जीवनाच्या वाटेवर किती जण भेटतात, त्याची गणती नसते. पण गणतीत न बसणारे तुझ्यासारखे क्वचितच असतात. क्षणभुंगर जीवनात प्रत्येक जण जगायचा असतो आणि मी तुझ्या सहवासात तो जगत आहे. तुला पाहिलं, तेव्हापासून एक अनामिक ओढ लागली. तुला जाणून घ्यायची प्रबळ इच्छा मनात घर करू लागली. पण नेमक्या शब्दात मांडता येत नाही... कोणत्याही नात्याची सुरुवात प्रथम मैत्रीतूनच होत असते. मी त्याला आवडते, हे त्याने जरी प्रत्यक्ष व्यक्त केलं नसलं, तरी त्याच्या डोळ्यातील भाव खूप काही सांगून गेले. शब्दाविना झालेला संवाद हृदयापर्यंत पोहोचला अन् स्वर्गसुखाचा आनंद मिळाला. त्याला 'आय लव्ह यू' हे शब्द फार बोथट, उथळ वाटतात. त्याची भावना तीन शब्दात मावणारी नव्हती. आमचं प्रेम फार समंजस आहे. त्यातही समान प्रेम देण्याची आणि घेण्याची वृत्ती असल्यामुळे ते अधिकच दृढ झालंय. माझा छोटासा आनंद, दु:ख मी तुला सांगावं अन् तू मला ते समजवून सांगावंस, असं वाटतं. तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. म्हणूनच तर तुझ्यापासून दूर राहावंसं वाटत नाही. पण या अशा समंजस प्रेमात माझ्याकडून एक चूक घडली. ती म्हणजे, दुसऱ्याच्या बोलण्यावरून त्याच्यावर संशय घेतला. तेव्हा त्याला फार वाईट वाटलं. कारण जसं कोणतंही नातं विश्वास, आपुलकीवर आधारलेलं असतं, तसं आमचंही आहे. चूक उमगल्यावर फार पश्चात्ताप झाला. त्याबद्दल माफी मागते. तू आधी कविता वगैरे करायचास, ते आज बंद केलंस, याचं वाईट वाटतं. कारण कवितांच्या माध्यमातून आपण आपल्या भावना, सुखदु:ख व्यक्त करत असतो. माणसाने वेळात वेळ काढून आपला छंद, कला जोपासायला हवी. म्हणून तू पुन्हा कवितेच्या विश्वास रमून मन प्रफुल्लित ठेव, हीच माझी इच्छा आहे. दूर राहूनही तुझी साथ मला हवी आहे... देशील? प्रेमाने ओतप्रोत भरलेले शब्द साठवून माझं ध्येय गाठायचंय. त्यासाठी बळ मला तुझ्याकडून हवंय... देशील ना? प्रेमात बंधनं, मर्यादा काही स्तरावर असाव्यात, कारण ती अंतरीची ओढ असते. जमेल तसं घ्यायचं अन् जमेल तसं द्यायचं असतं. पण त्याच्यासाठी एक जिवंत मन असावं लागतं. प्रेमाचे क्षण वेचायला आणि टिपायला, हो ना?

- तुझीच,

   प्रिया

Post a Comment Blogger

 
Top