1) मला मोठं व्हायचं असेल , नव्या शिखरावर पोहोचायचं असेल तर मी कायम स्वतःला अशा माणसांच्या वर्तुळात ठेवायला हवं जी माझ्यापेक्षा कित्येकपट ग्रेट असतील। माझ्याहून सक्षम आणि सरस असतील.तरच मी स्वतःवर खुश होऊन टेंभे मिरवणं सोडेल आणि चार पावलं पुढं जाण्याचा प्रयत्न करीन !
२) प्रत्येक माणसाशी हसून बोलणं प्रत्येकाशी प्रेमानं हसणं एवढं कसं अवघड असेल ?
३) मनाच्या जखमा काळानं नाही तर प्रेमानं भरतात। काळ हे उत्तर असलं तरी मी प्रेमाची फुंकर घालून बघेलच !
४) जगात कोणीच परफेक्ट नसतो. आपण मनापासून माणसांना स्वीकारलं तर सारीच माणसं परफेक्ट दिसतात. प्रेमात पडलं की जग सुंदर दिसतं तसं एकदा स्वीकारली माणसं की त्यांच्यातल्या दोषांपेक्षा गुणांचं मोल कळायला लागतं .
५) आयुष्य कठीण आहे , पण मीही जिद्दी आहे. घण-लोखंडासारखं आम्ही घडवत राहू एकमेकांना .
६) मला देखणं , सुंदर दिसायचं असेल तर एक हमखास यशस्वी स्वस्त पर्याय सतत उपलब्ध आहेच. ओठावर हसू आणि प्रसन्न चेहरा !
७) आपण दुःखच कुरवाळत बसलो तर सगळी जागा तेच व्यापून टाकतं आणि समोर उभा आनंद दुसरी जागा शोधत निघून जातो.मी आनंदाला असं जाऊ देणार नाही.
८) अमुकतमुक गोष्टीमुळे मला काय वाटलं हे माझ्या हातात फारसं नसतं .माझं मन दुखावतं कधी कधी. मी भावनेच्या भरात अडकतो .पण त्या भावनेचं करायचं काय हे मला जमायला हवं . माझ्या भावनांना योग्य कृतीची जोड देणं तर माझ्या हातात आहे!
९) शिखरावर चढणं सगळ्यांसारखं मलाही तिथेच पोहोचायचं आहे. पण मला हे कळुन चुकलंय की शिखरावर सगळा आनंद नसतो. ते शिखर चढण्याच्या प्रवासातच खरा आनंद असतो.मी प्रवासातला आनंद विसरून डोळ्यावर झपडं लावणार नाही.
१०) मी शिकतोय , कमी काम करायला! कमी काम केलं तरच जास्त गोष्टी मला करता येतील हे आत्ता मला समजतंय . चोवीस तास मी नोकरीत पैसे कमावण्यासाठीच राबतो . तर इतर गोष्टी करणार कधी ? मी घाण्याला जुंपलेलं काम कमी करीन आणि चार मनासारख्या गोष्टी करून पाहीन .
११) प्रेम दाखवावं लागत नाही. आपण मनापासून प्रेम केलं ,खरंच प्रेमात पडलो तर ते दिसतच. मग प्रेमाचा शो- ऑफ करायची गरज काय ?
१२) मी शिकतोय ,माझा दिवस सार्थकी लावणं. दिवसभरात मी एक छोटी चांगली गोष्ट करीन. त्यानं कुणाला थोडंसं बरं वाट्लं तरी माझा दिवस सार्थकी लागला असं मी समजेल !
१३) उगीच कुणाशी सहानुभूतीनं वागण्यापेक्षा सगळ्यांशी चांगलं वागणं गरजेचं असतं .
१४) मी शिकतोय ,माझ्या मित्रांसाठी जिवाचं रान करणं . आयुष्यात कोणालाच वेळ नसतो;पण माझ्या जिवाभावाच्या मित्रांशिवाय माझ्या जगण्याला काही अर्थ नाही . मी काहीही झालं तरी वेळ काढीन. आणि मित्रांबरोबर मस्त गप्पा मारत , धम्माल करील. कॉलेजचे दिवस संपल्याची सल घेऊन मी जगणार नाही .
१५) माणसांना तुमच्या पैशाची गरज नसते. हातात हात घेऊन दिलेला धीर , खांद्यावरची एक थाप आणि थोडा समजुतदारपणा दाखवून 'ऐकून घ्यायची ' तयारी दाखवली तर ........... सोप्प्या होतात गोष्टी!
१६) पैशानं समाधानच काय ; पण चांगुलपणाही विकत घेता येत नाही. पैशांवर माणसं मी तोलणार नाही . ' क्लास ' पैशांवर ठरतो असं मी मानणार नाही !
१७) मी शिकतोय ,आयुष्यात आनंदाची वाट न पाहणं . तो काही स्वप्नातला राजकुमार नाही एक दिवस यायला ! तसं होणार नाही . मी रोज आनंदात जगेन तर माझं सारं जगणं आनंदी होईल !
१८) एका रात्री जग बदलण्याची स्वप्न मी पाहणार नाही . माझं आयुष्यही एका रात्रीत पालटणार नाही . त्यासाठी मला स्वतःवर आणि स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवून खुप प्रयत्न करावे लागतील . देवही जर एक दिवसात सारं बदलवू शकत नाही . त्यानंही एकेक दिवस करतच युगानुयुगे विश्वाची निरंतर प्रक्रिया सुरू ठेवलीय. तर मग सारं इन्स्टंटच हवं असं म्हणणारा मी कोण ?

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top