एकदा संत एकनाथांना कोणी दोन प्रश्न विचारले. एक, त्याच्या स्वत:च्या भविष्याबध्दल, आणि दुसरा, एकनाथ स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात याच्याबद्दल .

एकनाथ हसले; आणि, 'केंव्हातरी याची उत्तरे देईन', म्हणून त्यांनी सांगीतले.

काही दिवसांनी, एकनाथांची त्या गृहस्थाशी भेट झाली. तेंव्हा त्याला बाजूला नेऊन एकनाथ म्हणाले, "तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण, दुर्दैवाने, तू आता आठ दिवसांच्या आत मरणार आहेस."
तो गृहस्थ सुन्न झाला, गोठला ! एकनाथ समोरून निघून गेले, तेंव्हा तो बधीर मनाने परतला. 

जगलो तर एकनाथांसारख्या संतांच्या सदिच्छेने जगू, अशी त्याला भावना निर्माण झाली.
ती त्याने सार्थ केली. आयुष्यातले आठ दिवस पूर्ण करून नवव्या दिवशी, एकनाथांच्या दर्शनाला तो गेला. एकनाथांना हात जोडून म्हणाला, "तुमच्या कृपेने वाचलो."
एकनाथ मान डोलवित म्हणाले, "आता मी तुम्हाला दुस-या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. गेले आठ दिवस तुम्ही कसे वागलात ? इतरांच्यावर किती रागावलात?"

तो गृहस्थ उत्साहाने म्हणाला, "कसला हो रागावतो? अगदी छान, शांत आठ दिवस गेले. शांत म्हणजे, मरणाच्या भितीने बेचैन होतो, पण दुस-यावर रागावण्यासाठी ती बेचैनी नव्हती. घरात बायकोशी कधी भांडलो नाही. मुलांना मारले नाही. वाटायचे की, आता अखेरचे आठ दिवस उरले. बायका-मुले पुन्हा दिसणार नाहीत; त्यांना का दुखवावे? अहो, शेजा-याचे जमिनीवरून चार पिढयांचे भांडण होते. त्याला स्वत:च्या हाताने हवा तो तुकडा तोडून दिला. देणे होते ते देऊन टाकले. ज्यांच्याकडून येणे होते, त्यांच्यापैकी जे गरीब होते, त्यांचे येणे सोडून दिले. काही पैसे गमावले, पण शांती कमावली. खूप खूप शांत असे आठ दिवस त्या दृष्टीने गेले."

एकनाथ समोरच्या माणसाच्या पाठीवर हात थोपटून म्हणाले, 

"हे तुझ्या दुस-या प्रश्नाचे उत्तर. आठ दिवसांत जग सोडून जायचे आहे, अशा कल्पनेने मी सदाच वावरतो. म्हणून मी शांत वाटतो." 

Post a Comment Blogger

 
Top