मुलीला तिच्या भावना महत्त्वाच्या तर, मुलाला त्याचा इगो. नात्यात जर
तिच्या भावनांचा आणि त्याच्या इगोचा आदर केला गेला तर, दोघानांही
आपल्याला महत्त्व असल्याचं जाणवतं. यामुळे एकमेकांशी जवळीक अधिक वाढते.
........
इयत्ता चौथीमध्ये स्कॉलरशिप मिळवलेल्या तनयच्या अभ्यासाचा आलेख वरवर
जाण्यापेक्षा इयत्ता सातवीपर्यंत तो अधिकच घसरला. त्याचबरोबर प्रशांत आणि
रेणुका खडबडून जागे झाले आणि त्यांनी थेट धाव घेतली ती मानसोपचार
तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी! तनयच्या पुढच्या भवितव्यासाठी त्याची
बौद्धिक चाचणी घेतली असता, तो खूप हुषार आहे पण एकाग्र नसल्यामुळे निदान
दहावीपर्यंत तरी त्याचा सतत पाठपुरावा करावा लागेल, असा रिपोर्ट
आल्यामुळे रेणुका आणि प्रशांत दोघंही काळजीत पडले. कारण त्यांच्या
त्रिकोणी कुटुंबातील दोन कोन नोकरी धंद्याच्या व्यापात गुंतलेले. दोघंही
चांगल्या पोस्टवर. त्यामुळे रजा मिळण्याचाही प्रॉब्लेम.
प्रशांत विचार करून म्हणाला, 'रेणू, मला वाटतं, तनयच्या अभ्यासाची
जबाबदारी तूच सक्षमपणे पेलशील. त्यामुळे तुला निर्णय घ्यावा लागेल.'
रेणुका मनात खूप अस्वस्थ झाली. एवढं मोठं करिअर, चांगली पोस्ट आणि पगारही
मनासारखा हे सर्व एका क्षणात सोडून द्यायचं! त्यातून तनय हा सतत शाळा,
क्लास नाहीतर खेळात गुंतलेला! मी घरात एकटी राहून नक्कीच बोअर होणार, असा
विचार येऊन ती बेचैन झाली. पण क्षणभरच. कारण, प्रशांतनेही मुलाच्या
भवितव्याचा विचार करूनच प्रस्ताव मांडला असेल म्हणून त्याच्या मताचा आदर
ठेवला. नोकरी सोडून तिने जास्तीत जास्त वेळ तनयचा अभ्यास, खाणपिणं आणि
मानसिकता याला वेळ द्यायला सुरुवात केली. मात्र, तो शाळेत किंवा क्लासला
गेल्यावर ती एकटी पडू लागली. प्रशांतही ऑफिसच्या कामामुळे उशीरा घरी येत
असे. रेणुकाची अवस्था प्रशांतने ओळखली. मुलाच्या शिक्षणासाठी करिअर
सोडल्याने तोही तिला रिस्पेक्ट देत होता. म्हणून त्याने तिला सुचवलं की,
फावल्या वेळेत तू संगीताचा क्लास जॉइन कर, ज्यामुळे तुझा छंदही जोपासला
जाईल आणि मनही प्रफुल्लीत राहील. म्हणून तनयच्या अभ्यासाच्या वेळा
सांभाळून तिने संगीताची आवड जतन केली. संसारासाठी कराव्या लागणाऱ्या
रेणुकाच्या त्यागामुळे प्रशांत प्रभावित झाला तर, माझ्या आवडीनिवडी हा
जपतो या आपुलकीच्या भावनेने रेणुकाही आनंदित झाली आणि त्यामुळेच
दोघांमध्ये जवळिकता निर्माण झाली.
नात्यांमध्ये एकमेकांच्या मतांचा आदर करणं खूप महत्त्वाचं आहे. रेणुकाने
प्रशांतला 'मीच का?' हा प्रश्न केला असता किंवा प्रशांतने तिच्या
निर्णयाचा आदर न करता 'तीच ते कामच आहे', असं मानून वागला असता तर,
कदाचित त्यांच्यात दुरावा होण्याची शक्यता होती. पण मतांच्या आदरामुळे
वेळ निभावली.
'हम-तुम'च्या गरजा एकमेकांपेक्षा बऱ्याच प्रमाणात वेगळ्या आहेत. मुलीला
तिच्या भावना महत्त्वाच्या तर, मुलाला त्याचा इगो. नात्यात जर तिच्या
भावनांचा आणि त्याच्या इगोचा आदर केला गेला तर, दोघानांही आपल्याला
महत्त्व आहे, असं जाणवतं आणि यामुळे एकमेकांशी जवळीक अधिक वाढते. आपल्या
जोडीदाराच्या निकटच्या व्यक्तींचा आदर करणंही तेवढंच महत्त्वाचं. त्याचे
आई-वडील, मित्र-मैत्रिणी यांच्याविषयी जर आपण कुरकुर केली तर, निश्चितच
त्यातून तक्रारी उद्भवतात. त्याचबरोबर एकमेकांच्या घराण्याचा, शिक्षणाचा
आणि ज्या वातावरणात ते वाढले आहेत त्याचा वारंवार उद्धार केला तर,
साहजिकच मनं कलुषित होतील आणि भावनांचा अनादर होईल.
पती-पत्नी त्याचे आचार-विचार आणि स्वभाव या बाबतीत भिन्न असतात. त्यामुळे
कधीही चर्चा करताना 'माझचं बरोबर आहे', हा हेका न ठेवता 'तुझंही मला
पटलंय पण, दोघांचा निर्णय घेऊया ही भूमिका ठेवली तर, वाद न होता नक्कीच
सुसंवाद निर्माण होईल.
आदर ही अशी एक भावना आहे, ज्यातून सुसंस्कृतपणा तर दिसतोच पण, समोरील
व्यक्तीचं मनही जिंकता येतं आणि जोडीदाराचं मन जिंकणं हे जग
जिंकण्यासारखंच आहे.
- गौरी कोठारी
(सायकॉलॉजिस्ट अॅण्ड सायकोथेरपिस्ट)
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
टिप्पणी पोस्ट करा