प्रत्येक गावाची एक संस्कृती असते. त्या नुसार ते गाव जगत असते. गावाचे स्वभाव घडत असतात. यात कोणीच काहीच न ठरवता हे घडत असते.
त्या गावाचे रहिवासी हा स्वभाव घडवतात की गाअ रहिवाशांचे स्वभाव घडवते हे सांगणे कठीण.
आता हेच बघा ना
कोल्हापुरकर म्हंटले की मनमोकळा कुस्ती आणि चित्रकलेवर मनापासून प्रेम करणारा हेच डोळ्यापुढे येते.
अंबाबाई आणि जोतिबा यांच्या यात्रेच्या आठवणी काढणारा शाहु महाराज आणि त्यानी मारलेल्या वाघांच्या शिकारीच्या गप्पा , खासबाग मैदानात कधी काळी झालेल्या मारुती माने /सत्पाल /बिराजदार यांच्या कुस्त्यांच्या आठवणीत रंगणारा कोल्हापुरकर.
पांढरा तांबडा रस्सा दिलखुलास खिलवणारा कोल्हापुरकर.........
पहिल्याच भेटीत एखाद्याला आपले मानणारा / फारसे आतबाहेर न ठेवता बोलणारा कोल्हापुरकर. त्यांच्याशी बोलताना ते तुम्हाला सुद्धा राजे बनवून टाकतील. स्त्रीया सुधा बोलताना मी आलो होतो असे सहज म्हणून जातील. त्यांच्या लेखी आलो होतो / गेलो होतो हे दोन शब्द नसून मी आल्तो मी गेल्तो अशी जोडाक्षरे होतील. एखादी मुलगी घरात आली तर " आलास काय गा"? असे आई विचारेल
"तो यायला लागला आहे" हे अख्खे वाक्य " तो यायलाय" एवढ्या दोन शब्दात आटोपेल.
कोल्हापूरकर आंबाबाईच्या देवळात गेला तर चपलाची चिंता न करता सावकाश दर्शन घेईल.
कोल्हापुरकर राजकारणाबद्दल फारसे बोलणार नाही पण थोरले महाराज , चित्रकार दलाल , बाबुराव पेंटर यांच्याबाबत बोलताना तो खुलतो.

सांगलीची गोष्ट थोडी वेगळी.
कोल्हापुर ला राजे होते सांगलीला संस्थानीक होते. राजा आणि संस्थानीक यात असेल तेवढा फरक या जवळ जवळ वसलेल्या दोन्ही गावांत आहे . राजेपणाची मस्ती नसेल; संस्थानीकाचा हिषेबीपणाआहे.
सांगलीकर गणपतीच्या देवळात रमेल पण तेवढ्याच पटकन देवळातून पाय बाहेर काढून जयसिंगपुरच्या एम आय डी सी त निघेल.
हळद वायदेबाजारात जाईल. गप्पा हाणताना दादा बापू भाऊ या पेक्षा जास्त बोलणार नाही. पण राजकारणात मुरलेला असेल.
जेवणात कोल्हापुरी तर्री नसेल ब्राम्हणी पुरणपोळी असेल. कोल्हापूरकराला मिसळीची नशा असेल सांगलीकर गोरे बंधू भडंगावर समाधान मानेल.
सांगलीकर बोलताना कोणत्याही व्यक्तीला " ते " बनवतील. आदराने नव्हे भाषेच्या लहेज्यामुळे. कॉलेजचे प्राचार्य आले तरी " ते येतय बघ " असे म्हनतील.
तुम्ही त्याना चहा पाजलात तरी ते आपल्या गावच्या चौकात " इंदीराभुवनच्या " शेजारी ये तुला असा चहा पाजतो असा चहा पाजतो असा चहा पाजतो असे म्हणतील. स्वतः निवान्त चहा पिईल आणि आपल्याला घाई करेल

मुम्बैकर मुम्बैत एकदम पटकन कोणाबरोबरही मोकळा न होणारा पण एकदा मुम्बै बाहेर पडला की स्वतःची सामान्यत्व कबूल करत सहज संवाद साधतो.
तो वर्तमानपत्राची घडी सुद्धा उभी घालतो.
जागा आणि जागांचे भाव हे कोणत्याही मुम्बै कराचे जिव्हाळ्याचे विषय.
एरवी शेजार्‍याशी ही फारसा संभाषण करणार नाही पण वेळ पडली तर न मागता सुद्धा अनोळख्याला भरभरून मदत करेल.
तुम्ही एखादा पत्ता विचारा ठाऊक असेल आणि शक्य असेल तर मुम्बैकर तुम्हाला केवल पत्ता सांगून थांबणार नाही. दाखवायला ही येईल/
पुण्यात हा अनुभव भलताच वेगळा येतो. पावसात तुम्ही भिजताय मुम्बैकर तुम्हाला आपल्या छत्रीत जागा देईल. रांगा लावणे हे मुम्बैकराच्या हाडीमांसी इतके भिनलेले आहे की बागेत छोटी मुले सुद्धा घसरगुंडीसाठी रांग लावून उभी रहातील

सातारकर हे तिरकस बोलण्यात पटाईत. काय कसे आहात ? या प्रश्नाला " बरे आहे/ मजेत आहे" असली सरळ उत्तरे न येता " मला काय धाड भरली आहे" असला निरुत्तर करणारा प्रश्न सातारकरच विचारु शकतो.
चर्चेत हिरीरीने भाग घेईल. सकाळी सकाळी भारत भुवनची रस्सेदार पुरी भाजी हा यांचा आवडता नाश्ता. पंधरा ऑगस्ट ला रस्तोरस्ती लागणारे जिलेबीचे स्टॉल हे सातार्‍याचे एक वैषिष्ठ्य.
अशोक मोदी ची किंवा लाटकरची आंबा बर्फी / पेढे हे जिव्हाळ्याचे विषय. नुकत्याच कोठेतरी झालेल्या राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेत अमूक एका एकंकिकेत लाईट ची अ‍ॅरेन्जमेन्ट कशी चुकीची होती/ अमूक एकाने दिग्दर्शन कसे करायला हवे होते ही चर्चा उद्यासाठी अर्धी राखून ठेवत अर्धा ग्लास दुध पिऊन रात्री दोन वाजता घरी जाणे हे सातार्‍यातच नियनीतपणे होऊ शकते.
दिवाळीच्या दिवशी न ठरवताही खिंडीतल्या गणपतीला भेटणारे आख्खे गाव हे सातारकरच करु जाणे
सातार्‍याची एम आय डी सी कशी झोपली या चर्चा बारामतीमुळे हे असे झाले या निष्कर्षला येतात.

पुण्याबद्दल बरेच काही बोलून झाले आहे.
तुम्हाला तुमच्या गावाबद्दल / इतर गावांबद्दल काही सांगायचे आहे?
लिहा बिंधास्त..... गावोगावचे स्वभाव .........
Post a Comment Blogger

 
Top