एखादं मोठ्ठं बिझिनेस डील
नोकरीत मिळवली बढती वाढ,
आठवतंच नाही शेवटचे केले कधी
माझ्याचे लेकीचे मी भरभरून लाड…

ओव्हर नाइट रोज लेट सिटींग्ज
कॉन्फ़रन्सेस अन ऑफ़िस मिटींग्ज,
लक्षात ठेऊनही द्यायचे राहूनच गेले
सख्ख्या बहिणीला बर्थडे ग्रीटिंग्ज…

जातायेताना आई समोरच दिसते
क्वचित कधी दबक्या आवाजात खोकते,
“औषध घेतेस ना वेळेवर” विचारेन तर
आठ चाळीसची ठरलेली लोकल चुकते…

विकली रिपोर्ट्स अगदी वेळेत दिले
परफ़ॉर्मन्सने बॉस अगदी खुष होऊन गेले,
सहा महिने माझी वाट पाहून शेवटी
रुटिन चेक-अपला बाबा एकटे जाऊन आले…

बाहेर पडताना दिसतात शेजारचे काका
हल्ली काठी घेऊन बिचारे फिरत असतात,
नेहमीसारखा माझ्या कानाला मोबाइल
दाताच्या कवळीतून तरी ते हसून बघतात…

किती दिवसात स्वत:च्याच घरी
समोरच्या भिंतीवर पोपडा पाहिलाच नाही,
या पावसात गळतंय सीलिंग पण
माझ्यात मायेचा ओलावा राहिलाच नाही…

प्रत्येक सरत्या क्षणाला कँश करुन घेताना
माझ्यात गुंतलेले कितीक धागे तुटताना,
तटस्थ मी.. त्रयस्थ मी..
खूप पुढे निघून जात आहे..
खूपच पुढे..!
खूप उशीर होण्याआधी,
एकदातरी मागे वळून पहावं का..?

टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top