मुंबईच्या मध्यवर्ती उपनगराच्या रेल्वेस्टेशनवर दररोज संध्याकाळी गर्दीचे लोंढे येत जात असतात. या अखंड प्रवाहाच्या काठाला बासरीचे सूर उमटत राहतात. गर्दीची पावलं रेंगाळतात. एक मैफलच सुरू होते. या जादूभऱ्या बासरीच्या सुरांचा मालक एक वेगळीच कहाणी सांगतोय.. एक प्रेमकहाणी..या कहाणीला भावभावना आहेत. सुरांची साथ आहे, नशिबाचा फेरा आहे. अनोळखी रसिकांच्या अबोल शुभेच्छा आहेत.. या कहाणीला फक्त डोळे नाहीत.
दुपारचे तीन वाजलेले. नेहमीसारखीच सुस्तावलेली दुपार. मात्र दादर स्टेशनवर ही सुस्ती सुतराम नसते. उलट दुपारचा कोलाहल शिगेला पोहचलेला.
या कोलाहलातही स्टेशनचा एक कोपरा अचानक सुरेल होतो.
वाहत्या गर्दीची पावलं थबकतात.
बासरीची धून सरकत्या माणसांच्या अंगांगावरून फिरत कानात साठू पाहते. हा थांबणारा समूह. पण या सुरांची नोंद घेत वाट चालत राहतो. त्याची बासरी ऐकली की दिवसभराचा थकवा क्षणात नाहीसा होतो, असं अनेकजण सांगतात. लोक त्याला थेट ओळखत नाहीत, पण त्याचे सूर मात्र साऱ्यांनाच जवळचे वाटतात.
गेल्या दोन-अडीच वर्षांपास्नं दुपारी तीन ते रात्री दहापर्यंत हे आंधळ्या सलीम सिद्दिकीचं दादर स्टेशनवरच्या पुलावरचं बासरीवादन अव्याहतपणे सुरू आहे.
आता त्याचा स्वत:चा चाहतावर्ग आहे. पोलिसांपासून ते अगदी चहावाल्या पोरापर्यंत. गाण्यांच्या फर्माइशी होत असतात. बिदागी म्हणून त्याच्या खिशात पैसे पडत जातात.
सिमरनही (नाव बदललेलं आहे) त्यातलीच एक.
त्याची बासरी ऐकून एक दिवस तिचीही पावलं रेंगाळली.
ती थांबली क्षणभरासाठीच.. अन् थबकली आयुष्यभरासाठी!
त्याची ही गोष्ट आहे.
त्या दिवसानंतर मात्र ती दररोज त्याचं एखादं गाणं ऐकायला थांबायची. त्याला माहीतही नसायचं ती त्याचं गाणं ऐकायला तिथे थांबलीये. कधी सलीम चहा प्यायला गेला असेल तर तो येईपर्यंत त्याची वाट पाहायची. ती त्याच्या बासरीवर बेहद्द फिदा झाली होती.
हळूहळू तिने त्याच्याशी मैत्री केली. त्याच्याबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करू लागली. पण त्याने तो प्रयत्न बराच काळ यशस्वी होऊ दिला नव्हता. तो नेहमीच काहीतरी सांगून वेळ मारून न्यायचा. एकदा तिने खूप हट्ट केला आणि
''..मी मूळचा मध्यप्रदेशातील हौशंगाबाद जिह्यातल्या धरमकुंडीचा. घरची परिस्थिती बेतास बात. पण त्यात मुलगा जन्माला आला हे कुठंतरी सुखावणारं होतं. पण हे सुख केवळ क्षणभरच टिकलं. मी अंध असल्याचं लक्षात आलं आणि माझ्या घरच्यांवर कुऱ्हाड कोसळली. आईला हे कळलं तेव्हा कोलमडून गेली. पण ''माझा मुलगा कसाही असला तरी तो मला हवाय,'' असं ठामपणे वडिलांनी सांगितलं.
''सलीमनं आजपर्यंत केलेला संघर्ष, त्यातून त्याने काढलेले मार्ग, एक कलाकार आणि माणूस म्हणून त्याच्याकडे असलेला चांगुलपणा, त्याची तल्लख बुद्धी, त्याचा नम्रपणा, प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची वृत्ती या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहेत. नाही ती फक्त दृष्टी. पण म्हणून त्याच्याजवळ असणाऱ्या इतर सगळ्या गोष्टी गौण ठरत नाहीत. उलट त्याच्याजवळ जाणाऱ्या प्रत्येकाला त्याचं चांगुलपण वेड लावतं. त्याच्या प्रेमात पडायला भाग पाडतं. माझ्या बाबतीतही हेच झालं. मी जसजशी त्याच्या जवळ गेले तसतशी त्याच्यात गुंतत गेले.'' सिमरन सांगते.
तिची त्याच्यामधली भावनिक गुंतवणूक एवढी होती की, शेवटी एके दिवशी तिने त्याला सरळ प्रपोज केलं. तिचं धाडस बघून खरोखरच धक्का बसतो. सलीमचा हात मागण्याचा तिने घेतलेला निर्णय तिच्यासाठी खरंच एवढा सोपा होता का? नक्कीच नाही.. ही गोष्ट आई-वडिलांना कळल्यावर त्यांना काय वाटेल? ते खरोखरच सलीमला स्वीकारतील का? समाजाच्या प्रश्नांना आई-वडील काय उत्तरं देतील? मित्र-मैत्रिणी या प्रेमाला स्वीकारतील का? भविष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला सामोरं जाण्याची तयारी आहे का? असे कितीतरी प्रश्न तिने स्वत:लाच विचारले. तिने या प्रश्नांची उत्तरं शोधली.
''त्याच्याकडे फक्त दृष्टी नाही. पण यात त्याचा काय दोष? तो अंध आहे म्हणून त्याला कुणावर प्रेम करण्याचा अधिकार नाही का? त्याच्यावर कोणत्या चांगल्या मुलीने प्रेम करू नये का? प्रेम करण्यासाठी समोरचा माणूस मनाने चांगला असणं पुरेसं नाही का? तिच्या मनातले हेच सकारात्मक प्रश्न तिला खऱ्या अर्थाने बळ देत होते.
सिमरनच्या या निर्णयाने इतरांचं तर सोडाच, पण सलीमलाच आश्चर्याचा बसला होता. ''ही मुलगी आपल्याशी थट्टा करतेय असंच मला पहिल्यांदा वाटलं. शिवाय आजच्या मुली काय आहेत, कशा आहेत हे मी पाहिलं नसलं तरी ऐकलं जरुर होतं. त्यामुळे माझं धाडस होत नव्हतं. म्हणून मी तिला स्पष्ट नकार दिला. तिला खूप वाईट वाटलं. पण दोन दिवसांनी तिने काहीही न बोलता माझ्या हातात एक पत्रं ठेवलं. मी ते माझ्या मित्राकडून वाचून घेतलं. त्या पत्रात तिने बरंच काही लिहिलं होतं. त्या पत्राची शेवटची ओळ मला आवर्जून सांगावीशी वाटते, ती होती, 'तुझ्या नशिबात माझं प्रेम लिहिलेलं असेल तर ते तू कितीही नाकारलंस तरी ते तुला नाकारता येणार नाही.''
''ते पत्र वाचल्यानंतर ही मुलगी नक्कीच वेगळी आहे असं मला वाटलं. माझ्यासारख्या अंध मुलावर कोणीतरी प्रेम करतंय, आपल्या आयुष्याचा भाग बनू पाहातंय ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आई गेल्यापासून मला कधी कुणाचं प्रेम मिळालंच नव्हतं. धडधाकट, भरपूर पैसे कमावणारा, भरपूर शिकलेला मुलगा तिला सहज मिळाला असता. पण तिने माझी निवड केली.. माझ्यासारख्या अभाग्यावर प्रेम करणं हीच कितीतरी मोठी गोष्ट होती. मी खूप विचार केला पण तिला नाकारू शकलोच नाही.''
सलीमच्या होकाराने दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली. दररोज ऑफिसमधून घरी जाताना ती त्याला भेटायला यायची. न चुकता काहीतरी खायला आणायची. या दोघांचं हे प्रेम पाहून स्टेशनवर ड्युटी करणारे पोलिसांना खूपच आश्चर्य वाटायचं. पण त्यांनी या दोघांना खूप मदत केली. सलीमचं या सर्वाशी असं एक वेगळंच भावनिक नातं तयार झालं होतं.
त्या दोघांच्या भेटी अशा वाढतच होत्या. सिमरन नोकरी करायची तेव्हा ते दादरलाच प्रीतम हॉटेलमध्ये गप्पा मारत बसायचे, नंतर ते दोघं मुंबईमध्ये फिरायला लागले. ते फिरायला गेले की लोक त्यांच्याकडे आश्चर्यानं पाहायचे. कोण त्यांच्याकडे कसं पाहातंय हे ती त्याला हळूच सांगायची. दोघांनी थिएटरमध्ये जाऊन चित्रपटही पाहिले आहेत. ती पाहायची अन् तो ऐकायचा. ''चिमणी पाखरं'' हा त्या दोघांनी थिएटरला जाऊन पाहिलेला पहिला चित्रपट. चित्रपट पाहून आल्यावर आज मी चित्रपट ऐकला असं सलीम त्याच्या मित्रांना सांगायचा. पण सिमरन त्याला ऐकला असं न म्हणता पाहिला असं म्हणायला सांगायची.
''एकदा सिमरनने मला वाद्रय़ाला भेटायला बोलवलं. मी अध्र्या तासात वांद्रय़ाला पोहोचलो. ती आणि तिची मैत्रीण माझ्या आधीच स्टेशनवर पोहचल्या होत्या. पण मला मात्र तिच्यासोबत तिची मैत्रीण होती हे ठाऊक नव्हतं. मी गेल्याबरोबर तीने नेहमीप्रमाणे माझ्या खांद्यावर हात टाकला अन् काहीतरी बोलली. पण तिचा आवाज मला वेगळा वाटला. मी लगेचच तिला विचारलं. तेव्हा तिनं तब्येत बरी नाही असं सांगितलं. तरीही मला ती सिमरन नाही असंच वाटत होतं म्हणून मग मी माझ्या खांद्यावरचा तिचा हात हळूच हातात घेतला. तिच्या नकळत बोटातली अंगठी तपासली. ती सिमरनचीच होती. मग माझा संशय जरा दूर झाला. आम्ही बराच वेळ गप्पा मारत बसलो. तेवढय़ात सिमरनचा आवाज आला. ''सलीम ये क्या चल रहा है?'' अन् त्या दोघीही मोठ्याने हसायला लागल्या. काय झालं पहिल्यांदा कळलंच नाही. पण नंतर कळलं की जिच्याशी मी इतका वेळ बोलत होतो ती सिमरन नव्हे तर तिची मैत्रीण होती आणि सिमरन हे सगळं बाजूला बसून ऐकत होती. त्या दोघींनी मला त्या दिवशी फसवायचं असं ठरवलं होतं अन् मी पूर्णपणे फसलो होतो.''
अशाच भेटींमधून ते दोघंही एकमेकांसमोर हळूहळू उलगडत गेले.
''तो खूप हळवा आहे. त्याला भेटायला गेल्यावर मी नेहमी काहीतरी खायला घेऊन जायचे. त्याला भरवायला लागले की त्याच्या डोळ्यांतून पाणी वाहायचं. मी त्याला अनेकदा त्याचं कारण विचारलं पण तो काहीच बोलायचा नाही. पण एके दिवशी तो स्वत:च म्हणाला की, तू भरवायला लागलीस की मला माझ्या आईची आठवण येते. ती असती तर माझी एवढी फरफट कधी झाली नसती. मला घर सोडावं लागलं नसतं. त्याच्या आयुष्यातली आईची उणीव मला नेहमीच जाणवली आहे. आजही त्याला आईची आठवण आली की घरातली तिच्या फोटोची जुनी फ्रेम जवळ घेऊन तो बसतो आणि तिला शोधायचा प्रयत्न करतो.'' सिमरन सांगत होती.
त्यावेळी त्याची आई हीच त्याचा सर्वात मोठा आधार होती. स्वत:च्या आयुष्याला थारा नसताना मूल सांभाळणं कठीण असतं. त्याच्या आईला त्याच्या भविष्याची खूप काळजी वाटायची.
''मला उराशी कवटाळत ती ढसाढसा रडायची. दृष्टी मिळावी म्हणून तिने कितीतरी नवस-सायास केले. वडीलांकडं हट्ट करून अनेक मोठ्या डॉक्टरांकडे मला नेलं. औषधांनी माझ्या दृष्टीत फरक पडेल असं एका डॉक्टरांनी तिला सांगितलं. त्या दिवशी तिला केवढा आनंद झाला होता. 'माझा मुलगा बरा होणार' असं त्या आनंदाच्या भरात शेजारपाजारच्या सगळ्यांना तिनं सांगून टाकलं. वडील दिवसरात्र काबाडकष्ट करायचे आणि माझ्यासाठी महागडं औषधं आणायचे. मला पुन्हा दिसू लागेल अशी आशा सगळ्यांच्याच मनात निर्माण झाली होती.
पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं..
मी सहा-सात वर्षांचा असेन. आईचा अपघात झाला आणि त्यातच ती गेली. आई गेल्यानंतर सगळंच चित्र बदललं. माझा मोठा आधार गेला. माझी औषधं बंद झाली आणि माझं हे जग माझ्या डोळ्यांनी पाहण्याचं स्वप्नं तिथेच भंगलं.. ती माझी फक्त जन्मदात्री नव्हती, ती माझ्या अंधारआयुष्यातली मिणमिणती ज्योत होती, माझे डोळेही तीच होती अन् माझ्या आधाराची काठीही.. तिच्याशिवाय आयुष्य म्हणजे आयुष्य नव्हतंच कधी. होता फक्त अंधार, कधीही न संपणारा.. सलीम सांगत होता.
आई-गेल्यानंतर काही दिवसांतच त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. घरात सावत्र आई आली. पण तिने त्याला कधीही स्वीकारलं नाही. वडिलांनी जवळ घेऊन कधी डोक्यावर मायेने हात फिरवला नाही. त्यामुळं त्याला प्रेम कधी मिळालंच नाही.
सिमरनने त्याच्या आयुष्याचा तो हळवा कोपरा व्यापला होता. पण घरातली परिस्थिती जैसे थेच होती. तो घरी पैसे देऊनही त्याला फारशी किंमत नव्हती. सिमरनची घरच्या लोकांशी भेट घालून द्यावी म्हणून सलीम एकदा तिला घरी घेऊन गेला. घरच्यांशी तिची ओळख करून दिली. पण त्याची सावत्र आई तिच्याशी काहीच बोलली नाही. त्याच दिवशीचाच आणखी एक असाच प्रसंग. सलीम जेवत होता. सिमरन बाजूलाच उभी होती. सलीमच्या ताटातली भाजी संपली. सिमरनने हे पाहिलं आणि ती त्याला भाजी वाढायला समोर गेली. पातेलं हातात घेताच सलीमच्या आईने तिला थांबवलं. तिला भाजी वाढू दिली नाही. सिमरनला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. कारण हे त्याच्यासाठी रोजचं असलं तरी तिच्यासाठी ते नवीन होतं. पण ती आईला उलट बोलली नाही. ती तिथून निघून गेली. घरून तिने त्याला फोन केला आणि ढसाढसा रडायला लागली. ती फक्त एवढंच करू शकत होती..
या प्रसंगानंतर तिला त्याचं घर व्यवस्थित कळलं. त्याच्या दु:खाचं कारणही तिला माहीत आहे. त्यामुळे तो त्यातून बाहेर यावा म्हणून ती नेहमी प्रयत्न करते. एकदा तिचा ग्रुप पिकनीकसाठी रिसॉर्टला जाणार होता. सिमरनने सलीमलाही बोलावलं. पण त्याला पाहिल्यानंतर तिच्या मित्रांनी टिंगलटवाळी सुरू केली. ''अरे, याला तर एकच बॅटरी आहे आणि तिचाही काही उपयोग नाही.'' अशा अपमानास्पद कमेंट्स पास केल्या. सिमरनला ते सहन झालं नाही. तिला खूप राग आला.
''दोन बॅटरी असणाऱ्यांनाच मन असतं आणि सिंगल बॅटरीवाल्याला ते नसतं का, डोळे असणाऱ्या तुम्हा आंधळ्यांपेक्षा डोळे नसलेला सलीम खूप चांगला आहे'', असं बरंच काही तिने त्या सगळ्यांना त्या वेळी सुनावलं.
''ते माझ्या प्रेमाचा अपमान करतील, त्यावर हसतील ते माझे चांगले मित्र असू शकत नाहीत'' असं सांगून तिने पिकनीक अध्र्यावर सोडली आणि सलीमला घेऊन ती तिथून निघून गेली. पुन्हा ती त्या ग्रुपमधल्या मुलांशी ती कधीही बोलली नाही.
सर्व काही व्यवस्थित सुरू असतानाच यांच्या प्रेमकहाणीत एक वादळ आलं.
सिमरनच्या वडिलांना कोणीतरी सांगितलं की ''आपकी लडकी किसी नाभिने (अंध) लडके के साथ घूम रही थी।'' साहजिकच त्यांना प्रचंड धक्का बसला. कारण घरातलं वातावरण अत्यंत कडक शिस्तीचं, खानदान की इज्जत जपण्यासाठी काहीही करू शकणारं.. तिथं प्रेम या शब्दाला कसलाच थारा नाही. आपल्या मुलीने एका अंध मुलावर प्रेम करावं, तेही स्टेशनवर उभं राहून बासरी वाजणाऱ्या. ही गोष्टच त्यांच्या कल्पनेपलीकडची होती. त्यांनी सिमरनला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. ''प्रेमाने पोट भरत नाही, त्यासाठी भाकरी लागते'', असे डायलॉगही ऐकवण्यात आले. पण तिने तिचा निर्णय बदलला नाही. रोज नवे बहाणे करून ती त्याला भेटायला जायचीच. पण काही दिवसांनी ते तिच्या घरच्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे तिला घराबाहेर पडायला बंधनं घातली गेली. नोकरी सोडायला भाग पाडलं गेलं.
त्यामुळे त्याला भेटणं तर फारच अवघड झालंय.
मात्र या वादळातही ही दोघं आज घट्ट पाय रोवून एकमेकांना सावरत उभे आहेत. एक दिवस हे वादळ नक्की शमेल आणि आम्ही कायमचे एकत्र येऊ असा दोघांनाही विश्वास आहे.
''मला माहिती आहे, आज तिला माझ्यासाठी खूप गोष्टी सहन कराव्या लागताहेत. पण मला त्रास होईल म्हणून ती कधीच काही सांगत नाही. उलट मी खूप आनंदात आहे. तू फक्त तुझी काळजी घे एवढंच सांगते. ती माझ्या आयुष्यात आल्यापासून सुख, आनंद नावाची गोष्ट खऱ्या अर्थाने मला अनुभवता आली. ती माझी फक्त प्रेयसीच नाही तर आई, वडील, मित्र हे सगळं आहे. तिनेच माझ्या जगण्याला खरा अर्थ दिलाय. अंधारलेल्या जगातली ती माझी प्रकाशवाट आहे'', सलीम सांगत होता.
आज ती त्याच्यापासून भेटायला न मिळाल्याने थोडी दूर गेलीय त्यामुळे तो थोडा एकटा पडलाय आणि या एकटेपणात तिच्या आठवणींसह त्याच्यासोबत आहे ती फक्त त्याची बासरी.
ही बासरी त्याच्या आयुष्याचा कणा आहे.
त्याची आणि बासरीची पहिली भेट झाली शाळेत असताना. अगदी योगायोगाने. त्याने सांगितलेली बासरीची कथा खूपच रंजक होती. ''शाळेतील संगीताच्या शिक्षकांनी बासरीच्या वर्गासाठी विद्यार्थीची निवड करायचं ठरवलं. त्यासाठी प्रत्येक वर्गात जाऊन त्यांनी मुलांची निवड केली. एकदा ते आमच्या वर्गात आले. ''एकूण सूर किती'' त्यांनी मुलांना प्रश्न विचारला. अनेकांनी अनेक उत्तरे दिली. कोणी दहा, कोणी पंधरा, कोणी सात असे अनेकांकडून अनेक सूर समोर आले. सरांनी मला विचारलं, पण त्याचं उत्तर मलाही माहिती नव्हतं. परंतु शेजारच्या माझ्या मित्रानं मला त्याचं उत्तर हळूच कानात सांगितलं. मी उत्तर दिलं. संगीतात एकूण १२ सूर असतात. माझं उत्तर बरोबर आलं म्हणून सरांनी बासरीच्या वर्गासाठी माझी निवड केली. पण माझ्या ज्या मित्राने त्या प्रश्नाचं उत्तर मला सागितलं होतं त्याला मात्र बासरीच्या वर्गात प्रवेश मिळाला नाही, कारण त्याला दम्याचा त्रास होता. त्याचं मला आजही वाईट वाटतं. माझ्या मित्राने सांगितलेल्या एका उत्तराने आज मला आयुष्याची भाकरी मिळाली आहे.''
''मला नेहमी वाटायचं घर सोडून निघून जावं. पण मला नीट चालताही येत नव्हतं, मग पळून जाणार कसा? तरी एक दिवस मी घरातून पळून जायचा निर्णय घेतला. चालताना, पायऱ्या उतरताना, चढताना अंदाज कसा घ्यायचा, गर्दीतून कसं चालायचं, रस्ता कसा ओलांडायचा याचं सगळं तंत्र मी एका मित्राकडून शिकून घेतलं. काही महिन्यांनंतर ते मला जमायलाही लागलं. शेवटी एक दिवस मी अंगावरच्या कपडय़ांसह शर्टात बासरी अडकवून घर सोडलं. थेट मध्यप्रदेशात गेलो. स्टेशनवर, रेल्वेत बासरी वाजवून मिळालेल्या पशांवर पोट भरू लागलो. आज एका ठिकाणी तर उद्या दुसऱ्या ठिकाणी असा रोजचा प्रवास सुरू होता. थंडीचे दिवस होते. जवळ काहीच नव्हतं. पसे नव्हते असं नाही, पण रोजचा प्रवास असल्यानं घेतलेली वस्तू ठेवायची कुठे हा प्रश्न होता. मजल दरमजल करत एक दिवस मध्यप्रदेशातील खांडव्यात पोहचलो. तिथे अनेक चांगली माणसं भेटली. रेल्वे स्थानकावरच्या पोलिसांनी खूप मदत केली. आसराही दिला, मात्र अशी मदत करताना त्यांनी एक अट घातली.. मी त्यांना रोज संध्याकाळी काही गाणी ऐकवायची. मी त्यांना गाणी ऐकवू लागलो. काही दिवस तिथेच राहिलो. एक दिवस तेथील पोलीस इन्स्पेक्टरने मला घर सोडण्याचं कारण विचारलं. मी त्यांना सगळी हकिकत सांगितली. दुसऱ्या दिवशी ते मला घेऊन घरी आले. आई-वडिलांना समज दिली आणि मी पुन्हा एकदा घरात आलो.''
घरी परतल्यानंतर तो मुंबईतल्या स्टेशनवर थांबून बासरी वाजवायला लागला. चांगले पैसे मिळवू लागला.
या बासरीनं केवळ त्याचं पोटच भरलं नाही तर त्याच्या एकटेपणात त्याला नेहमीच साथ दिली. आजपर्यंत आयुष्यात आलेलं प्रत्येक दु:ख या बासरीनंच त्याला विसरायला शिकवलं. दोन महिन्यांपूर्वी ती त्याला शेवटचं भेटली. त्या दिवशी निरोप देताना मी परत येईन असं वचन देऊन ती निघून गेलीय. आजही स्टेशनच्या पुलावरील गर्दीत त्याच्या बासरीचे सूर मिसळताहेत. काहीतरी शोधत आहेत.. दादर स्टेशनच्या पुलावर तुम्ही कधी गेलात तर सलीमचे ते सूर तुमच्याही कानावर पडतील.
लेखक - विलास बडे
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी