हवे आहे स्वातंत्र्य .......................

* रटाळ कौटुंबिक मालिकांपासून - सास्वासुनांच्या, नणंद-भावजयांच्या, नवरा-बायकोच्या त्याच त्याच संघर्षाच्या बोगस, बटबटीत कहाण्यांना विटलोय आम्ही!
उपाय: मग टीव्हीला एक रिमोट असतो की नाही... तो उचला आणि चॅनेल बदला। त्याच टीव्हीवर 'डिस्कव्हरी', 'हिस्टरी', 'नॅट जिओ', 'अॅनिमल प्लॅनेट' असे ज्ञानरंजन करणारे असंख्य चॅनेल्स आहेत... ते पाहा की!

* लोकलमधल्या कंठाळी भजनांपासून - बेंबीच्या देठापासून भेसूर किंचाळत आसपासच्या तीनचार डब्यांची डोकी उठवत जाणारी टोळकी म्हणजे प्रवासातल्या रिलॅक्सेशनचं हमखास खोबरं!
उपाय : अहो, ही देवभक्ती नाही, गटबाजीची युक्ती आहे। ग्रुप केला की सीट मिळते, हे साधं व्यावहारिक गणित आहे। या झुंडींपुढे उपाय एकच... तुम्हीही त्यांच्यात सहभागी व्हा, तारस्वरात किंचाळा (म्हणजे इतरांच्या आवाजाचा त्रास होणार नाही) आणि सीट मिळवा!!

* जवळची भाडी नाकारणाऱ्या रिक्षा-टॅक्सीवाल्यांकडून - मोठ्या मिनतवारीनं एखादी रिक्षा-टॅक्सी थांबवावी आणि बसता बसता ठिकाण सांगावं... ते जवळचं, 'एका मीटर'च्या आतलं असेल, तर रिक्षा-टॅक्सीवाला गुमीर्त 'नही आयेगा' म्हणून सांगतो... बसलेल्याला उतरवतो।
उपाय : अहो, रिक्षा-टॅक्सीवाल्यांच्या युनियन असतात। प्रवाशांच्या युनियन नसतात। तुम्हाला कोण विचारणार? आणि मुळात जवळच्या अंतरासाठी रिक्षा-टॅक्सी हवी कशाला? जरा चाला। पैसे वाचतील आणि फिट राहाल।

* सरकारी ऑफिसातल्या फायलींपासून - सरकारी ऑफिसं म्हणजे फायलींचं जंजाळ... जिकडे पाहावे तिकडे गठ्ठ्यागठ्ठ्याने फायली साचलेल्या असतात... आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सगळ्यात मोठं टेन्शन असतं ते फायली क्लिअर करण्याचं।
उपाय : काय सांगताय? कामाच्या गोष्टींचंही टेन्शन येतं त्यांना? मग, मार्ग सोपा आहे की। फायलींवरच्या 'वजना'ची उठाठेव न करता कामाच्या वेळात प्रामाणिकपणे काम करावं। म्हणजे फटाफट फायली क्लिअर होतील।

* साखरझोपेतून उठवणाऱ्या पहाटेच्या गजरापासून - जगातला सर्वात कर्णकर्कश्श आवाज कुठला असेल, तर तो घड्याळाच्या गजराचा. (हिमेश रेशमियाचा नंबर दुसरा आहे.) साखरझोप अनावर असतानाच गजर ठणठणतो आणि दिवसभराच्या दगदगीच्या, धावपळीच्या शेड्युलची नको नकोशी आठवण करून देतो।
उपाय : सोप्पा उपाय म्हणजे घड्याळ बंद ठेवा. पण, ते बंद ठेवायचं तर नोकरी-धंदा सोडायलाच हवा. ते जमायचं नाही. मग असं करा. झोपताना दोन-चार ग्लास पाणी प्या. म्हणजे, सकाळी आपोआप जाग येईल आणि गजराच्या ठणठणाटापासून तरी मुक्तता मिळेल.

Post a Comment Blogger

 
Top