रामानुजाचार्य शठकोपस्वामींचे शिष्य होते. स्वामींनी रामानुजांना ईश्वरप्राप्तीचे रहस्य सांगितले होते. मात्र ते कुणालाही सांगू नको, असे बजावले होते; पण रामानुजांनी आपल्या गुरूंची ही आज्ञा मानली नाही. गुरूंनी जे ज्ञान दिले, ईश्वरप्राप्तीचा जो मार्ग सांगितला होता, ते सारे ज्ञान त्यांनी लोकांना देण्यास प्रारंभ केला. शठकोपस्वामींना हे जेव्हा कळले, तेव्हा ते फार संतापले. रामानुजांना बोलावून घेऊन ते म्हणाले, ''माझी आज्ञा मोडून तू साधनेचे रहस्य प्रगट करत आहेस. हा अधर्म आहे. पाप आहे. याचा परिणाम काय होईल तुला ठाऊक आहे का ?''
रामानुज नम्रपणे म्हणाले, ''गुरुदेव, गुरूंची आज्ञा मोडल्यास शिष्याला नरकात जावे लागते.'' शठकोपस्वामींनी विचारले, ''हे तुला ठाऊक असतांनासुद्धा तू जाणूनबुजून असे का केलेस ?''
यावर रामानुज म्हणाले, ''वृक्ष आपले सारे काही लोकांना देतो. त्याला कधी स्वार्थ आठवतो का ? मी जे काही केले, त्यामागचा उद्देश लोकांचे कल्याण व्हावे, लोकांनासुद्धा ईश्वरप्राप्तीचा आनंद मिळावा, असाच आहे. यासाठी मला नरकात जावे लागले, तर मला त्याचे मुळीच दुःख होणार नाही.''
ईश्वरप्राप्तीची साधना इतरांना सांगण्याची रामानुजांची तळमळ पाहून स्वामी प्रसन्न झाले. त्यांनी रामानुजांना पोटाशी धरले. त्याला उत्तमोत्तम आशीर्वाद दिले आणि लोकांत खर्या ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी मोठ्या प्रेमाने पाठवले.
मुलांनो, रामानुजांनी ईश्वरप्राप्तीची साधना इतरांना सांगितली. त्यांच्या तळमळीने स्वामी त्यांच्यावर प्रसन्न झाले. आपणही आपल्याला मिळालेले ज्ञान असेच वाटले पाहिजे.
आभार - बालसंस्कार.कॉम
Post a Comment Blogger Facebook