''डॉक्टर आता खरंच माझं गुडघे प्रत्यारोपणाचं ऑपरेशन करावंच लागले का हो? मला तर आता खूप टेंशन आलं आहे. सध्या चालताना, उठता-बसताना खूप त्रास होत आहे. डॉक्टर बरं वाटेल ना मला..'' पवारआजी काळजीने विचारत होत्या. साधारणपणे ६० ते ६२ वयाच्या, वजनही जास्त असलेल्या. त्यांच्या दोन्ही गुडघ्यांमध्ये सूज व प्रचंड वेदना होत्या. पवारआजींना सांगितलं की प्रत्येक गुडघेदुखीसाठी गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची गरज नसते. आयुर्वेदामध्ये असे बरेच उपचार आहेत, जेणेकरून आपण रोगाची पुढील अवस्था टाळू शकतो व शस्त्रक्रियेची गरजच भासणार नाही.
सध्या आपल्या सभोवताली बऱ्याच जणांना सांधेविकार होताना आपण पाहतो. जेथे दोन वा अधिक हाडे येऊन स्नायू वा मांसपेशींच्या साहाय्याने जोडले जातात त्या ठिकाणांना सांधा असे म्हणतात. सांध्यांना सूज येते, त्रास होऊ लागतो आणि पुढे क्वचितप्रसंगी विकृती येते तेव्हा त्यांना एकत्रितपणे आथ्र्रायटिस असे आधुनिक वैद्यकशास्त्रात म्हणतात. याचे अनेक प्रकार आहेत. पण त्यातही महत्त्वाचे असे हृमॅटॉइड आथ्र्रायटिस-यालाच आयुर्वेदामध्ये आमवात तर ऑस्टिआथ्र्रायटिस याला संधिगतवात असे म्हणतात. याव्यतिरिक्त सोरियाटिक, सिफिलिटिक, गाउट असे अनेक प्रकार आढळतात. सर्वसामान्यांच्या भाषेत त्यांना संधिवात म्हणतात.
पवारआजींसारखे थोडय़ा मोठय़ा वयामध्ये आढळणारे शरीराचे मोठे सांधे जसे गुडघे, कमरेचा सांधा यांमध्ये आढळणारा, शरीराचे वजन पेलणाऱ्या सांध्यामध्ये सूज, दुखणे उत्पन्न करणारा जो प्रकार आढळतो तो संधिगतवात. शरीराच्या सांध्यांच्या सतत होणाऱ्या हालचालींमुळे व वयपरत्वे होणाऱ्या झिजेमुळे हा संधिवात होतो.
सांध्याच्या ठिकाणी कटकट आवाज होतो, सूज येते, अतिशय वेदना होतात. दूध न पिणे अथवा आहारात कॅल्शिअमचे प्रमाण कमी असणे, व्यायाम नसणे यामुळे तसेच 'ड' जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी होणे यांमुळे हाडे पोकळ होतात. त्यामध्येही हाडांच्या आत खोलवर दुखते आहे, असे जाणवते. दाबल्यावर बरे वाटते. मात्र केवळ तेल लावून वा शेकून हे बरे होत नाही तर इथे मात्र कॅल्शिअम व 'ड' जीवनसत्त्वाचे प्रमाण तपासून औषधयोजना करणे महत्त्वाचे ठरते. संधिगतवातामध्ये हा त्रास जास्तकरून स्त्रियांमध्ये आढळतो. तेल लावून, हलक्या हाताने ते जिरवून (जोरजोरात मसाज करून नव्हे) शेकून घेतल्यावर रुग्णांना थोडे बरे वाटते. खूप वजन असेल तर चक्क काठीचा आधार घेऊन चालले तर शरीराचा भार हा काठीवर तोलला जातो आणि गुडघे दुखणे कमी होते. पंचकर्म उपचारांमध्ये स्नेहन (औषधीसिद्ध लेपांचा मसाज), स्वेदन (औषधीसिद्धी काढय़ांच्या वाफेचा शेक), जानुबस्ति व संधीबस्ति, बस्ति आदी तसेच सुवर्णशलाकेच्या साहाय्याने केलेले अग्निकर्म, सुचीवेध कर्म इत्यादींचा उपयोग होतो. मात्र याउलट जेव्हा रुग्णाला 'हृमॅटॉइड आथ्र्रायटिस' झालेला असेल तेव्हा तेल लावून चोळले असता सांध्यांची वेदना वाढते. या प्रकारच्या आजारात वाळू, ओवा व खडे मीठ हे सम प्रमाणात घेऊन त्यांचा पोटली करून शेक देतात. त्याचप्रमाणे अग्निकर्म, सूचीवेध व बस्ति यांचाही उपयोग होतो. साधारणपणे हे रुग्ण कमी वृद्ध, तरुण वयोगटातील आढळतात. या रोगामध्ये छोटे सांधे (हाताच्या बोटांमधील सांधे), मनगटाचे सांधे यात अतिशय त्रास आढळतो. सकाळी बिछान्यावर उठताना प्रचंड त्रास होणे, अडकल्यासारखे वाटणे, प्रचंड दुखणे, क्वचित प्रसंगी बारीक ताप येणे आदी लक्षणे व सांध्याच्या ठिकाणी जणू काही िवचू चावत आहे अशी वेदना होते, असे वर्णन आयुर्वेदात आहे. यालाच आमवात म्हणतात.
आपण जे काही खातो ते जर नीट पचले नाही तर या आहाराचे रूपांतर अध्र्या कच्च्या विषामध्ये होते जे शरीरभर रसरक्ताबरोबर फिरत राहते यालाच शास्त्रकार आम म्हणतात. हा जेव्हा सांध्याच्या ठिकाणी जातो व विकृती निर्माण करतो, तेव्हा त्याला आमवात म्हणतात.
विविध कारणांनी वाढलेला वात जेव्हा आमाशी संलग्न होतो तेव्हा आमवात होतो. शास्त्रकार सांगतात,
युगपत कुपितावन्तो त्रिक् सन्धि प्रवेशकौ!
स्तब्धं च कुरुते गात्रं आमवात: स:उच्येत
वाढलेला वात हा त्रिक् संधी म्हणजेच कंबरेचा सांधा, तसेच शरीरातील अन्य सांधे यामध्ये रुजा (वेदना), स्तब्धत्व (स्टिफनेस) निर्माण करतो व आमवाद निर्माण होतो.
काय खावे, काय खाऊ नये?
वात वाढवणारे पदार्थ म्हणजेच बटाटा, चणा, वाटाणा, राजमा, पावटा, उसळी इ. टाळावेत.
अतिआंबट पदार्थ जसे चिंच, टोमॅटो, त्याशिवाय आंबवलेले पदार्थ जसे इडली, डोसा, ढोकळा, अतितिखट पदार्थ, ठेचा, खर्डा टाळावेत.
दही, लस्सी, फ्रिजचे पदार्थ, थंडगार पाणी पिऊ नये.
जे पचण्यास सुलभ आहे, म्हणजेच भात, मुगाच्या डाळीची खिचडी, मुगाचे कढण, गव्हाची पोळी, बाजरी व ज्वारीची भाकरी, भाज्यांमध्ये मेथी, शेवग्याच्या शेंगा, इतर फळभाज्या, गरम पाणी (सुंठ व आलेयुक्त) याचे सेवन करावे.
चपातीच्या पिठात (एक चपाती होईल असे) एक चमचा एरंडेल तेल, मिरे, जिरे, ओवा, िहग, मीठ घालावे आणि त्याचाच हातावर धपाटा (थापून केलेली चपाती) भाजून घेऊन त्यावर तूप लावून खावे.
- डॉ. आशीष फडके,
एमडी (आयुर्वेद)
लक्षात ठेवा!
अतिचिंता, अतिक्रोध, अतिशोक यामुळे वातप्रकोप होतो. संधिवात झाला म्हणून आयुष्यच संपले, शस्त्रक्रियाच करावी लागेल की काय, असे विचार करू नयेत. योग्य व्यायाम, योग्य आहार व डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा. आता थंडीचा काळ जवळ आला आहे. ज्यांना आधीच संधिवात आहे, त्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सांध्याभोवती वेष्टने (नी कॅप, बेल्ट इ.) घाला. लोकरीचे, गरम कपडे वापरा, एसीमध्ये, मोठा केलेल्या पंख्याखाली झोपू नका. गार पाण्याने आंघोळ करू नका, योग्य उपचारांनी, आहार-विहारांनी आपण संधिवाताचा सामना करायला सिद्ध होऊ या.

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top