"अहो, ऐकलंत का? फीचे पैसे कधी मिळणार तुमचे? तुमच्या लाडक्या लेकीला
एकही धडका ड्रेस नाही.. तो घ्यायचाय आणि जरा भाजीही आणायची होती."
"आली होती पण खर्च झाली. आईला एमटी केलेत पैसे."
"खर्च झाली???!!! आईंना आत्ता गेल्याच महिन्यात तर एमटी केलेलीत ना
तुम्ही मग आता परत?"
"भाऊला लागत होते हातऊसने.."
"बास्स.. त्यांच्या उधळपट्टीला ठिगळे लावायला पैसे आहेत पण पोरांना कपडे
घ्यायला नाहीत पैसे.. इतक्या दिवसांनी आलेली ती मेली फी, तीही टाकलीत
देऊन आणि परत म्हणा मीच कर्कशा म्हणून.."
"माझ्याकडे नाहीयेत आत्ता अजिबात पैसे. कडधान्यं कर काही दिवस."
"बाबा, आईला का त्रास देता तुम्ही? पैसे असताना नाहीत असे सांगू नये."
माझ्या या मध्येच बोलण्याने दोघेही चमकले. बाबांचा पारा भलताच वर गेला..
"काय गं कार्टे, काय बडबडतेस? खोटं काय बोललो मी? पैसे नाहीचेत
माझ्याकडे..बघ हवे तर खिशात.."
"आहेत! खिशात नाहीत पण आहेत.."
"कुठे आहेत गं बबडे पैसे?" आई.
"त्या जड पुस्तकात! थांबा मी काढून दाखवते.." असं म्हणून मी खुर्ची आणून
त्यावर चढले. हात उंच करून अवकळा करकरून ते पुस्तक कसेबसे काढले.. त्या
पुस्तकाचे वजन माझ्या लहान हातांना खूपच जास्त होते! पुस्तक उलटे धरून
पानं फर्रर्र करताच एक १०ची नोट खाली पडली!
"आहे की नाही पैसे?!" माझा विजयीमुद्रेने प्रश्न.
"का हो? अजुन कुठेकुठे लपवून ठेवलेत तुम्ही पैसे?"
"अगं मला खरंच माहिती नाही ती नोट त्या पुस्तकात कशी काय गेली ते.
वाचतावाचता पान लक्षात ठेवण्यासाठी म्हणून ठेवली असेल वाचनाच्या धुंदीत
एखादवेळी. चला.. तुझ्या भाजीची तर सोय झाली. आता बबडीच्या ड्रेसचे बघू
काय ते नंतर.."
"मला ड्रेस नको.. आहे मला ड्रेस.."
बाबांच्या गालाला लगेच खळी पडली. "बघ.. लेक लाडकी का आहे कळले का? ती
म्हणतेय आहेत तिच्याकडे ड्रेस मग तू का मागे लागली आहेस माझ्या कधीची?"
"किती आणि कसे आहेत विचारा ना तुम्हीच.."
"??"
"शाळेचा गणवेश आहे की चांगला. बस्स झाला तेवढा मला."


Post a Comment Blogger

 
Top