यंदाच्या दिवाळी २०१० पासून पुढच्या वर्षांतल्या दिवाळी २०११ पर्यंतच्या
बारा महिन्यांत बारा राशींचे ग्रहमान कसे असेल, कुठल्या गोष्टींसाठी
कुठली वेळ योग्य आहे आणि कुठली नाही, हे जाणून घेण्यासाठी वाचा 'तुम्हा
आम्हा सर्वाचं' भविष्य...

मेष:

कठोर परिश्रमास पर्याय नाही अशी नवीन वर्षांची सुरुवात आहे. त्यामुळे
चिंतेत पडू नका कारण हे ग्रहमान मे महिन्यानंतर बदलणार आहे. जे कष्ट
तुम्ही केले असतील त्याचे चांगले फळ तुम्हाला निश्चितच मिळेल.
व्यापार उद्योगात षष्ठस्थानातील शनीमुळे सतत एकप्रकारचा दबाव राहील.
तुमची इच्छा नसूनही २०११ सालाच्या आर्थिक वर्षांच्या सुरुवातीपर्यंत मोठी
गुंतवणूक करणे भाग पडेल. जी गुंतवणूक कराल त्याचा फायदा मे-जूननंतर
हळूहळू दिसायला लागेल. पण खरा आनंद मिळेल ऑक्टोबरनंतर. त्यानंतर परदेश
व्यवहारांना गती येईल. प्रतिष्ठा वाढवणारे काम तुमच्या हातून होईल.
नोकरीमध्ये जे काम तुम्हाला पसंत नसते तेच तुमच्या वाटय़ाला आल्यामुळे
कामामध्ये रस वाटणार नाही. नवीन नोकरी धरावी का असा विचारही येईल, पण
एप्रिलनंतर वातावरण निवळेल. त्यानंतर नवीन नोकरीही मिळू शकेल आणि
सध्याच्या कामातही रंग भरेल.
कौटुंबिक स्वास्थ्य आणि समाधान या दृष्टीने वर्ष साधारण आहे. पूर्वी
ठरलेले काही कार्यक्रम जानेवारीपर्यंत पार पडतील. एखाद्या सदस्याच्या
प्रकृतीविषयी किंवा प्रगतीविषयी चिंता वाटेल जी एप्रिल-मेनंतर हळूहळू कमी
होईल. मे आणि ऑगस्ट महिन्यात घरामध्ये एखादे शुभकार्य संपन्न होईल.
जुलै-ऑगस्टमध्ये पूर्वी बुकींग केलेल्या नवीन जागेत राहायला जाण्याचा योग
येईल. विद्यार्थ्यांना कष्टाच्या प्रमाणात यश देणारे वर्ष आहे. कलाकार,
खेळाडू आणि राजकारणी व्यक्तींना स्वत:चे प्रावीण्य सिद्ध केल्याशिवाय
जनतेकडून मान्यता मिळणार नाही.

वृषभ:

नवीन वर्षांची सुरुवात तुमच्या दृष्टीने उत्साहवर्धक आहे. अनेक
महत्त्वाच्या बदलांची नांदी यापूर्वीच झाली असेल ती कार्यान्वित करण्यात
तुम्ही दंग असाल. मात्र मे महिन्यानंतर हे चित्र थोडेसे बदलणार आहे.
व्यापारउद्योगात राशीच्या पंचमस्थानातील शनीची मिळणारी साथ विशेष उपयोगी
पडणारी आहे. मे-जून महिन्यांपर्यंत तुमचे प्रगतीचे वारू चौफेर उधळलेले
असेल. कारण आर्थिकदृष्टय़ा हा कालावधी चांगला असल्यामुळे व्यवसायामध्ये
सतत विस्तार करावासा वाटेल. स्वत:ची मर्यादा न सोडता काम केलेत तर उत्तम
कामगिरी करू शकाल.
नोकरदार व्यक्तींना वर्ष चांगले फलदायी ठरेल. विशिष्ट ठिकाणी बदली हवी
असल्यास एप्रिलपासून प्रयत्न सुरू करा म्हणजे जूनपर्यंत काम होईल.
परदेशामध्ये एखाद्या प्रोजेक्टनिमित्त गेलेल्या व्यक्ती याच सुमारास
मायदेशी परत येतील. शक्यतो नोकरीमध्ये बदल करण्याचे टाळा.
घरामध्ये तुम्हाला श्रेय मिळेल अशी चांगली कामगिरी तुमच्या हातून यावर्षी
पार पडेल. पुढील दिवाळीपूर्वी स्वत:च्या नवीन वास्तूमध्ये राहायला जायचे
स्वप्न साकार होईल. तरुणांना नोकरी किंवा व्यवसायात स्थिरता लाभेल.
उत्पन्नाचे प्रमाण वाढत असल्यामुळे दोनाचे चार करावेसे वाटतील.
विद्यार्थ्यांना एप्रिलपर्यंतचा कालावधी चांगला आहे. परदेशी उच्च
शिक्षणाकरिता जाण्यासाठी फेब्रुवारी महिना अनुकूल आहे. कलाकार आणि
खेळाडूंना वाढत्या स्पर्धेला तोंड देत प्रगती करायची आहे. पण त्याची
कल्पना एप्रिल-मेनंतर विशेषत्त्वाने येईल.

मिथुन:

गुरू, शनी आणि मंगळ या तीन ग्रहांची वर्षभर उत्तम साथ तुम्हाला लाभणार
आहे. त्यामुळे अनेक पूर्वीच्या प्रश्नांतून तुम्ही सहीसलामतपणे बाहेर
पडाल. मात्र राशीमध्ये होणारी ग्रहणे स्वत:ची प्रकृती आणि कौटुंबिक
स्वास्थ्य याबाबतीत चिंता दर्शवितात.
व्यवसायधंद्यात काही नवीन उपक्रम चालू होतील. त्याची मुहूर्तमेढ
यापूर्वीच रोवली गेली असेल. उत्पन्न वाढविणे हा उद्देश मे महिन्यानंतर
सफल व्हायला सुरुवात होईल. कारखानदारांना देशात किंवा परदेशात नवीन शाखा
उघडाविशी वाटेल. आधुनिक तंत्रज्ञानातून एप्रिल ते जुलै या कालावधीत विशेष
फायदा संभवतो. मात्र संपूर्ण वर्षभर पैशाची गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी
आणि निष्णात व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ऑक्टोबरनंतर एखादी संधी
दृष्टिक्षेपात येईल.
नोकरदार व्यक्तींना प्रगतीच्या दृष्टीने वर्ष उत्तम आहे. पूर्वी बढती,
पदोन्नती किंवा पगारवाढीचे आश्वासन दिले असेल, पण ते काही कारणाने अपूर्ण
राहिले असेल तर त्याची पूर्तता जुलै-ऑगस्ट महिन्यात होईल. करियरच्या संधी
तरुणांना निर्माण होतील.
कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने वर्ष साधारण आहे. चतुर्थ स्थानातील
शनीचे भ्रमण तुमच्या जबाबदाऱ्या वाढवेल. घरातील लहान मोठय़ा सदस्यांच्या
स्वास्थ्य आणि प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. मुलांच्या करियरकरिता
पालकांना जादा तरतूद करावी लागेल. नवीन वास्तूत राहावयास जाण्याचे बेत
लांबतील. तरुणांना वैवाहिक जीवनात मार्च ते जून या कालावधीत पदार्पण करता
येईल. वर्षभरात मौजमजेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्यावे लागेल.
विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. त्यांनी त्याचा फायदा घ्यावा. उच्च
शिक्षणासाठी फेब्रुवारी आणि जुलै-ऑगस्ट हे दोन्ही कालावधी चांगले आहेत.

कर्क:

दीर्घकाळ राशीत राहिलेल्या मंगळामुळे तुमचा तणाव आणि अस्थिरता वाढली
असेल तर येत्या वर्षांत प्रगतीचे चित्र स्पष्ट होईल. गुरुचे
भाग्यस्थानातील आणि दशमस्थानातील भ्रमण आणि तृतीयस्थानातील शनीचे
वास्तव्य या दोन्ही ग्रहांच्या अनुकूलतेमुळे तुम्ही चांगले काम करू शकाल.
व्यवसायधंद्यात जे बदल तुम्हाला करावे लागले होते त्यातून प्रगती होणार
असा आत्मविश्वास वाढेल. कारखानदारांना विस्ताराच्या योजना गवसणी घालतील.
व्यापारीवर्गाला चांगले कामकाज होऊन बाजारपेठेत स्वत:ची प्रतिमा उजळवता
येईल.
नोकरदार व्यक्तींना संपूर्ण वर्ष प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल आहे. एप्रिल
ते जुलै-ऑगस्ट या दरम्यान एखाद्या नवीन संधीकरिता त्यांची निवड होईल.
त्यानिमित्ताने परदेशवारीही घडेल.
सांसारिक जीवनात काही तणाव निर्माण झाले असतील तर ते आता हळूहळू कमी
होतील. हातातोंडाशी आलेल्या पण काही कारणाने लांबलेल्या शुभकार्याची
निश्चिती झाल्यामुळे घरातील सर्वानाच बरे वाटेल.
विद्यार्थ्यांना प्रगतिकारक ग्रहमान आहे. जास्त अभ्यास करून जास्त चांगले
यश त्यांना कमावता येईल. उच्च शिक्षणासाठी परदेशीही जाता येईल.

सिंह:

साडेसातीचा कठीण टप्पा आपण पार केला आहे. आता काहीतरी चांगले घडावे अशी
बरीच महत्त्वाकांक्षा घेऊन नवीन वर्षांत पदार्पण होईल. पण मे
महिन्यापर्यंत म्हणावी तशी गती न आल्यामुळे थोडीशी निराशा वाटेल. बचेंगे
तो और भी लढेंगे, असा पवित्रा ठेवून पुढे जात राहिलात तर तुम्हाला चांगले
यश संपादन करता येईल.
व्यापारउद्योगात तोंड झाकले तर पाय उघडे पडतात अशी स्थिती असेल. तांत्रिक
प्रश्न आणि आर्थिक चणचण ज्यामुळे एप्रिल-मेपर्यंत इच्छा असूनही सबुरीचे
धोरण ठेवणे भाग पडेल. त्यानंतर अचानक चांगली कलाटणी मिळाल्यामुळे
मरगळलेल्या अवस्थेतून तुम्ही बाहेर पडाल. व्यापारीवर्ग आणि कारखानदार
यांना मोठय़ा प्रकारचे काम मिळेल. ज्यामुळे संपूर्ण कार्यपद्धतीत फेरफार
करणे भाग पडेल. आर्थिकदृष्टय़ा लक्षणीय सुधारणा करणारे वर्ष आहे.
नोकरीमध्ये संस्थेमध्ये ज्या घडामोडी घडतील त्यामुळे थोडेसे बुचकळ्यात
पडल्यासारखे वाटेल. आपण केलेल्या कामाला महत्त्व नाही ही भावना त्रास देत
राहील. मे महिन्याच्या सुमारास नशिबाची साथ मिळाल्यामुळे अनुकूल
वातावरणाची निर्मिती होईल. त्यानंतर तुमची घोडदौड सुरू राहील.
सांसारिक जीवनात पहिल्या सहा महिन्यांत ताणतणाव राहतील. मनोधैर्य
खचल्यासारखे वाटेल, पण हीच तुमची परीक्षा आहे. कारण नंतरचा कालावधी उत्तम
आहे. ज्या समस्यांवर उत्तर मिळत नव्हते त्यांना चांगली कलाटणी मिळाल्याने
तुम्हाला बरे वाटेल.
मे-जून महिना तरुणांना विवाह ठरवायला चांगला आहे. नवीन वास्तूचा विचार
सप्टेंबरनंतर करा. जुन्या प्रकृतीच्या व्याधींवर लक्ष ठेवा.
विद्यार्थ्यांना कष्टदायक वर्ष आहे. अपेक्षित यशासाठी मान मोडून अभ्यास
करावा लागेल.

कन्या:

नवीन वर्षांचे यशाच्या दृष्टीने दोन परस्परविरोधी भाग आहेत. पहिल्या सहा
महिन्यांमध्ये अनेक गोष्टी तुम्ही कष्टाच्या आणि हिमतीच्या जोरावर पार
पाडू शकाल. त्यानंतरच्या सहा महिन्यांत समस्यांना तोंड देण्यासाठी कंबर
कसून तयार रहावे लागेल.
व्यवसायधंद्यामध्ये व्यवहारी दृष्टिकोन ठेवून जर काम करीत राहिलात तर
तुमची प्रगती मे-जून महिन्यापर्यंत उत्तम राहील. या दरम्यान सध्याच्या
व्यवसायात वाढ होईल. एखादी नवीन शाखाही उघडता येईल. त्यानंतर मात्र
अंथरुण पाहून पाय पसरा असाच एकंदरीत ग्रहांचा सल्ला असेल.
नोकरीमध्ये थोडेसे कंटाळवाणे वर्ष आहे. तुमच्या समोरील उद्दिष्ट मोठे
असेल. पण त्यामानाने आवश्यक त्या सुविधा न मिळाल्याने चिडचिड करीत काम
कराल. जानेवारी ते एप्रिल यादरम्यान एखादी चांगली कामगिरी झाल्यामुळे
तुम्हाला बरे वाटेल. शक्यतो नवीन वर्षांत चालू नोकरीत बदल करू नका.
कौटुंबिक स्वास्थ्यामध्ये येत्या वर्षांत कर्तव्यालाच प्राधान्य द्यावे
लागेल. स्वत: वाढवलेले खर्च आणि अनपेक्षित अडचणींकरिता आवश्यक असणारे
पैसे यामुळे थोडीशी धावपळच होईल. परंतु तुमच्या नियोजनामुळे तुम्ही सर्व
गोष्टी व्यवस्थितपणे हाताळू शकाल. विवाह किंवा इतर शुभ कार्यक्रम
ऑगस्टपूर्वी साजरे होतील. तरुणांना संमिश्र वर्ष आहे. वृद्धांनी स्वत:ची
मर्यादा सांभाळली तर त्रास होणार नाही. विद्यार्थ्यांना कष्टाच्या
प्रमाणात यश मिळेल. नवीन शैक्षणिक वर्षांत प्रवेश घेताना स्पर्धेला तोंड
द्यावे लागेल.

तूळ:

नवीन वर्षांच्या सुरुवातीला राजयोगकारक ग्रह शनि व्ययस्थानात तर गुरु
षष्ठस्थानात असल्यामुळे परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. व्यवसाय, नोकरी
आणि व्यक्तिगत विवंचना यामुळे थोडेसे निराश दिसाल. पण मे महिन्यानंतर ही
परिस्थिती अचानक सुधारल्यामुळे निराशा वगैरे सर्व गोष्टी पळून जातील.
व्यवसायधंद्यामधे सावधतेने वाटचाल करणे आवश्यक आहे. विशेषत: नवीन
गुंतवणूक करताना किंवा हातातील पैशाचा वापर करताना विचारपूर्वक निर्णय
घ्या. जे खर्च तुमच्या तत्त्वात बसत नाहीत ते स्पर्धेमधे टिकून
राहण्याकरिता करणे भाग पडेल. एप्रिल-मेनंतर सुधारणा होईल. नवीन कामे
मिळतील. पैशाचा ओघ वाढायला सुरुवात होईल. पुढील दिवाळीपूर्वी घवघवीत नफा
देणारे मोठे काम तुम्हाला मिळेल.
नोकरदार व्यक्तींना ज्या वातावरणात ते काम करीत आहेत त्यात शाश्वती अशी
वाटणार नाही. त्यामुळे एकप्रकारचा तणाव राहील. मार्च-एप्रिलपर्यंत नोकरी
सोडण्याचा आणि नवीन ठिकाणी रुजू होण्याचा विचारही मनात येईल. पण शक्यतो
हे टाळणेच चांगले. जून-जुलैनंतर तुमच्या गुणांना आणि कौशल्याला भरपूर वाव
मिळेल.
कौटुंबिक जीवनामध्ये न टाळता येणारे काही खर्च होण्याची शक्यता आहे.
त्याचे परिणाम जवळजवळ जूनपर्यंत जाणवतील. कर्तव्यात तत्पर राहावे
लागल्यामुळे स्वत:च्या स्वास्थ्याकडेही वेळप्रसंगी दुर्लक्ष होईल.
विवाहोत्सुक तरुणांना मे ते ऑक्टोबर हा कालावधी अनुकूल आहे. कुटुंबीयांसह
लांबच्या प्रवासाचे बेत डिसेंबर जानेवारी किंवा पुढील
ऑगस्ट-सप्टेंबपर्यंत संभवतात.
विद्यार्थ्यांना साधारण वर्ष आहे. नशिबावर त्यांनी विसंबून राहू नये.

वृश्चिक:

वर्षांच्या सुरुवातीला पंचमस्थानातील गुरुची तुम्हाला चांगली साथ आहे.
त्यामुळे अनेक महत्त्वाकांक्षी योजना तुमच्या मनात असतील. मात्र त्या सफल
करण्यासाठी तुम्हाला वेळेशी शर्यत करणे भाग पडेल. कारण मे-जून
महिन्यापर्यंतचा कालावधी विशेष अनुकूल आहे.
व्यापारीवर्गाला नवीन योजनांविषयी बरेच आकर्षण राहील. काही चांगल्या संधी
दृष्टिक्षेपात आल्यामुळे त्याचा फायदा उठवण्याची घाई असेल. डिसेंबर,
एप्रिल आणि मे हे महिने प्रगतीच्या दृष्टीने विशेष चांगले आहेत. त्या
दरम्यान मोठे प्रोजेक्ट यशस्वीरित्या राबवता येतील. मे-जूननंतर मात्र
स्पर्धकांचा अंदाज घेतल्याशिवाय कोणतेही महत्त्वाचे निर्णय कार्यान्वित
करू नका. कारण त्यातून गुंतवणूक वाढेल, त्यामानाने फायदा कमी असेल. पुढील
दिवाळीपर्यंत एका नवीन वळणावर तुम्ही याल.
नोकरदार व्यक्तींना यशदायक वर्ष पुढे आहे. त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या
इच्छा-आकांक्षा मे महिन्यापूर्वी सफल होतील. त्यात जादा पगारवाढ,
पदोन्नती, अपेक्षित ठिकाणी बदली वगैरेचा समावेश आहे. जूननंतर चित्र
बदलायला सुरुवात होईल. यश त्यानंतरही आहे, पण त्याबरोबर मोठा धोका किंवा
आव्हान पत्करावे लागेल.
कौटुंबिक जीवनात सुखदु:खाचा वाटा समसमान राहील. नवीन जागा, वाहन खरेदी
आणि एखादे शुभकार्य घडल्यामुळे जवळजवळ ऑगस्टपर्यंत तुम्ही खूश असाल.
मे-जूननंतर मात्र कळतनकळत मोठय़ा खर्चाचे प्रमाण वाढेल. तरुणांना
करियरमध्ये आणि वैवाहिक जीवनात स्थिरता देणारे वर्ष आहे.
विद्यार्थ्यांना मे महिन्यापर्यंतचा कालावधी उत्तम आहे. प्रयत्नांना
नशिबाची साथ मिळाल्याने यश द्विगुणित होईल. परदेशात जाणाऱ्या
विद्यार्थ्यांनी याची विशेष नोंद घ्यावी.

धनू:

दशम स्थानातील शनीचे भ्रमण, राश्याधिपती गुरुचे चतुर्थ स्थानातील आणि
पंचम स्थानातील भ्रमण या दोन जमेच्या बाजू तुम्हाला साथ देणार आहेत.
त्यामुळे ज्याप्रमाणात कष्ट कराल त्यापेक्षा कांकणभर जास्त यश तुमच्या
पदरी पडेल.
व्यापार उद्योगाच्या दृष्टीने वर्षांची सुरुवात थोडीशी संथ वाटेल.
प्रयत्न करूनही पाहिजे तेवढय़ा प्रमाणात यश न मिळाल्याने मधूनच सांशकता
वाटेल. परंतु मे महिन्यानंतर कामाला प्रचंड गती येईल. ज्या प्रकारचे यश
अपेक्षित नव्हते ते दृष्टिक्षेपात आल्यामुळे तुमच्यात एक नवीन ऊर्मी
निर्माण होईल. या सगळ्याचा फायदा तुम्हाला पुढील दिवाळीनंतर मिळेल.
नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांकडून आणि संस्थेकडून फारसे प्रोत्साहन न
मिळाल्याने मार्च-एप्रिल महिन्यांपर्यंत कामामध्ये रस वाटणार नाही. पण
नंतर संस्थेत ज्या घडामोडी घडतील त्यामुळे त्यांच्या कामाचे आणि
कौशल्याचे महत्त्व वाढेल. पगारवाढ, विशेष सवलती मे-जूनच्या सुमारास
मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये बदल करू इच्छिणाऱ्यांनाही हाच कालावधी
चांगला आहे.
सांसारिक जीवनात लक्षात राहण्याजोग्या चांगल्या घटना मार्च ते जून
यादरम्यान पार पडतील. विशेषत: घराचे स्वप्न, वाहन खरेदी या गोष्टींना
प्राधान्य मिळेल. वृद्धांना दीर्घकाळानंतर लांबच्या प्रवासाचा आणि
नातेवाईकांना भेटण्याचा योग जुळून येईल. सप्टेंबरनंतर एका चांगल्या
पर्वाची सुरुवात होईल.
विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी कष्टात आळस करून चालणार नाही. परदेशी
जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जय्यत तयारी करावी लागेल.

मकर:

राश्याधिपती शनीचे भ्रमण भाग्यस्थानात आणि गुरूचे तृतीय आणि
चतुर्थस्थानातील वास्तव्य तुम्हाला सौख्य आणि यश याचा अनुभव देणारे आहे.
दोन-तीन वर्षांपासून ज्या मनोकामना अपूर्ण होत्या त्या पूर्ण करायला नवीन
वर्ष म्हणजे चांगली संधी आहे.
व्यापारउद्योगात दिवसेंदिवस तुमच्या इच्छा आकांक्षा बळावत जातील. सध्या
असलेले काम चालू ठेवून एखादी नवीन शाखा उघडावी किंवा कामाचा विस्तार
करावा असा विचार मनात डोकावेल. त्यादृष्टीने आवश्यक ती पैशाची आणि
साधनसामग्रीची जुळवाजुळव मार्चपर्यंत कराल. मे महिन्यापर्यंत उत्तम
कामगिरी होईल. त्यानंतर थोडेसे स्वास्थ्य अनुभवाल. सप्टेंबरनंतर मात्र
मर्यादेबाहेर जाऊन कोणतेच काम करू नका. कारण आर्थिक व इतरदृष्टय़ा ते
पेलवणार नाही.
नोकरीमध्ये तुमच्यावरील अन्याय दूर होईल. तुम्ही केलेल्या चांगल्या
कामाची पावती पगारवाढ किंवा विशेष सवलत देऊन दिली जाईल. काहींना बढतीचे
योग संभवतात. नोकरीमध्ये सध्याच्या तुमच्या कामात वाढ झाल्यामुळे
जुलै-ऑगस्टनंतर एकप्रकारचा तणाव जाणवू लागेल. अशावेळी स्थितप्रज्ञ राहूनच
काम करणे आवश्यक आहे.
गृहसौख्यामध्ये चांगली आणि आनंददायी भर टाकणारे वर्ष पुढे आहे. स्वत:ची
वास्तू किंवा वाहन खरेदीचे बेत मेनंतर यशस्वी व्हाल.
विद्यार्थ्यांना ग्रहांची साथ चांगली लाभेल. परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांना
एप्रिल-मेपर्यंत पूर्वतयारी करून ठेवावी लागेल.

कुंभ:

तुमच्या राशीचे ग्रहमान नवीन वर्षांत संमिश्र फलदायी आहे. सहज आणि
सोप्या वाटणाऱ्या गोष्टी ताबडतोब न मिळाल्यामुळे तुम्हाला त्याकरिता बरीच
मेहनत करायची आहे. पण सब्र का फल मीठा होता है, हे लक्षात ठेवून नाराज न
राहता वाटचाल करीत रहा.
व्यवसायधंद्यात रोजचे काम रोज झालेच पाहिजे अशी स्थिती असेल, कारण जे
पैसे मिळतील त्याची तुम्हाला निकड असेल. थोडासाही आळस महागात पडेल.
एप्रिल ते जुलै हा कालावधी आर्थिकदृष्टय़ा चांगला जाईल.
नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक झाले नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका.
संपूर्ण वर्षभर व्यवहारी आणि कर्तव्यदक्ष दृष्टिकोन ठेवून काम केलेत तर
त्याचे फळ चांगले मिळेल. पगारवाढ बढती वगैरे आश्वासने वरिष्ठ देतील,
त्यात थोडेसे मागेपुढे होण्याची शक्यता आहे.
सांसारिक जीवनात घरातील व्यक्तींची मिळणारी साथ तुमच्या दृष्टीने
मौल्यवान ठरेल. जुने इस्टेटीचे किंवा कोर्टव्यवहाराचे प्रश्न निकालात
निघतील. मात्र त्याचा प्रत्यक्ष फायदा पुढील दिवाळीच्या सुमारास मिळेल.
तरुणांना कष्टानंतर अपेक्षित यश दिसेल. विद्यार्थ्यांनी नशिबापेक्षा
प्रयत्नावर अवलंबून राहणे श्रेयस्कर ठरेल.

मीन:

राश्याधिपती गुरूचे राशीतील आणि धन स्थानातील भ्रमण तसेच शनीचे सप्तम
स्थानातील भ्रमण तुम्हाला अनुकूल आहे. या दोन ग्रहांच्या बळावर नवीन
वर्षांत तुम्ही मोठी मजल मारू शकाल. मात्र तुमची पावले जमिनीवर राहू
द्या, असा ग्रहांचा संदेश आहे.
व्यवसायधंद्यात प्रगतीचा वेग वाढत राहील. मे महिन्यापूर्वी एखादी मोठी
कामगिरी तुमच्या हातून पार पडल्याने तुम्हाला धन्य झाल्यासारखे वाटेल.
स्वत:ची फॅक्टरी, ऑफिस खरेदी करण्याचे योग मे महिन्यानंतर संभवतात.
नोकरीमध्ये वरिष्ठांची भिस्त तुमच्यावर असल्यामुळे तुम्ही खुश असाल.
एखाद्या विशेष कामगिरीकरिता तुमची निवड होईल. त्या योगे मे ते सप्टेंबर
या दरम्यान परदेशप्रवासही घडेल. जादा अधिकार आणि पगारवाढ दोन्ही
मिळाल्यामुळे आपले काम बरोबर आणि चांगले होते असा अभिमान तुमच्यात
निर्माण होईल. नवीन आणि जादा पगाराची नोकरी एप्रिल ते जुलै यादरम्यान
मिळू शकेल, पण त्यातील कामाचा तणाव मात्र नंतर वाढेल.
सांसारिक जीवनात आनंदाची पर्वणी निर्माण करणारे वर्ष आहे. बराच काळ मनात
तरळणाऱ्या काही इच्छा आकांक्षा फलद्रूप झाल्यामुळे तुम्ही खुश असाल.
विद्यार्थ्यांना यशदायक वर्ष आहे. जास्त अभ्यास करून स्पृहणीय यश मिळविता
येईल.

- विजय केळकर

Post a Comment Blogger

 
Top