रवी आला माथ्यावरी ,वारा तापून चालला
धरणीच्या मायेचाही ,आता पदर फाटला
चाले अनवाणी लेकरू ,पाय भजाया लागलं
खाऱ्या घामाच्या धारांनी ,पोर न्हाऊन निघालं

पाणी आलं डोळ्यामंदी,ऊर दाटुनिया आला
कोवळ्या त्या मनाचा, धीर तुटुनी चालला
कुटे दिसेना सावली,वाळवंट तापलेला
का दिसेना मी आई ,पदराच्या सावलीला

पानझडी बाभळ तीने ,हाक मारली पोराला
सावलीच्या आशेने ,पोर धावूनिया आला
पोर पाही बाभळीला ,एक पानही दिसेना
कशी देणार सावली , हिला उन्हाळा सोसेना

हसे बाभळ पोराला, धारा डोळ्यांच्या पुसलया
हात मायेचा देऊनी ,झाड बोले लेकराला
वेळ एते सगळ्यांची नको सोडू तू धीराला
पुन्हा येईल पाऊस , पुन्हा भेटू सावलीला

पोर रडत म्हणालं, पाय माझ का भाजलं
या फुटक्या नशिबान,फक्त मला का पाहिलं
झाड हसून बोललं ,बघ जरा गवतात
उन त्यालाही लागलं ,उन मलाही लागलं

गेला काळ पावसाचा , उन दाटुनिया आलं
धीर गवतान सोडला ,जळूनिया खाक झालं
पानं गेली जरी माझी ,जीव मुळात ठेवला
आशेच्या बळावरी ,सर उन्हाळा पहिला

गुंग झालं मग पोर ,दोघ बोलत राहिली
तोच दाटून नभान , वर गर्जना केली
आल्या सारी पावसाच्या पोर न्हाऊन निघालं
नाचणाऱ्या पोराकड ,झाड बघत राहिलं

साभार : कवी - तानाजी सुतार (२५ जुलै २०१५)

Post a Comment Blogger

 
Top