१५ ऑगस्टचा मुहूर्त साधून टीम मन माझेतर्फे, आम्हा सर्वांचे "परमशांतीधाम वृद्धाश्रमास" भेट देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व मोठ्या संख्येने तिथे हजेरी लावली. नाही म्हणता म्हणता २२ सभासद आश्रमास भेट देण्यास आले. तिथे पोहोचल्यावर आम्ही जेव्हा तिथल्या वृद्ध व्यक्तीना भेटलो, तेव्हा त्यांच्या चेहेर्यावर एक वेगळाच भाव, एक वेगळंच तेज होतं. जणू काही आम्ही त्यांच्यासाठी काही घेऊन आलो आहे, यासाठी नव्हे तर, आम्हाला भेटण्यासाठी कोणतरी आलं आहे,आपलं स्वतःच कोणतरी???
            जवळपास ७५ जणांचा समुह असलेलं आश्रम. "स्वामी आबानंद्गिरी महाराज" यांच्या छत्रछायेखाली मोठा झालेला हा आश्रम आहे. या आश्रमात खूप चांगले आणि काही वाईट अनुभव आमच्या पदरी आले. खरच त्यांच्या नशिबी हे असं जगणं का??? प्रत्येक आजी आणि आजोबा आम्हाला स्वतः बोलावून त्यांचे अनुभव सांगत होते,आणि ऐकताना खरंच डोळ्यात अश्रू तराळत होते. 
            आम्ही एका खोलीत गेलो तिथे १ आजी होत्या, त्यांचं नाव आठवत नाही,पण त्यांनी त्यांचा जीवनपाठ आम्हाला सांगितला. नुकत्याच ६ महिन्यापूर्वी त्या तिथे आल्या होत्या. का तर कारण असं की, सांभाळणारा एकुलता एक मुलगा होता, पण तोच परलोकी गेला,आणि या दांपत्याचा आधारस्तंभच ढासळला. त्यांच्या पतींना हत्तीरोगाचा त्रास आणि त्यामुळे दोघांनीही आश्रमाचा रस्ता धरला.दोघेही बाजुबाजुच्या खोलीत आहेत,आणि जवळ राहून एकमेकांची काळजी घेत आयुष्याचा गाडा ओढत आहेत. हे सांगताना त्या आजीच्या चेहऱ्यावर दुःखाची एक रेष सुद्धा नव्हती. जणू काही हे आश्रमच त्यांचं घर समजून ते इथे वावरत आहेत.
             त्यांच्याच बाजूला साधारण ७५ वर्षांच्या एक आजीबाई होत्या. बहुधा २-३ वर्षांपूर्वी त्या इथे आल्या आहेत. त्यांच्या घरी  एक मुलगा, एक मुलगी आणि ६ नातवंडे असा परिवार आहे. मुलगी गिरगावला,ब्राह्मण समाज हॉस्पिटल मध्ये नर्स आहे, आणि मुलगा चांगल्या कंपनी मध्ये नोकरीला आहे, आणि आई वृद्धाश्रमात मुलं आणि नातवांची वाट बघत असते. आजीने मला मुलाचा नंबर दिला आणि फोन लावायला सांगितला, पण शेवटी ही आई मुलाचा आवाज ऐकण्यापासून वंचितच राहिली. हेच त्या मातेचे दुर्दैव!!!!!!
             
तिथून पहिल्या मजल्यावर गेलो, तिथे बाहेरच १ आजी बसल्या होत्या. मुळच्या त्या बंगाली, त्या काय बोलत होत्या काही कळत नव्हतं. त्यांनी मला बोलावलं, आणि मिठी मारून रडू लागल्या,मला काहीच सुचत नव्हते, मी पुरता घाबरलो होतो.नंतर गायत्री तिथे आली आणि त्यांच्याशी बंगालीत संवाद करत होती,तेव्हा मला कळलं,कि तिचा नातू माझ्यासाखा आहे,आणि ती मला घरी घेऊन जाण्यासाठी विनवण्या करत होती. 
             
असे एकाहून एक अनुभव येत गेले. खरतर आम्ही त्यांचे अश्रू पुसायला तिथवर गेलो होतो पण आमच्याच डोळ्यात अश्रू आले, आणि रडता रडता आमच्या चेहेर्यावर हसू आणायचं काम पण याच वृद्धांनी केलं. त्याचं बालपण जणू आमच्यासोबत बागडत होतं.

एक गृहस्त होते, वय वर्ष ८५.पण त्यांची सेकंड इंनिंग अगदी फोर्मात होती. त्या आजोबांची एक खासियत होती ती तेथील काही जणांनी आम्हाला सांगितली, कि ते गाणं तर ऐकवतात आणि तेही म्युज़िक सहित.. 
               ए मेरे दिल कही और चल,
  गम कि दुनिया से दिल भर गया...
धुंड ले अब कोई घर नया,
                ए मेरे दिल कही और चल........
               
 ते गाणं अजूनही माझ्या ओठावर रेंगाळतय..........

साभार - लेखक : प्रथमेश राउत 







टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top