तुला पाहिलं आणि प्रेम या शब्दाचा अर्थ समजला. प्रीतीचं फूल तुलाच अर्पण केलं. तुझ्या त्या पहिल्याच प्रेमळ नजरेच्या दवबिंदूत भिजून गेले मी आणि मग कळलंच नाही , की कधी तुझ्यात इतकी गुंतले मी! तुझ्याही मनाच्या प्रीतबागेत प्रीतीचा केवडा फुलला होता आणि मी तर तुझी राधा झाले होते. पण... पण का कुणास ठाऊक , तू माझ्यावरील प्रेम व्यक्तच केलं नाहीस. मी मात्र प्रीतीच्या शांत किनाऱ्यावर तुझ्या होकाराच्या प्रतीक्षेत बसून राहिले. आपलं प्रेम अबोलच , तरीही ते एकमेकांच्या मनाला जाणवत होतं. म्हणूनच तर... तू वळून पाहिलंस. तुझा तो एक दृष्टिक्षेप... त्या क्षणाला वाटलं. तू फक्त माझा आहेस. फक्त माझा. मी धावले तुझ्या मिठीत विसावण्यासाठी. वाटलं , की विरघळलास माझ्यात तू. पहिली मी आणि नंतर तू असं आपलं वेगळं अस्तित्व आता उरलेलं नाही. पण...तो निव्वळ माझा भ्रम होता. माझ्या हातात गवसली , ती फक्त तुझी सावली. तीही सूर्यास्तानंतर माझ्या हातून निसटली रे..! माझी ओंजळ रिकामी ती रिकामीच. ते दिवस मात्र मोरपंखी होते. आरशात चेहरा पाहताना भाळी लावलेला चंद कसा दिलखुलास हसायचा. केसात माळलेला गजराही मग लाजायचा. मन पाखरू झालं होतं. तुझ्याच अवतीभोवती ते रुंजी घालत राहायचं. आता मात्र... सारंच चित्र बदललंय. आता पूवीर्सारखे गुलाब आवडत नाहीत मला. रातराणीच आवडते. कारण रात्रभर तीच एक सोबत देते. माझ्या माळ्यावरचा चंदही रुसलाय. तुझ्या आठवणींची रोज मैफल भरते आणि डोळ्यांतून श्रावणसरी बसरते. तरीही मनात एक आशा सूयोर्दयाबरोबर जन्म घेते. अजूनही वाटतं , की तू येशील. ओल्याचिंब देहानेच मला कवेत घेशील आणि म्हणशील , ' फक्त तुझ्यासाठी आलोय. तुझी प्रतीक्षा संपली. आपण एक प्रेमनगर वसवू. माझी हृदयस्वामिनी आहेस तू. ' माझ्या स्पर्शाचा नाजूक गुलाब टिपशील तू एखाद्या गुणगुणाऱ्या भ्रमरासारखा. माझ्या केसातील गजराही लाजेल. माझ्या माळ्यावरील चंदही हसेल पुन्हा. आपलं अबोल प्रेम बहरेल , फुलेल. मला अजूनही वाटतं. तू परत येशील , आपल्या अबोल प्रेमाला शब्दांचं दान देशील. येशील ना साथी ?

- पुष्पलता गोसावी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top