद्ध! आणि शस्त्र,शस्त्र तर इतक बेभरवश्याच कि विकत घेणाऱ्याच्या संरक्षणाची हमी ते देऊ शकत नाही. शस्त्राला मन नसत,बुद्धी नसते,विवेक नसतो.असत तर त्याला कळल असत कि आपल्याला विकत घ्यायला आलेला मनुष्य हा वाईट आहे,त्याच्याच अंगावर ते उडाल असत. ह्या सर्व गोष्टी करताना आपणाला भगवतांच्या भक्तीची आठवण, त्याच्या कडे जाण्याचा मार्ग दाखवणाऱ्या व्यक्तीची पराकोटीची गरज असते. म्हणून ज्ञानेश्वर विश्वात्मक देवाजवळ मागण मागतायत-
अनवरत भूमंडळी | भेट तू भूता||१८.१७९६||
अनवरत-म्हणजे अखंड अविरतपणे
भूमंडळी- भूतलावर
भेट तू भूता||-

तू अखंड अविरतपणे संतांच्या,सज्जनांच्या,सत्पुरुषांच्या आणि गुरुस्वरुपातील व्यक्तींच्या माध्यमातून ह्या समस्त मानव जातीला भेटत राहा. मार्गदर्शन करत राहा,पृथ्वीवरील अज्ञान तिमिराने ग्रासलेल्यांना ज्ञानाचा प्रकाश दाखव. आणि त्यांचा उद्धार कर.
“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत|
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम||
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् |
धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे ||”
(जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल,तेव्हा तेव्हा मी स्वतः जन्म घेईन आणि धर्माच अभूत्थान घडवून आणेन. जी दुष्कृत्ये आहेत त्यांचा नाश करेन आणि सज्जनांचा उद्धार करेन “) ह्या भगवंतवचनाची आठवण ते त्यालाच करून देतायत. आणि पुनःपुन्हा जन्म घेण्याचा आग्रह करतायत. आज सभोवताली पाहता खरच परिस्थिती खूप गंभीर आहे! ईश्वरनिष्ठ लोकांचे मेळावे ओसरले आहेत आणि नश्वरनिष्ठ लोक पावलोपावली भेटतायत.ह्या सर्व गोंधळात एक प्रश्न खरोखर विचार करण्यासारखा आहे- आपण खरोखरच ईश्वरनिष्ठ आहोत का?..
चला कल्पतरूंचे आरव | चेतना चिंतामणीचें गाव|
बोलते जे अर्णव पीयूषांचे||१८.१७९७||
चंद्रमे जे अलांछन| मार्तंड जे तापहीन |
ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतु||१८.१७९८ ||

विश्वात्मक देवाजवळ मागण मागताना माऊली सर्व प्राणीमात्रांना सत्पुरुषांच्या रुपाने भेटणाऱ्या लोकांचे वर्णन करताना म्हणते- हे लोक कसे असतात बर? तर “चला कल्पतरूंचे आरव”! म्हणजे काय ?तर चालती बोलती कल्पतरूंची अरण्येच! जंगलामध्ये एखादाच कल्पतरू सापडतो,तो शोधावा लागतो मग त्या खाली बसून ज्याची इचा करावी ते अगदी विनासायास मिळत.पण इथे मात्र वेगळीच परिस्थिती आहे.इथे प्रत्येक व्यक्ती हि कल्पतरूच आहे.त्यांच्या सावलीत गेलं कि काही मागावं लागत नाही आपोआपच सर्व मिळत जात. आणि मने?
“चेतना चिंतामणीचें गाव”
त्यांची मने म्हणजे तर चिंतामणी रत्नांची गावेच जणू! चिंतामणी नावच रत्न आपल्या चिंता हरत अस म्हणतात, हे सत्पुरुष सुद्धा आपल्या चिंता तत्काळ हरण करतात, इतरांचा त्रास ते स्वतःचा समजतात.वाचा तर इतकी गोड कि “बोलते जे अर्णव| पीयूषांचे” चालते बोलते अमृताचे समुद्रच! समुद्राला तरी भरती ओहोटी असते परंतु ह्यांच्या अमृत मधुर वाणीला मुळीच भरती ओहोटी नसते. अखंडित ,अव्याहतपणे ह्यांचे अमृत सिंचनाचे कार्य चालूच असते! ह्यांचे केवळ बोल ऐकताच मनाला शांतता व स्थिरता लाभते. दुःखाचा विसर पडतो.आणि मनुष्याचे मन ईश्वर चरणी रमू लागते!
पुढे ज्ञानेश्वर वर्णन करतात- “चंद्रमे जे अलांछन| मार्तंड जे तापहीन “
हे सत्पुरुष चंद्राप्रमाणे आहेत पण निष्कलंक!कोणतेही लांच्छन त्यांना नसते, हे सूर्याप्रमाणे तेजस्वी असतात मात्र त्यांचा दाह होत नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे
“ते सर्वही सदा सज्जन| सोयरे होतु”
ते सर्वांनाच,नेहमीच सज्जन आणि सोयरेच असतात. सोयरा म्हणजे नातेवाईक! आपला नित्य अनुभव असा आहे कि जो सज्जन असतो तो आपला सोयरा नसतो आणि जो सोयरा असतो तो सज्जन नसतो. परंतु ह्यांच्या ठिकाणी मात्र आप-पर भाव दिसून येत नाही. ते सर्वांवर सारखेच प्रेम करतात. एकूणच काय तर चंद्र,सूर्य, महासागर,चिंतामणी आणि कल्पतरू ह्यांना मर्यादा आहेत मात्र हे सत्पुरुष मात्र अमर्याद आहेत.त्यांच्या निस्वार्थी प्रेमाला मर्यादा नाही.कुठेही खोटेपणा नाही,सद्य परिस्थिती पाहता अश्या व्यक्ती मिळणे जरा अवघडच आहे,पण अशी व्यक्ती भेटल्यावर एकच म्हणणे असेल-
“धन्य आजि दिन संत दर्शनाचा| अनंत जन्मीचा शीण गेला.”
किंबहुना सर्व सुखी| पूर्ण होऊनी तिन्ही लोकी |
भजिजो आदिपुरुखी | अखंडित ||१८.१७९९

आता मागण्या सारख फार काही उरलंच नाहीये! साऱ्या जगासाठी एकच मागण मागता येईल कि ह्या जगातील सर्व जीवमात्र हे सर्वार्थाने सुखी व्हावेत. त्यांच अद्न्यान गळून पडू दे आणि ज्ञानाचा सूर्योदय प्रत्येकाच्या आयुषात येऊ दे. मग सर्वचजण भगवंताच्या उपासनेला लागतील आणि एकदा का ते ह्या मार्गाला लागले कि,ह्या जगात कुणालाच दुःख शिल्लकच राहणार नाही. कारण कितीही झालं तरी “ओम् नमोजी आद्या “ हे विसरून कसं बर चालेल?
आणि ग्रंथोपजीविये| विशेषी लोकी इये|
दृष्टादृष्टविजये | होआवे जी||१७.१८००

सर्व जग सुखी व्हाव हे जरी खरं असल तरी ते नेमक्या कोणत्या अर्थाने सुखी व्हावेत बर? तर जे ग्रंथाभ्यास करतील,भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथांच वाचन आणि आचरण करणाऱ्यांना दृष्ट आणि अदृष्टावर विजय मिळवा. दृष्ट म्हणजे शरीर आणि अदुष्ट म्हणजे मन! तस पाहता ह्या शब्दांचे अनेक अर्थ आहेत,पण अगदी खोलात न जाता “सुख आणि मधुर सुखाच्या यातना” ह्यातील फरक कळला कि झालं. फार फार तर अस म्हणता येईल कि तिमिराकडून तेजाकडे,अज्ञानाकडून ज्ञानाकडे,मुर्तातून अमुर्ताकडे,व्यक्तातून अव्यक्ताकडे, आणि सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा मार्ग सापडावा.
येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो| हा होईल दानपसावो|
येणे वरे ज्ञानदेवो|सुखिया झाला||१८.१८०१||

ज्ञानेश्वर शेवटी म्हणतात मी हे विश्वात्मक देवाजवळ मागितलेलं हे दान खरंच फळाला येईल का? हा जो ९००० ओव्यांचा अखंड वाग्यज्ञ केला ततो खरोखर यशस्वी होईल का? आणि मग विश्वात्मक-देवाच्यावतीने निवृत्तीनाथांनी उत्तर दिलं- हो निश्चित होईल. आणि मग ज्ञानेश्वर “सुखिया झाला”
||श्रीरामकृष्णार्पणमस्तु||

टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top