बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि
दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम
स्वीकारले. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा होय.

बलिप्रतिपदेची पौराणिक कथा :


 बलीराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथी जे मागेल ते दान तो
त्याला देत असे. ‘दान देणे’ हा गुण आहे; पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच
असतो. कोणाला काय, केव्हा आणि कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे अन् तो
शास्त्रात आणि गीतेत सांगितला आहे. सत्पात्री दान द्यावे. अपात्री देऊ
नये. अपात्र माणसांच्या हाती संपत्ती गेल्याने ते मदोन्मत्त होऊन वाटेल
तसे वागू लागतात. बलीराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. तेव्हा
भगवान श्री विष्णूने मुंजा मुलाचा अवतार (वामनावतार) घेतला. (मुंजा मुलगा
लहान असतो अन् तो ‘ॐ भवति भिक्षां देही ।’ म्हणजे ‘भिक्षा द्या’ असे
म्हणतो.) वामनाने बलीराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले,
‘‘काय हवे ?’’ तेव्हा वामनाने त्रिपाद भूमीदान मागितले. ‘वामन कोण आहे
आणि या दानामुळे काय होणार’, याचे ज्ञान नसल्याने बलीराजाने त्रिपाद भूमी
वामनाला दान दिली. त्याबरोबर वामनाने विराटरूप धारण करून एका पायाने सर्व
पृथ्वी व्यापून टाकली. दुसर्‍या पायाने अंतरिक्ष व्यापले अन् त्याने
‘‘तिसरा पाय कोठे ठेवू ?’’, असे बलीराजास विचारले. त्यावर बलीराजा
म्हणाला, ‘‘तिसरा पाय माझ्या मस्तकावर ठेवा.’’ तेव्हा ‘तिसरा पाय
त्याच्या मस्तकावर ठेवून बलीराजाला पाताळात घालावयाचे’ असे ठरवून
वामनाने, ‘‘तुला काही वर मागावयाचा असेल तर माग (वरं ब्रूहि)’’, असे
त्याला सांगितले. तेव्हा त्याने वर मागितला, ‘आता पृथ्वीवरील माझे सर्व
राज्य संपणार आहे आणि आपण मला पाताळात घालविणार आहात, तेव्हा तीन पावले
टाकण्याचे जे सर्व घडले, ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य
म्हणून ओळखले जावे. प्रभू, यमाप्रीत्यर्थ दीपदान करणार्‍याला यमयातना होऊ
नयेत, त्याला अपमृत्यू येऊ नये आणि त्याच्या घरी लक्ष्मीने निरंतर वास
करावा.’ ते तीन दिवस म्हणजे आश्विन कृष्ण चतुर्दशी, आश्विन अमावास्या आणि
कार्तिक शुद्ध प्रतिपदा. याला ‘बलीराज्य’ असे म्हणतात.

पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी
अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र
काढतात व त्याची पूजा करतात आणि 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे
म्हणतात. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात
कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा
करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली
जाते. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी
विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त
आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही
नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून
व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या
कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. कीर्द-खतावणीच्या
नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता
वाहून पूजा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्‍नी पतीला
औक्षण करते व पती पत्‍नीला ऒवाळणी घालतो.
नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्‍नीच्या माहेरी साजरी करतात.
ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.


आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top