निवडक पु.ल. Funny incidents pula deshpande Part 3


पु.ल. देशपांडे ह्यांचे काही मजेदार किस्से

>>एकदा पु लं चे पाय खूप सुजले होते. तेव्हा आपल्या सुजलेल्या पायांकडे बघत ते म्हणाले," आता मला कळले,पायांना पाव का म्हणतात ते!"

>>
पुण्यात भानुविलास नावाचे चित्रपटगृह होते. तर सुरुवातीला त्याला पत्र्याचे छप्पर होते. आणि त्याच्या छतातून
उन्हाचे कवडसे पडत असत. एकदा पु.ल.(?) तिथे गेले होते आणि ते कवडसे पाहून म्हणाले "अगदी
बरोबर नाव ठेवले आहे, भानुविलास!"

>>
'वाऱ्यावरची वरात'चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग. दुसऱ्या दिवशी बोहल्यावर चढायचे होते. लालजी देसाई आपले काम आटपून घाईघाईने निघाले. विंगेत उभे असलेल्या पुलंनी अंधारातच हात धरला आणि म्हणाले... 'प्रयोग संपेपर्यंत थांब!' लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा पुन्हा उघडायला लावला. लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले आणि प्रेक्षकांना म्हणाले, 'उद्या याची 'वरात' निघणार आहे, पण तो आजच 'वाऱ्यावर' स्वार होऊन आला आहे'...आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

>>
पुणे आकाशवाणीवर १९५५ मध्ये पु.ल. विशेष कार्यक्रमांसाठी प्रमुख म्हणून कार्यरत होते. जागेची अडचण असल्यामुळे एकाच मोठ्या खोलीत सगळे निर्माते एकत्र बसत असे. त्यांत पु.ल., कविवर्य बोरकर, व्यंकटेश माडगूळकर, मिरासदार अशी मंडळी असायची. त्यावेळचा एक प्रसंग .
महात्मा गाधींची जयंती जवळ आली होती. तेव्हा २ ऑक्टोबरचे कार्यक्रम ठरवण्यासाठी केंद्र्संचालकानी निर्मात्यांच्या बैठकीत सूचना विचारल्या. कुणी काही कुणी काही कार्यक्रम सुचवले पु.ल. म्हणाले "गांधाजींना मौन प्रिय होते. तेव्हा आपण २ ऑक्टोबरला मौन पाळावे व एकही कार्यक्रम ठेवू नये." यावर संचालकांसह सर्व जण खळखळून हसले.

>>
एकदा एक 'कदम' नावाचे गृहस्थ पु लं कडे मुलगा झाल्याचे पेढे घेऊन आले.....पु लं नि आशीर्वाद दिला .......
'कदम कदम बढाये जा'

>>
सुनीताबाईंसह वसंतराव देशपांडे आणि पुलंचा गाडीतून प्रवास सुरू असताना जेव्हा समोर एक मोठा गवा आक्रमक भूमिकेत येतो आणि वसंतराव सुनीताबाईंना इंग्रजीत काही तरी सूचना करतात, हे ऐकून "पुलं' म्हणतात, "त्या गव्याला इंग्रजी समजत नाही म्हणून वसंतराव इंग्रजीत बोलतात।'

>>
एका सगींत संमेलनाच्या भाषणात पु.ल. नी एक किस्सा सांगितला होता.

'एकदा एका शेताच्या बांधावरुन जात असताना एक शेतकरी शेतात काहीतरी काम करताना दिसला. आम्हा लेखकांना कुठे गप्पा केल्याशीवाय राहवत नाही. त्या स्वभावानुसार मी त्या शेतकराला विचारलं "काय हो शेतकरी बुवा, या झाडाला कोणते खत घातले तर त्याला चांगले टॉमेटो येतील?" त्यावर तो शेतकरी चटकन म्हणाला "या झाडाला माझ्या हाडांचे खत जरी घातलेत तरी त्याला टॉमेटो कधीच येणार नाहीत कारण ते झाड वांग्याचे आहे।"

>>
काळ बदलला, तशी माणसंही बदलली. स्पर्धेच्या जगात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वाहू लागले. माणसं इंग्रजाळलेली झाली. अमेरिकन संस्कृती झपाट्यानं रुजू लागली. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर झाला आणि उत्सवाचं एकंदर स्वरुपच पालटलं.

गणपतीच्या मिरवणुकीत चालणारे रोंबा, सोंबा, डिस्को नाच पाहून आणि प्रदुषणात भर घालणारी गाणी ऐकून ' पुलं ' गंभीर झाले. यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते एकदा गंमतीनं म्हणाले,
' आजकाल मला आपला गणपतीबाप्पा ' गणपतीपप्पा ' झाल्यासारखा वाटत

>>
आणीबाणीनंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना मुख्यमंत्र्यांनी का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले,
' मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ' संजय उवाच ' असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला !'
पुलंनी जनता पक्षाच्या प्रचारसभेतून भाषण सुरू करताच ' त्यांना आत कंठ फुटला आहे ' असे उद्गार यशवंतराव चव्हाणांनी काढले होते.
त्याचा समाचार घेताना पु.ल. म्हणाले, ' गळा यांनीच दाबला आणि बोलू दिलं नाही, आणि आता म्हणतात, कंठ फुटला. ते असो, पण निदान मी गळ्यात पट्टा तरी घातलेला नाही !

>>
एक गाजलेल्या संगीत नाटकात एक सुप्रसिद्ध गायक नट कित्येक वर्षं श्रीकृष्णाची भूमिका करत होता. खरं तर, उतारवयामुळं ती भूमिका त्याला शोभत नव्हती, तरीही त्याचं आपलं श्रीकृष्णाची भूमिका करणं सुरूच होतं.
प्रश्न होता, त्याला हे सांगायचं कुणी ?
एका रात्री त्या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगापूर्वीची नेहमीची गडबड सुरू होती. तो नट पीतांबर नेसून, रत्नजडित अलंकार लेवून आणि डोक्यावर मुकूट चढवून, श्रीकृष्णाच्या संपूर्ण पेहरावात हातावरचा शेला आणि सुटलेलं पोट सावरत रंगपटात उभा होता.
तेवढ्यात पु.लं. आपल्या काही मित्रांबरोबर रंगपटांत आले. क्षणभर त्या सजलेल्या श्रीकृष्णाकडे पाहतच राहिले. कदाचित त्या नटाचं त्याच्या तारुण्यातील देखणं रुप त्यांच्या डोळ्यासमोर क्षणभर तरळलं असावं. पु.लं.च्या मित्रांना त्यांचं हे त्याला न ओळखण्यासारखं पाहणं थोडं नवलाईचं वाटलं. न राहवून त्यांनी विचारलं, ' हे काय, भाई, ह्यांना ओळखलं नाही का ? अहो, हे आपले... '
पुलं त्यांना मध्येच थांबवत म्हणाले, ' अरे व्वा ! ओळखलं नाही, कसं म्हणता ? ह्यांना पाहूनच तर आज देवाला ' अवतार ' ध्यान का म्हणतात, ते समजल.

>>
एकदा पुलं गोव्याहून पुण्याला मोटारनं येत होते. त्यांच्यासोबत वसंतराव देशपांडे आणि सुनीताबाई होत्या. वाटेत एक जंगल लागलं. जंगलाच्या आडवळणावर एक महाकाय बायसन (गवा / रानरेडा) त्यांच्या गाडीसमोर आडवा आला.

रानरेडा हा महाशक्तिशाली आणि आक्रमक प्राणी ! त्यानं धडक दिली तर ट्रकही आडवा होईल. तिथं फिअॅट गाडी काहीच नाही. एक अर्थानं समोर प्राणसंकटच उभं ठाकलेलं.

प्राणभयानं घाबरुन गेलेले वसंतराव देशपांडे पुलंना हळूच म्हणाले, ' भाई ही इज चार्जिंग !'

वसंतरावांच्या तोंडचे हे इंग्रजी उद्गार ऐकून तसल्या जीवघेण्या प्रसंगातही पु.ल. म्हणाले, ' त्या गव्याला कळू नये, म्हणून वसंतराव इंग्रजीत बोलताहेत !

>>
गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ' मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत. '


>>
हौसेसाठी प्रवास करणा-या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा प्रश्न पुलंना कुणी तरी विचारला. त्यावर पटकन पुल म्हणाले, ' त्यात काय ? ' सफरचंद ' म्हणावं. '
मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ' एअरहोस्टेसला आपण ' हवाई सुंदरी ' म्हणतो, तर नर्सला ' दवाई सुंदरी ' का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ' वाढपी ' म्हणतो, तर वैमानिकाला ' उडपी ' का म्हणू नये ?'
त्याच सुरात पुलं खूप दारू पिणा-याला ' पिताश्री ' किंवा ' राष्ट्रपिता ' म्हणतात


>>
अरुण आठल्ये आणि पुलं एकदा चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी म्हणून गेले. चायनीज फूडचं वैशिष्ट्य सांगताना पुलं म्हणाले,
' चायनीज फूड स्टार्टस वुईथ चिलीज अॅण्ड एण्डस वुईथ लिचीज.
' चायनीज फूड पाहताच त्यांना आजची शिक्षणपद्धती आठवते.
जेवण घेताना खूप जेवल्यासारखं वाटतं, पण थोड्याच वेळात भूक लागते, हे लक्षात घेऊन पुलं म्हणतात, ' आपल्या शिक्षणासारखं हे चिनी जेवण घेताना खूप घेतल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात पोट रिकामंच राहतं. '

चिनी स्वीट कॉर्न सूप फार प्रसिद्ध आहे. या जेवणात मका फार वापराला जातो. त्यावर पुलंचं भाष्य : ' चिनी भोजनाला सर्वात्मका म्हणायला हवं !'

contributed by a reader of Marathi Entertainment

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top