उपवासाचे महत्त्व

पाच युगांपूर्वी सत्येश्‍वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्‍वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्‍वराचा मृत्यु नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्‍वरीने अन्न ग्रहण केले नाही. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. `भावाला चिरंतन आयुष्य व अनेक आयुधांची प्राप्‍ती होवो आणि तो प्रत्येक दु:ख व संकट यांतून तारला जावो', हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला ७५ टक्के लाभ होतो व त्याचे रक्षण होते.

नागाची पूजा करण्यामागील शास्त्र

सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.

नवीन वस्त्रे व अलंकार घालण्याचे कारण

सत्येश्‍वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला. त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी व तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले. त्यातून सत्येश्‍वर समाधानी झाला. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्रे व अलंकार परिधान करतात.

मेहंदी लावण्याचे महत्त्व

सत्येश्‍वर नागराजाच्या रूपात सत्यश्‍वेरीच्या पुढ्यात उभा राहिला. `तो निघून जाईल', असे वाटून तिने त्याच्याकडून, म्हणजे नागराजाकडून तसे हातांवर वचन घेतले. ते वचन देतांना सत्येश्‍वरीच्या हातांवर वचनचिन्ह निर्माण झाले. त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वत:च्या हातांवर मेहंदी काढते.

झोका खेळण्याचे महत्त्व

दुसर्‍या दिवशी सत्येश्‍वरीला नागराज दिसला नाही. तेव्हा ती जंगलात सैरावैरा भटकू लागली व शोधता शोधता झाडांच्या फांद्यांवर चढून पाहू लागली. त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्येश्‍वराचे रूप प्रकट केले. तेव्हा ती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर झोके घेऊ लागली. त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात. त्या दिवशी झोका खेळण्यामागील उद्देश असतो - `जसा झोका वर जातो, तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे व झोका खाली येतो, तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी व दु:खे खाली जाऊ देत.' वरील भाव ठेऊन जेव्हा बहीण प्रत्येक विचार व कृती करते, तेव्हा भावाची ५ टक्के आध्यात्मिक व ३० टक्के व्यावहारिक उन्नती होते.

नागपंचमीच्या दिवशी करावयाची प्रार्थना !

नागपंचमीच्या दिवशी जी बहीण भावाच्या उन्नतीसाठी ईश्‍वराला कळकळून व भावपूर्ण प्रार्थना करते, त्या बहिणीची हाक ईश्‍वराच्या चरणी पोहोचते. त्यामुळे प्रत्येक साधिकेने त्या दिवशी ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रत्येक युवकाला सद्बुद्धी, शक्‍ती व सामर्थ्य मिळण्यासाठी प्रार्थना करावी. नागपंचमीच्या दिवशी शीतलता ग्रहण करण्यासाठी अधिकाधिक नामजप करावा. शांत राहून आपल्यातील स्वभावदोषांचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्‍न करावेत.

संदर्भ :  ग्रंथ - ' सण,धार्मिक उत्सव व व्रते '

तर अशा या नागपंचमीच्या सर्वाना भक्तिमय शुभेच्छा !!




Post a Comment Blogger

 
Top