१४ फेब्रुवारी जवळ आला की आमच्या शेजारी राहाणार्‍या दादाची 'तयारी' सुरू होते.
नवे कपडे. नव्या आयडिया. काय काय खरेदीही सुरू असते !
सगळे जण त्याला चिडवतात; पण त्याच्या तोंडावर नाही हं. आम्हीपण त्याची मुद्दाम फिरकी घेतो. वेड घेऊन पेडगावला जातो. त्याला वाटतं आम्हाला काही कळतच नाही. १४ फेब्रुवारी म्हणजे 'व्हॅलेण्टाईन डे' हे काय आम्हाला माहीत नाही? यालाच 'प्रेम दिवस'ही म्हणतात ना? कॉलेजात या दिवशी खूप गर्दी असते. पोलिसांनाही बोलवावं लागतं म्हणे !

आमचे सर सांगतात, अगोदर स्वतःवर प्रेम करायला शिका, म्हणजे इतरांवरही आपण आपोआप प्रेम करायला लागतो.  
 आपल्या स्वतःच्या गोष्टी तरी आपण प्रेमानं करतो का? आपली स्वच्छता, कपडे, अभ्यास, शिस्त..
खरं तर प्रेम ही किती सोपी गोष्ट. साधं प्रेमानं बोललं तरी खूप काही साध्य होतं.
आपण बोलतो प्रत्येकाशी प्रेमानं? भाऊ-बहीण, मित्र, मैत्रिणी, शिक्षक, शेजारी..
रोज कितीतरी जणांशी आपला संबंध येतो. आपल्याकडे रोज येणारे दूधवाले काका, कामावाल्या मावशी, रिक्षावाले काका.. या सगळ्यांशी आहेत आपले प्रेमाचे संबंध?
दादाच्या 'प्रेम दिवसा'च्या तयारीचं जाऊ द्या..

आपण आपलं रोजच प्रत्येकाशी प्रेमानं बोलत जाऊ. आपला राग आवरायला शिकू. दुसर्‍याला मदत करू. आपण दुसर्‍याशी प्रेमानं वागलं की इतरही आपल्याशी प्रेमानं वागतील. आपल्यासाठी प्रत्येकच दिवस मग 'प्रेम दिवस' होईल !
त्यासाठी वेगळा दिवस साजरा करायची वेळच आपल्यावर येणार नाही ! :)

 आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी


Post a Comment Blogger

 
Top