डोळे मिटले की, तिच समोर येते... कधी खळखळुन हसणारी, कधी माझ्याकडे बघुन
गोड, लाडीकपणे हसणारी, कधी रडका चेहरा करुन आणि गाल फ़ुगवुन माझ्यावर
रुसुन बसलेली, कधी रडवेली झालेली, तर कधी सगळ्या जगाचं ओझं तिच्याच
खांद्यावर आहे अश्या अविर्भावात विचारमग्न झालेली... मी स्वत:ला इतका खुश
पहिल्यांदाच बघतोय. खरंच प्रेम किती सुखद भावना आहे नाही?
 
 मला तिला बघायचंय दिवसभर, रात्रभर.
मला बघायचंय ती सकाळी उठते, तेव्हा पहिली गोष्ट काय करते, आळस कसा देते,
डोळे कसे चोळते, दात कसे घासते,तिच्या टूथ ब्रशचा रंग कोणता, तिला
मिंटवाली टूथपेस्ट आवडते का स्ट्राइप्सवाली? ती कोणता साबण वापरते?
तिच्या टॉवेलचा रंग कोणता? तिला कोणत्या रंगाचे कपडे आवडतात? तिला
कोणत्या प्रकरचे कपडे आवडतात? तिला साडी नेसता येते का? टिशर्ट काढत असताना
विस्कटलेले तिचे केस आणि त्यामुळे वैतागलेली ती, मला मनाच्या एका
कोपर्यात हळुवारपणे जपुन ठेवायचे आहेत. तिला हिल्सवाली सॅन्डल आवडते का
फ़्लॅट सोल असलेली चप्पल? ती कशात छान दिसते? आंघोळ झाल्यावर ती देवाला
नमस्कार करते का? 
 
 करत असेल तर मला देवासमोर ध्यान लावुन बसलेलं तिच ते
रूप डोळे भरुन पहायचय. तिच्या आवडीचा देव कोणता ? कोणत्या देवाला ती
मानते? देवाधर्मावर तिचा विश्वास नसेल, तर का नाही - हे मला तिला
विचारायचंय.

तिला काय खायला आवडतं? गुलाबजाम घेताना ती वाटीत एका वेळी किती घेते?
रसमलाइ घेताना ती रस जास्त घेते का मलाइ ? ठेचा खातना तिच्या डोळ्यातुन
पाणी येतं का ? आणि येत असेल तर एकाच डोळ्यातुन येतं का दोन्ही डोळ्यातुन
येतं, हे मला बघायचंय. 
मला तिच्या आवडीचे पदार्थ बनवुन ती
थकलेली,वैतागलेली असताना तिला सरप्राइज द्यायचंय. मी कपडे बेडरूम मधे
इकडे तिकडे पसरवुन टाकले की तिची होणारी चिड चिड ,तिचं लाल होणारं ते
नाक... मला सगळं सगळं बघायचंय. लाइट गेले की ती घाबरते का? तिल लहान मुलं
आवडतात का? आम्हाला पहिला मुलगा झालेला तिला आवडेल की मुलगी..हे मला तिला
विचारायचंय.
 
तिला उगवणारा सुर्य आवडतो की मावळणारा? तिला कोणता खेळ बघायला/खेळायला
आवडतो? पत्ते खेळत असताना मी मुद्दाम तिच्याशी हरतोय, हे तिच्या लक्षात
येतय का, ते मला बघायचय. आई-बाबा त्याच रूम मधे असताना आणि त्यांचं लक्ष
नसताना, मी तिचा हात पकडल्यावर तिचे गुलाबी होणारे गाल आणि लाजुन खाली
गेलेली नजर मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवायचिये. मी
रात्री घरी उशीरा आल्यावर , मझी वाट पहाता पहाता सोफ़्यावरच झोपलेली ती
नाजुक बाहुली मला अलगद उचलुन नीट पलंगावर ठेवायचिये आणि तिच्या अंगावर
पांघरुण घालायचंय. कधी तिला घरी यायला उशीर झाला, तर मी केलेला तिच्या
आवडीचा स्वयंपाक बघुन संसारसुखाने सुखावलेली ती मला बघायचिये.

 
तिचा स्वभाव जाणुन घ्यायचाय अगदी तिच्या मनात येणारा प्रत्येक विचार तिनी
स्वत: मला सांगण्या आधी माझ्या ओठातुन तो बाहेर येइल इतकं छान मला तिला
कळुन घ्यायचंय. तिच्याशी भांडायचंय, नंतर वेडे वेडे चाळे करुन तिचा राग
पळवायचाय आणि कधी तिच्याकडुन माझी स्वत:ची पण समजुत काढुन घ्यायचिये. मला
आलेलं एखादं अपयश, तिच्या मिठीत विरघळुन मला विसरायचंय आणि आम्हाला
मिळणार्या यशाचा प्रत्येक क्षण अन क्षण कायम लक्षात राहील, असा साजरा
करायचाय.

 
तिला अगदी भरभरुन, माझ्याच्यानी होइल तितकं मला प्रेम द्यायचंय. तिनी
वटपौर्णिमेला स्वत:हुन देवाकडे 'जन्मो जन्मी हाच पती मिळु दे' ही दरवर्षी
मनापासुन प्रार्थना करावी असं मला बनायचंय..इतकं मला तिला आनंदात
ठेवायचंय........

 आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी






Post a Comment Blogger

 
Top