कोणे एके काळी जगभरातल्या साऱ्या रंगांचं भांडण सुरू झालं. भांडणाचा मुद्दा होता सर्वश्रेष्ठ कोण? आपणच श्रेष्ठ, आपणच सर्वोत्तम, आपणच सर्वांच्या आवडीचे, सर्वांच्या उपयोगाचे म्हणून आपल्यालाच सर्वांत जास्त महत्त्व हवं, असं प्रत्येकालाच वाटत होतं.

हिरवा म्हणाला – मीच सर्वांत श्रेष्ठ, सर्वांत महत्त्वाचा आहे, हे अगदी स्पष्टच आहे. गवत, झाडं, पानं यांच्यासाठी माझीच निवड केली गेली ती काय उगीच? अनेकदा तर या साऱ्यांना "हिरवाई' म्हटलं जातं ते माझ्यामुळेच. मी नसेन तर, प्राणी मरतीलच. जरा शहरांच्या बाहेर नजर तर टाका. सगळीकडे तुम्हाला माझंच साम्राज्य दिसून येईल…

हिरव्याचं म्हणणं मध्येच तोडत निळ्यानं म्हटलं, ""तू तर फक्त धरतीचा विचार करतोयस. जरा आकाश आणि समुद्राचाकडे नजर तरी टाक! जीवनाचं मूळ तर उंचावरल्या ढगांतून आणि सागरातून असणारं पाणीच आहे. आकाशामुळे मिळते शांतता, प्रसन्नता! माझ्या या करामतीविना तुझं अस्तित्वही दिसणार नाही."

निळ्याचे हे बोल पूर्ण होतात न्‌ होतात तोच पिवळ्याची चुकचुक ऐकू आली. तो म्हणाला, ""तुम्ही सारे किती गंभीर आहात रे. माझ्याकडे पाहा, मी कसा आनंदी, स्वच्छंद, खेळकर आणि उबदार आहे. सूर्य पिवळा आहे. सूर्यफुलाकडे पाहिलं की सारं जग हसू लागतं. माझ्याशिवाय जगात काही मजाच नाही."

पिवळ्याचं बोलून होतंय न होतंय तोच नारिंगी रंगाने आपलं घोडं पुढे दामटलं, ""मी आरोग्याचा, त्यागाचा आणि शक्तीचा रंग आहे. मी फारसा कुठे दिसत नसेन, पण मानवजातीसाठी माझं अस्तित्व आवश्‍यक आहे. गाजरं, भोपळे, संत्री, आंबे आणि पपया आठवतायत तुम्हाला? सारी जीवनसत्त्वं माझ्यामुळेच तुम्हाला मिळतात. मी काही नेहमी सर्वत्र नसतो. पण, सूर्योदय-सूर्यास्ताला क्षितिजावर माझं अस्तित्त्व दिसू लागलं की, लोकांना तुमची कोणाची आठवणही राहात नाही!"

शेंदरी रंगाची ती फुशारकी ऐकून लाल रंग अगदी लालेलाल होऊन गेला आणि जवळजवळ ओरडलाच, ""मी तुम्हा सर्वांचा राजा आहे. मी रक्त आहे! आयुष्य रक्तामुळेच आहे. मी शौर्य आणि धोक्‍याचा रंग आहे. मी ध्येयासाठी लढतो. माझ्यामुळे रक्त सळसळतं, उसळतं! माझ्याविना पृथ्वी चंद्रासारखीच पांढरीफटक पडेल. मी उत्कट प्रेमाचा रंग आहे. गुलाबाचा रंग आहे."

लाल रंगाचं हे भाषण सुरू असतानाच जांभळा रंग उभा राहिला आणि शांतपणे म्हणाला, ""मी सत्तेचा आणि कुलीनतेचा रंग आहे. मोठमोठे राजे, सेनापती, आचार्य यांनी आपली सत्ता आणि बुद्धिमत्ता यांचा प्रभाव दाखविण्यासाठी नेहमी माझीच निवड केली आहे. लोक मला प्रश्‍न विचारीत नाहीत. माझे ऐकतात. आज्ञा पाळतात."

अगदी शेवटी पारवा रंग बोलता झाला. इतरांच्या मानाने अगदी हळूवार आवाजात, परंतु त्याच निर्धाराने तो बोलत होता. म्हणाला, ""माझ्याकडे पाहा. मी आहे शांततेचा रंग. क्वचितच कोणी माझी दखल घेतो. पण, मी नसलो तर सारं उथळ भासतं. विचार, प्रतिभा, शांत- संथ जलाशय यांचं प्रतिनिधित्व मी करतो. संतुलन आणि आत्मसमाधानासाठी तुम्हाला माझीच गरज असते."

असं रंगांचं भांडण सुरूच राहिलं. स्वतःची सर्वोत्तमता सिद्ध करण्यासाठीचा त्यांचा आग्रह चालूच राहिला. त्यांचे आवाज हळूहळू चढत गेले.

अचानक वीज कडाडली. प्रकाशाचा एकच लोळ उठला. घनमेघ गर्जू लागले. पावसाच्या धारा बरसू लागल्या. आपापला बचाव करण्यासाठी आता परस्परांचा आधार घेण्यावाचून रंगांकडे काही गत्यंतर उरलं नव्हतं. 



मग पावसाचाच आवाज ऐकू येऊ लागला. ""अरे मूर्ख रंगांनो! स्वतःचा बडेजाव मिरवीत असे आपसात भांडत काय बसलात? तुम्हाला हे ठाऊक नाही काय की, तुमचं प्रत्येकाचं स्वतःचं असं काही वैशिष्ट्य आहे? काही विशेष कार्यासाठी तुमचा प्रत्येकाचा आविष्कार झालेला आहे? धरा आता एकमेकांचे हात आणि चला माझ्याबरोबर."

रंगांनीही त्याचं निमूटपणे ऐकलं. पाऊस पुढे बोलू लागला. ""आता यापुढे जेव्हा पाऊस पडेल तेव्हा तुम्ही सारे एकत्र येऊन आकाशात सुंदर कमान तयार कराल. त्याने आपापलं वैशिष्ट्य कायम ठेऊन एकत्र येता येतं, एकत्र राहता येतं आणि त्यातूनच स्वर्गीय सौंदर्य साकारतं, हे मला इतरांना दाखवता येईल. तुमची ती कमान म्हणजेच इंद्रधनुष्य हे उद्याची आशा जागवीत येईल."


तेव्हापासून चांगला पाऊस झाला की, आभाळात इंद्रधनुष्य दिसू लागतं. असं इंद्रधनुष्य दिसू लागलं की, परस्परांच्या सोबतीने गुण्यागोविंदाने राहण्याची आठवण आपल्याला होवो, हीच शुभेच्छा!

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी


टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top