तुझ्याचसाठी…….
तुझ्याचसाठी सजली
आज तुझी ही सखी
साज श्रृंगार करू कसा
आणि किती किती || १ ||
रात्रीकडूनी आज चोरीले
थोडेसे हे काजळ
नयनामधे भरता मी ते
चाहुल देई वादळ || २ ||
चमचमणा-या चांदण्या ह्या
लेऊनी देहावरती
घेशील मजला कवेत जेव्हा
तुज कणकण शिंपून जाती || ३ ||
चंद्र नभीचा चोरुनी मी रे
ल्याले भाळावरती
असताना समोरी सजना
त्याची मादकता थिटी || ४ ||
केश संभार करुनी बसले
माळुणी मोगरा वेणी
अलगद सुटता काटा मग तो
तू नकळत अड़कुन जाशी || ५ ||
खणखणत्या ह्या चुडयात राया
तुझीच प्रीती भरली
वाराही बेधुंद होउनी
तुझीच गाणी गाई || ६ ||
नथीत माझ्या लखलख मोती
सजली नाकामधी
आतुरली ती माझ्या संगे
तुज अधराच्या स्पर्शासाठी || ७ ||
छुमछुम पैंजन बांधून पायी
सजली तुझी रे सखी
सौंदर्य पाहता आरशात मग
लाजेची कळी ही खुलली || ८ ||
तूच माझा अलंकार राजसा
तूच माझा श्रृंगार
प्रीतीचे तुझिया वस्त्र लेउनी
उघडले हे यौवनाचे द्वार || ९ ||
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
टिप्पणी पोस्ट करा