सुटीसाठी गावी गेलेला शिऱ्या देवळाशेजारच्या मैदानात क्रिकेटची प्रॅक्टिस करत होता आणि आबा देवळाच्या पडवीतून ती पाहात होते. आपण स्क्वेअर कट कसा एलिगंट मारतो, फ्लिक काय सुरेख करतो, रिव्हर्स स्वीपमध्ये तर कसे मास्टर आहोत, असं अॅक्शन करीत सांगून सांगून त्यानं आबांना जाम पकवलं.

धोतराचा सोगा सावरत खाली उतरून आबा म्हणाले, ''शिऱ्या, तू मला ह्या बॅटिंगच्या गमजा सांगू नकोस. आमच्या काळात सीके नायडू जाम फॉर्मात होता. आम्ही सारे त्याचे भक्त. हे समोरचं आंब्याचं झाड आहे ना! त्याच्या शेंड्यावरून सिक्सर मारायचो आम्ही त्या काळात. ते करून दाखवशील, तर तू खरा बॅट्समन!''

झालं... शिऱ्या पेटला. उंच, डेरेदार आंब्याच्या झाडावरून सिक्सर मारण्यासाठी त्यानं जिवाचा आटापिटा केला. पण, बॉल फांद्यांत आपटून, एखादी कैरी तोडून खाली पडायचा.

तासाभरानंतर दमछाक झालेला, वैतागलेला शिऱ्या गप्पपणे आबांबरोबर घराकडे निघाला, तेव्हा आबा खुसुखुसू हसत म्हणाले, ''अरे शिऱ्या. मघाशी तुला एक सांगायचं राहूनच गेलं. आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा ते आंब्याचं झाडही लहानच

होतं... चार फुटांचं!!!!''

टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top