"तू जशी आहे तशी निघून ये. डॉक्तरांनी आईला दवाखान्यात भरती व्हायला सांगितलाय पण ती आमच कोणाचंच ऐकत नाहीये. कदाचित तुझ ऐकेल." दादाचा हा निरोप वाचून ऋतू एक क्षण गोंधळून गेली. आई आणि असहकार हे समीकरणच तिला पटत नव्हते. खर तर आईला, एक पूर्णपणे सहकार्य करणारा रुग्ण असे प्रशस्तीपत्रक पण दिले होते. आणि हीच आई आज दवाखान्यात भरती व्हायला नाही म्हणत होती. ऋतूला काही सुचेनासेच झाले होते.

तशी आईच्या तब्येतीची आणि तिच्या नवीनच उदभवलेल्या आजारची थोडीफार कल्पना सगळ्यांना होती. गेले ३० वर्षापासून मित्र असलेला बी. पी. आता हळू हळू आपले हात पाय पसरू लागला होता. त्याने एकदम थेट आईच्या हृदयातच हात घातला आणि त्याचा आकारच मोठा केला. आई गमतीत म्हणायची पण " हम तो अब बडे दिलवाले होगये." आईच्या विशाल मनाचा मोह त्यालाही पडला होता. आईच्या क्षमाशील वृत्तीचा फायदा घेत बी. पी. ने आपला परिणाम आता मेंदूवर पण दाखवायला सुरुवात केली होती. आईच्या मेंदूत लहान गाठ झाली होती आणि त्वरित शस्त्रक्रिया करून ती गाठ काढावी लागणार होती नाही तर त्याचे दुष्परिणाम आईला खूप सहन करावे लागले असते. हे सगळे माहित असूनही आईने दवाखान्यात भरती व्हयला नकार दिला होता.

आईच्या ह्याच वागण्याच कोड सगळ्यांना, अगदी ऋतूला सुद्धा पडल होत. आत्तापर्यंत तिने तब्येतीवर झालेले हल्ले यशस्वी रित्या परतवून लावले होते. कधी मनाला उभारी देवून तर कधी खूप औषध घेवून तर कधी वेग वेगळ्या प्रकारचे व्यायाम करून ती जिद्दीने उभी राहिली होती. आई आणि कच खाणे हे कोणाला माहितीच नव्हते जणू. मला माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत त्यामुळे मी माझी तब्येत नीट ठेवणारच हाच तिचा नेहमी घोषा असायचा. आणि हीच आई आता सगळ्याकडे पाठ फिरवत होती. आईच्या ह्या वागण्याचा अर्थ न कळल्याने ऋतू खूप उदास झाली होती. तिचे कशातच लक्ष लागत नव्हते. आईला भेटायला जायचे तर समोर कामाचा हा ढीग पडला होता. तिला काहीच कळत नव्हते, पण शेवटी तिने निर्णय घेतला कि उद्या सकाळीच वसइला जायचे आणि आईशी प्रत्यक्ष बोलायचे. तिला समजवायचे नाही ऐकल तर जबरदस्तीने तिला admit करायचे ह्या निश्चयाने ती झोपली.

आईचा हाडाचा सापळा बघून ऋतूला एकदम रडूच कोसळले. बी. पी. तरी मित्रा सारखा वागला होता पण हा ब्रेन ट्युमर एका गिधाडा प्रमाणे तिच्यावर वार करत होता. त्याला आटोक़्यात नाही आणले तर तो आईला कश्या प्रकारे त्रास देईल हे खुद्द डॉक्तर पण सांगू शकत नव्हते.

"आई अग काय हा वेडेपणा? तू कोणाचच ऐकत का नाहीयेस?"
"ऋतू ह्या विषयावर खूप चर्चा झाली आहे मला परत तू बोलायला लावू नकोस. माझा निश्चय अटळ आहे."
"तरी सुद्धा मला खर कारण जाणून घ्यायचं आहे. तुझ
कारण जर खरच योग्य असेल तर कदाचित मी तुझी बाजू इतरांना समजवून सांगू शकेन."
"कारण सांगायलाच हव का?" आईच्या या अगतिक प्रश्नावर ऋतू काहीच बोलली नाही पण तिने आईशी आबोलाच धरला.

बराच वेळ ऋतू काहीच बोलत नाहीये हे पाहून शेवटी आईच म्हणाली "ऋतू तुला माहित आहे ह्या शस्त्रक्रियेला किती खर्च येतो? कमीत कमी ६-७ लाख. आणि एव्हढा खर्च आत्ता करणं मला नाही पटत. म्हणून मी नाही म्हणते आहे."
"आई मी तुला खर कारण विचारलं होत." रागावूनच ऋतू म्हणाली. "तुला चांगलंच माहित आहे कि दादा काय, मी काय किंवा बाबा काय आम्हा सगळ्यांना ७-८ तर जावूच दे १५-२० लाख रुपये उभं करणं सहज शक़्य आहे."
"मी एक sr. project manager आहे.मला माझ्या मेडीक्लेम मधून आरामात तेव्हढे पैसे परत मिळतील. दादाचा तर स्वताचा व्यवसाय आहे आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने तो खूपच चांगला चालला आहे. काही करोड्स मध्ये निव्वळ नफा कमवणाऱ्याला इतके पैसे काहीच नाही. आई परत सांगते मला खर कारण सांग."

"तू एव्हढी जिद्द करते आहेस तर मग ऐक." बऱ्याच वेळाने धीर एकवटून आई म्हणाली.
"आता ह्या वर्षी मी झाले ७२ वर्षांची. देवाने मला एक छान आयुष्य दिल. तापट असला तरी समजून घेणारा, मनापासून प्रेम करणारा नवरा, आपापल्या क्षेत्रातली यशस्वी अशी तुम्ही दोघं, आणि छानशी ४ नातवंड. आयुष्या कडून अजून काय पाहिजे? सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या आता शांतपणे जावूदे त्याच्या कडे."
"अस कस बोलू शकतेस तू आई? आई तुझी खंबीर साथ अजून पाहिजे ग आम्हा सगळ्यांना. माझी खात्री आहे हे operation झाल्यावर परत सगळे ठीक होईल. तू अस विचार नको ना करू." अगतिक पणे ऋतू म्हणाली.

"बेटा मला अगदी मान्य कि मी नवऱ्याला तर साथ दिलीच पण तुम्ही दोघेही जेंव्हा आपापल्या संसारात आणि व्यावसायिक क्षेत्रात स्वताल सिद्ध करत होता त्यावेळी पण तुम्हाला वेळोवेळी साथ दिली. सुनेला पण तिचे शिक्षण पूर्ण करायला पूर्ण सहकार्य केले. पण त्यावेळची गोष्ट वेगळी होती आणि आत्ताची पूर्ण वेगळी आहे. तुम्हा दोघांचे आपापल्या संसारात, व्यावसायिक क्षेत्रात खंबीर पणे पाय रोवून उभे राहणे हे मी एक प्रकारे माझी जबाबदारी मानली. आणि त्यात मी बऱ्यापैकी यशस्वी पण झाले.
आता हीच भूमिका तुम्हाला तुमच्या मुलांना मोठ करताना वठवायची आहे. आणि तुम्ही दोघेही त्यात यशस्वी व्हालच. पण हे शिव धनुष्य पेलताना कधी मवाळ, तर कधी ताठर तर कधी तरी एकदम आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. कधी कधी तणावाचे प्रसंग पण येतील. हे सगळे मला अलिप्त राहून पण बघता नाही येणार आणि सहन पण होणार नाही. त्या पेक्षा आत्ता एक सुखी समाधानी चित्र साठवून तृप्त मनाने निरोप घेवूदेत."
बराच वेळ झाला पण ऋतू काहीच बोलत नाहीये हे पाहून आईच पुढे म्हणाली, "मला माहिती आहे ह्याचा स्वीकार करणं खूप कठीण आहे. अग मी तुमच्या मनात कायम असेन.तुमच्या संस्कारातून, तुमच्या वागणुकीतून कायम माझेच प्रतिबिंब दिसेल. शेवटी आज नाहीतर उद्या जायचेच आहे तर आज हे सुखी समाधानी चित्र का नको घेवून जावू?"
आईच्या ह्या बोलण्यावर ऋतूला कशी प्रतिक्रिया द्यावी हेच कळेनासे झाले. आई जे म्हणत होती ते बुद्धीला थोडेतरी पटत होते पण मनाला सहनच होत नव्हते.
"आई जी गोष्ट उद्यावर जावू शकते ती आजच करायची तुला घाई का?" इतका वेळ माय-लेकींचे बोलणे शांतपणे ऐकणारा दादा म्हणाला, 

"आई तू नेहमीच म्हणत आली आहेस कि जेंव्हा मन एक म्हणत आणि तुमची बुद्धी काहीतरी दुसर म्हणते त्यावेळी नेहमी आपल्या मनाचे ऐका. आई मला सांग तुझ मन नाही सांगत का मुलांची जशी प्रगती पाह्यली तशी नातवंडाची पण पहावी. तुझ मन नातवंडात नाही अडकत? मग का नाही तू आपल्या मनच ऐकत?"
"नाही रे राजा. कुठल्याही यशाकडे नेणारा मार्ग सोपा नक्कीच नसतो. अनेक अडथळे असतात त्यात. तुम्हा दोघांच अडखळण, पडण मी पाहू शकले. तुम्हा दोघांना परत उभ राहायला मी मदत पण करू शकले. पण नातवंडाच तस नाही रे. अरे साकेतचा टी. व्ही. कमी करण्यासाठी तू ओरडतोस त्यावेळी माझा जीव तुटतो रे. नातवंडांच पडण-झडण आता नाही पाहू शकत. त्याच्या चांगल्यासाठी तू जेंव्हा खंबीरपणे निर्णय घेशील तर कदाचित मीच पहिला अडथळा असेन रे."
"पण आम्हाला तस वाटत नसेल तर. आणि तुझा अडथळा पण आम्ही व्यवस्थित पार पडला तर तुझी काही हरकत नाही ना?"
दादाच्या ह्या प्रश्नावर आई काही क्षण बोलेनाशी झाली. 
"ठीक आहे तुम्ही आपल्या राजगुरू डॉक्तरांना भेटा. ते जर हो म्हणाले तर मी operation करायला तयार आहे."
डॉ. राजगुरू हे family डॉक्तर. ऋतूचा जन्म पण त्यांच्याच देखरेखीखाली झालेला होता. ते पूर्ण कुटुंबाला ओळखत होते. आईची त्यांच्यावर नितांत श्रद्धा होती. तिला जर का दुसऱ्या डॉक्तर कडे जावे लागले तरी ती तिची सगळ्या उपचाराची त्यांच्याकडून खात्री करून घ्यायची. ऋतू आणि दादा तर नेहमी त्यांचेच उपचार घ्यायचे आणि आता तर त्या दोघांची मुले पण त्यांचेच सल्ले मानायचे. दोनही कुटुंबा मध्ये एक वेगळाच जिव्हाळा होता म्हणूनच आईला त्यांची खूप खात्री होती कि ते योग्य सल्ला देतील.
"आई जे म्हणते आहे ते स्वीकारायला जरी कठीण असले तरी योग्य आहे." राजगुरू डॉक्तरांचे हे म्हणणे ऐकून बाबा, दादा, ऋतू सगळ्यांना धक्काच बसला.
"डॉक्तर तुम्ही असा कस म्हणता?" बाबाना आपला आवेग आवरता आला नाही.
"आम्ही तुमच्याकडे एक आशा घेवून आलो होतो कि तुम्ही आईला operation  साठी तयार कराल. आईचा स्वतावर नाही एव्हढा तुमच्यावर विश्वास आहे आणि तुम्ही अस म्हणता. " ऋतू म्हणाली.
"तुम्ही पूर्ण विचारांती आम्हाला योग्य सल्ला द्याल ह्याची खात्री आहे. पण हे सगळे मनाला खरच पटत नाहीये. ह्याच्यावर उपचार असून सुद्धा नाही करायचे हे कस शक़्य आहे?" बाबांना शांत करत दादा म्हणाला.

"परमेश्वराची अजब निर्मिती म्हणजे आपला मानवी मेंदू. डॉक्तरांना आव्हान देणारा शरीरातला अवयव म्हणजे मानवी मेंदू. ह्या मेंदूला, तो करत असलेल्या कामाला समजण म्हणजे एकदम अवघड काम आहे. आत्तापर्यंत फक्त २०% मेंदू आणि त्याचे कार्य शास्त्रज्ञांना समजले आहे. अजून ८०% मेंदू समजलाच नाही. मेंदूच्या तक्रारीवर अजून खात्रीशीर उपचार निर्माण झाले नाहीयेत. "
"म्हणजे operation झाल्यावर आईची सुधारण्याची आशा....."
"फक्त ५%." ऋतूचे वाक़्य मध्येच तोडत डॉक्तर म्हणाले, "शिवाय आई वर त्याचे अजून काय परिणाम होतील सांगणे खूप कठीण आहे. कदाचित ती हिंडू फिरू पण शकणार नाही."
"पण डॉक्तर, इतर  डॉक्तर तर खूप वेगळं सांगत आहेत. ते तर आमच्या पाठीच लागले आहेत कि लवकरात लवकर भरती व्हा. तुम्ही गैर समज नका करू. ते म्हणत आहेत कि ती ठीक होवून नित हिंडा फिरायला लागेल." बाबा म्हणाले.
"तुम्हाला आणि ह्या वैद्यकीय क्षेत्राला मी चांगलाच ओळखतो. हा मेंदू सगळ्यांना चांगलाच आव्हान देत आला आहे. त्यांना ह्या केस मधून एक अनुभव घ्यायचा आहे. डॉक्तरांना चांगलीच कल्पना आहे कि तुम्ही सगळे जण शिक्षित आहात उद्या रुग्णाच काही बर-वाईट झाल तर तुम्ही समजून घ्याल. माझा अनुभव आणि त्यांची तब्येत सांगतेय कि हे operation त्या सहन नाही करू शकणार."
"त्यांना अनुभव मिळणार असेल तर तस. हा अनुभव आज ना उद्या उपयोगी पडेल. आणि आम्हाला पण समाधान कि आई साठी आम्ही सगळे प्रयत्न केले." दादा म्हणाला.
"हा अनुभव फक्त मोजक़्याच लोकांना उपयोगी पडेल खरच तस वाटत असेल तर त्यांचे देहदान करा एका चांगल्या वैद्यकीय रुग्णालयाला.त्यांचे नेत्र दान करा. आईसाठी काही करायचे असेल तर त्यांचे हे दिवस उत्तम कसे जातील हेच बघा. त्यांना आता एकाचा गोष्ट देवू शकता तुम्ही ती म्हणजे तुमचा वेळ." डॉ. राजगुरू  आपले म्हणणे संपवत म्हाणाले, "त्यांच्या धीराचा सन्मान करा आणि साथ द्या. ह्या नीट होण्याच्या जंजाळात अडकू नका."

सगळ्यांच्या मताला ना जुमानता दादाने तिला भरती केलेच पण बी. पी. आटोक़्यात न आल्याने तिला परत घरी आणावे लागले. स्वीकारायला कठीण असला तरी आईचा निर्णय हा नेहमी प्रमाणेच योग्य ठरला. हळू हळू तिची तब्येत ढासळत होती. तिचे हे हाल तिच्या मित्राला पण बघवले नाही आणि त्यानेच तिची ह्या सगळ्यातून सुटका केली. बी.पी. अचानक खूप वाढल्याने ब्रेन इंज्युरी होवून तिची प्राण ज्योत मालवली.
गरज असेल तेंव्हा पूर्ण शक्तीनिशी लढायचं असतं, धावायचं असत आणि योग्य वेळी थांबायचं असत. जाता जाता हि शिकवण आई आम्हा सगळ्यांना देवून गेली होती.

साभार - लेखिका : राजश्री

टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top