चार पावलं आपण
सोबत चालत जाऊ
तुझे आणि माझे सूर
कुठवर जुळतात पाहु...

अर्थात जमत असेल तर चल
मी आग्रह करणार नाही
आज तरी, "तुला यावच लागेल,
असा हट्ट ही धरणार नाही

पण मनातल्या मनात कुढण्यापेक्षा
व्यक्‍त करणं बरं असतं
कारण इथून तिथून ऐकलेलं
सारंच काही खरं नसतं

कुणी कुणाला का आवडावं
हे सांगता येत नाही
चार चौघांना विचारून कुणी
हृदय देत नाही

तसंच काहीसं माझं झालं
त्याच धुंदीत propose केलं
जवळ अशी कधी नव्हतीसंच
propose ने आणखीच दूर नेलं

जे झालं ते वाईट झालं
पण झालं ते बरंच झालं
खरं सांगणं गुन्हा असतो
एव्हढं मात्र लक्षात आलं

जाऊ दे,
झालं गेलं विसरून जा
मागे न वळता चालत राहा
मला विसर असं मी म्हणणार नाही
पण तू तो प्रयत्न करून पाहा...

थांब...
इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय
पण धन्यवाद; तू इथवर आलीस...
सारं आयुष्य नसलीस तरी
चार पावलं माझी झालीस....

टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top