महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे. त्यात संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , संत सावतामाळी अश्या अनेक संतांचा समावेश आहे. आयुष्य जगण्यासाठी लागणारी मुल्ये , विचार, आचार , चांगुलपणा , सामाजिक बांधिलकी याचे संस्कार आपल्या मराठी मातीत आले ते या संतांच्या शिकवणी मुळेच .
संत ज्ञानेश्वर म्हणजेच 'माउली' यांनी "ज्ञानेश्वरी  " उर्फ " भावार्थ दीपिका "या ग्रंथातील अठराव्या अध्यायाच्या  शेवटी सर्व विश्वाच्या कल्याणासाठी देवाकडे "पसायदान " मागितले .
ते पसायदान आपणा सर्वांना माहित आहेच परंतु त्याचा अर्थ सोप्या भाषेत लिहिण्याचा व आधुनिक पिढीला आपल्या मराठी मातीच्या संस्कारांशी जोडण्याचा हा छोटासा प्रयत्न. 

  


आता विश्र्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । 
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ।।
श्री संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती देवाला अर्पण करून त्या वांग्मयाचे फळ म्हणून देवाकडे संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी प्रसादरुपी पसायदान  मागितले  . 


जे खळांची व्यंकटी सांडो ।तया  सत्कर्मी रती वाढो । 
भूतां परस्परें पडो। मैत्र जीवांचें ।।
या पसायदानात ते मागतात कि जे  वाईट दुष्ट लोक आहेत त्यांचा दुष्टपणा संपून जाऊन त्यांनी चांगल्या मार्गाला लागावे. आणि सर्व माणसे चांगल्या मार्गाला लागल्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्रीचे भावबंध निर्माण व्हावे .  


दुरिताचें तिमिर जावो । विश्र्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात।।

वाईट लोकांच्या जीवनातला अंधार दूर होऊन सर्व विश्वात स्वधर्म रुपी सूर्याचा उदय होवो. आणि सर्व प्राणिमात्रांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत . ते जे मागतील ते सर्व त्यांना मिळो.


वर्षत सकळ मंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु या भूतां ।।

सर्व ईश्वरनिष्ठ संतांनी इथल्या भूमीवर मंगल वातावरण निर्माण करण्यासाठी  यावे व सर्व प्राणीमात्रांना भेटावे . 


चला कल्पतरूंचे अरव । चेतना चिंतामणीचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।।

त्या संतांच वर्णन ज्ञानेश्वर अस करतात कि ते संत म्हणजे कल्पतारुंचे उद्याने , चेत्नारूपी वातावरण निर्माण करणारे रत्न , आणि ज्यांचे  बोल हे अमृताप्रमाणे आहेत असेच आहेत .

 

चंद्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।

ते संत म्हणजे कोणताही डाग नसलेले चंद्र आहेत , ताप नसलेले सुर्य आहेत व  ते सर्व सज्जनांचे मित्र आहेत .


किंबहुना सर्व सुखीं । पूर्ण होउनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदीपुरुखी । अखंडित ।।

या पृथ्वीवरील सर्व लोकांनी सर्वतोपरी सुखी होऊन विश्वेवराची अखंडित सेवा करत राहावी .



आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं ईयें ।
दृष्टा दृष्ट विजयें । होआवें जी ।।

आणि या ग्रंथाला जीवन मानून सर्व दुष्ट प्रवृतींवर विजय मिळवून सुखी व्हावे . 


तेथ म्हणे श्रीविश्र्वेशरावो । हा होईल दानपसावो ।
येणेंवरें ज्ञांनदेवो । सुखिया जाला ।।

त्यावर विश्वेश्वारांनी प्रसन्न होऊन हा वर ज्ञानेश्वरांना दिला , व ज्ञानेश्वर आनंदी झाले .

तर मित्रांनो हा मूळ पसायदानाचा शब्दशः अर्थ नसून सोप्या भाषेतला अर्थ आहे . ज्ञानेश्वरांनी आपल्या कल्याणासाठी मागितलेली हि प्रार्थना खरोखरच खूप सुंदर आहे .
हा अर्थ तुम्हाला आवडला असल्यास त्याचे सर्व श्रेय ज्ञानेश्वर चरणी अर्पण , व यात काही चुका असल्यास त्या मात्र निसंशय माझ्या !


लेखिका : प्रतिक्षा गायकर ( बदलापूर )

टिप्पणी पोस्ट करा Blogger

  1. सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  2. Wish to cry after comparing MAULI'S thoughts with latest situation(position) around us

    उत्तर द्याहटवा
  3. धन्यवाद अर्थ सांगितल्याबद्दल...लहानपणापासून आपण पसायदान फक्त म्हणत होतो.. त्याचा अर्थ माहीत नव्हता कधी...

    उत्तर द्याहटवा
  4. Apratim...etkya sopya bashet samjavun sangitlyabaddal....sarv sadhne ahet...pan arth kunala vicharava asa prashn nehmi padaycha....sant vangmayat kharach ruchi nirman hotey ..

    Tyabaddal aple vishesh abhar

    उत्तर द्याहटवा
  5. खूप सुंदर आजच्या काळात सोप्या मराठीत खूप गरज . खूप खूप धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  6. सोप्या भाषेत अर्थ सांगीतल्या बद्दल खूप आभार

    उत्तर द्याहटवा
  7. अतिशय छान व सोप्या भाषेत अर्थ कळला ,आभारी आहे

    उत्तर द्याहटवा
  8. छान प्रयत्न, आजच्या आधुनिक काळातील नावाची जननी पसायदान आहे याचा साक्षात्कार झाला व त्या नावांचा अर्थही लक्षात आला.

    उत्तर द्याहटवा

 
Top